अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर विशेष लेख ..

    दिनांक : 31-Aug-2022
Total Views |
गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बापाला अनेक नावाने संबोधले जाते. अशा या बाप्पाचे स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाची स्थाने म्हणजेच अष्टविनायकाची महाराष्ट्रातील आठ मंदिरं.
 
 
 
 
moreshear
 
 
 
महाराष्ट्रातील रायगड, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री ओझर व रांजणगाव या ठिकाणी आठ पवित्र व स्वयंभू गणपतीची विविध रूपे आहेत.
 
प्रत्येक मंदिराला त्याचे-त्याचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. प्रत्येक मंदिरातील मूर्तीचे स्वरूप हे विलोभनीय आहे तसेच तिथल्या मंदीरातील ऐतिहासिक बांधकाम व कलाकुसर उल्लेखनीय आहे.
 
भक्तांमध्ये अष्टविनायक यात्रेचे विशेष महत्त्व आहे या यात्रेची सुरुवात मोरगावचा मोरेश्वरापासून सुरू होऊन पुन्हा इथे येऊन या यात्रेचा शेवट केला जातो. तर अष्टविनायक प्रत्येक स्थानाचे महत्त्व, तिथली आख्यायिका व मंदिर याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
 
१. मोरगावचा मयुरेश्वर:-
 
पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असणारे हे बाप्पाचे मंदिर अष्टविनायकातील यात्रेत पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील हे गाव बारामती तालुक्यामध्ये स्थित आहे. व पुणे शहरापासून हे 55 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी या गावात मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असायचे म्हणून याला मोरगाव असे नाव पडले.

मयुरेश्वर (मोरेश्वर):-
 
मोरेश्वर किंवा मयुरेश्वर हे गणपतीची स्वयंभू मुर्ती पुर्वाभिमुख असून सोंड डावीकडे वळलेली आहे. बाप्पाच्या या लोभस व आकर्षक मुर्तीच्या डोळ्यांमध्ये व नाभीमध्ये हिरे जडविलेले आहेत तसेच मूर्तीवर नागाच्या फण्याचे सुंदर छत्र आहे. इथल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत तसेच पुढे उंदीर व मोर उभे आहेत. अष्टविनायक यात्रेला सुरुवात मोरेश्वराच्या दर्शनाने होते व असे सांगितले जाते की या यात्रेचा शेवटही जर येथे झाला तर ही यात्रा खऱ्या अर्थाने सफल होते.
 
मंदिर:-
 
मोरगावातील कऱ्हा नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिर संरक्षक भिंतीनी वेढलेले आहे. सध्याच्या या मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले. मंदिरांवर मोघल सैन्याने आक्रमण करू नये म्हणून या मंदिराचे बांधकाम वरकरणी मुस्लिम मशीदी सारखे करण्यात आले. या मंदिरासमोर नंदीची एक भव्य मूर्ती व मोठ्या आकाराचा दगडी उंदीर आहे. गणपती समोर नंदी असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे.
 
आख्यायिका:-
 
गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि राणी उग्रा यांचा पुत्र सिंधू याला सूर्यदेवाने अमरत्वाचे वरदान दिले होते. त्याने अहंकार व असुरी वृत्तीने देवांवर आक्रमण करवून आणले. त्यामुळे सिंधूसुराचा नाशिक करण्यासाठी देवांनी विघ्नहर्त्या गणपती कडे प्रार्थना दिली तेव्हा मोरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मोरेश्वर अवताराने सिंधूसुराचा वध केला व देवांना व पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त केले.