माध्यम स्वातंत्र्याचा दांभिकपणा

    दिनांक : 29-Aug-2022
Total Views |
 

 ‘वॉशिंग्टन पोस्ट’ गौतम अदानींवर टीका करत असेल तर त्याने जेफ बेझोस यांनाही चार गोष्टी सुनावल्या पाहिजे. तेवढी हिंमत ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहे का? पण, ते तसे करणार नाही, कारण आता मुद्दा भारतविरोधाचा आहे, मोदीविरोधाचा आहे.
 
 
 
 
jef
 
 
 
अदानी समूहा’ने ‘एनडीटीव्ही’मध्ये २९ टक्के हिस्सा खरेदीच्या तयारीची घोषणा करताच देशभरातील डाव्या टोळ्या सुतकात गेल्या. इतकी वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप व रा. स्व. संघाविरोधात तथाकथित पुरोगामित्वाचा, उदारमतवादाचा, धर्मनिरपेक्षतेचा आवाज बुलंद करणार्‍या ‘एनडीटीव्ही’मध्ये ‘अदानी समूहा’नेच हिस्सा खरेदी केल्यास कोणाचा ‘प्राईम टाईम’ आशेने पाहायचा, याचे कोडे त्यांना पडले. कारण, डाव्या टोळीवाल्यांच्या मते, उद्योगपती गौतम अदानी नरेंद्र मोदींचे जीवाभावाचे मित्र आहेत, नुसते मित्रच नाही तर मोदींच्या आशीर्वादाने देशाची लूटमार करणारे दरोडेखोर आहेत. त्याच ‘अदानी समूहा’कडे ‘एनडीटीव्ही’ने आपली मालकी सोपवली, तर मग मोदी, शाहंविरोधात कोण गळा काढणार? आपण छाती पिटली, तर ते कोण दाखवणार? असे प्रश्न उपस्थित झाले.
 
त्यामुळेच ‘अदानी समूहा’ने ‘एनडीटीव्ही’तील हिस्साखरेदीची योजना जाहीर करताच, डाव्या टोळक्याने आपला नेहमीचा धंदा अधिक जोराने सुरु केला. तो धंदा म्हणजेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानींविरोधात आतापर्यंत जे जे वाईटसाईट लिहिले तसेच पुन्हा पुन्हा लिहिण्याचा! आजही या टोळक्यातल्यांचे फेसबुक, ट्विटरादी समाजमाध्यमी खाते उघडून बघितल्यास तिथे फक्त आणि फक्त मोदी व अदानीविरोधातील द्वेषपूर्ण व बदनामीकारक मजकूरच दिसेल, अन्य काही नाही. पण, अदानींनी ‘एनडीटीव्ही’त हिस्सेदारी मिळवण्याचा प्रयत्न केल्याने फक्त भारतातल्याच नव्हे, तर जगभरातल्या डाव्या धेंडांनाही चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यांनीही त्याविरोधात रडारडीला सुरुवात केली. मात्र, यात सर्वाधिक बेशरमपणा केला, तो ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने!
 
समोर आलेल्या वृत्तानुसार ‘एनडीटीव्ही’चे प्रमोटर राधिका आणि प्रणॉय रॉय ‘अदानी समुहा’ची ‘एनडीटीव्ही’तील हिस्साखरेदीची प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. छद्म उदारमतवाद्यांसह त्याच टोळक्यातले माध्यम कर्मचारी अदानी समुहाचे एखाद्या राक्षसासारखे चित्रण करत आहेत. अदानी समुह कायदेशीर मार्गाने नव्हे तर कुठल्यातरी अन्य मार्गाने ‘एनडीटीव्ही’तील हिस्सा खरेदी करत असल्याचा त्यांचा दावा आहे, तसे ते बोलत, लिहितही आहेत. तसेच इतरही नियतकालिके, अनियतकालिके, वृत्तसंकेतस्थळे वगैरे बेछूट होऊन ‘अदानी समूहा’विरोधात वैयक्तिक शत्रुत्व असल्यासारखे बकवास करताना दिसत आहेत. त्यात ‘अ‍ॅमेझॉन’चा संस्थापक असलेल्या ‘जेफ बेझोस’ यांच्या मालकीचे अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्र अग्रेसर आहे.
 
‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रकाशित केलेल्या लेखात ‘अदानी समूहा’चा ‘एनडीटीव्ही’वरील दावा अनैतिक असल्याचे म्हटले आहे. ‘फिअर्स फॉर इंडिपेन्डन्ट मीडिया इन इंडिया अ‍ॅज टायकून आईज् मेजर न्यूज चॅनेल’ या शीर्षकाचा लेख ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रकाशित केला असून त्यासंबंधीच्या समाजमाध्यमांवरील ‘कॅप्शन’मध्ये, तर ‘गौतम अदानी, एशियाज् रिचेस्ट मॅन अ‍ॅण्ड अ‍ॅलाय ऑफ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, मेड ए होस्टाईल बिड फॉर एनडीटीव्ही इन ए मुव्ह दॅट कुल्ड रिशेप इंडियाज् मीडिया लॅण्डस्केप’ असा निराधार मजकूर लिहिला आहे. ‘एनडीटीव्ही’ची आतापर्यंतची कारकिर्द पाहता तो माध्यमसमूह मुख्य प्रवाहातील असूनही कधीही स्वतंत्र नव्हता, तर त्यावर फक्त डाव्यांचे, तथाकथित पुरोगामी, उदारमतवादी, धर्मनिरपेक्षतावाल्यांचीच चलती होती. म्हणूनच तर अन्य माध्यमांना गोदी मीडियासारखी विशेषणे लावणार्‍या मुठभरांमध्ये ‘एनडीटी’व्ही अफाट लोकप्रिय आहे. मात्र, ‘अदानी समूहा’ने ‘एनडीटीव्ही’तील हिस्सा खरेदी करण्यावर बेलगाम भाषेत टीका करणार्‍या ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे काय?
 
आपलाही मालक उद्योगपती जेफ बेझोस आहे, हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ विसरले का? जेफ बेझोस यांच्यावरही तसेच आरोप होत असतात, जे अदानींवर केले जातात. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ गौतम अदानींवर टीका करत असेल तर त्याने जेफ बेझोस यांनाही चार गोष्टी सुनावल्या पाहिजे. तेवढी हिंमत ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहे का? पण, ते तसे करणार नाही. कारण, आता मुद्दा भारतविरोधाचा आहे, मोदीविरोधाचा आहे. म्हणूनच ऐन कोरोना काळात ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भारताविरोधात फक्त खोट्या, नकारात्मक बातम्या चालवल्या, पण नंतर मात्र त्यांच्या बदमाशगिरीची पोलखोल झालीच.
 
‘वॉशिंग्टन पोस्ट’प्रमाणेच इतरही जागतिक स्तरावरील माध्यमांनी ‘अदानी समूहा’च्या ‘एनडीटीव्ही’तील हिस्साखरेदीवर टीका करत आपण डाव्या टोळीवाल्यांतलेच असल्याचे सिद्ध केले आहे. या योजनेला तथाकथित स्वतंत्र माध्यमांवर हल्ला करण्यासाठीचे एक दुष्ट ‘राजकीय+कॉर्पोरेट’ षड्यंत्र म्हणून त्यांच्याकडून चित्रित केले जात आहे. मात्र, एनडीटीव्ही स्वतःच दीर्घकाळापासून खोटा मजकूर प्रसारित करणारे, विशिष्ट अजेंडा पुढे रेटणारे, डाव्या विचारांची तळी उचलणारे, दगडफेक्यांपासून धर्मांध दहशतवाद्यांना मासूम ठरवणारे, माध्यम म्हणून कुख्यात आहे. पण, ते मान्य न करता, एनडीटीव्हीला स्वतंत्र माध्यम म्हणून प्रमाणपत्र वाटण्याचे उद्योग डाव्या टोळीवाल्यांकडून केले जात आहेत. तथापि, त्या प्रमाणपत्रात कसलेही तथ्य नाही.
 
तरीही ब्रिटनमधील ‘द गार्डियन’नेदेखील, ‘मीडिया फ्रिडम फिअर्स इन इंडिया आफ्टर मोदी अलाय अदानी बाईज् २९% स्टेक इन एनडीटीव्ही’ या शीर्षकाने लेख प्रकाशित केला. म्हणजेच, नरेंद्र मोदींचा या सगळ्याशी काहीही संबंध नसला तरी फक्त त्यांची व अदानींचीही बदनामी करत राहायची, असा हा प्रकार. ‘रॉयटर्स’नेदेखील, ‘टेकओव्हर ऑफ एनडीटीव्ही बाय इंडियाज् रिचेस्ट मॅन वरीज् जर्नालिस्ट्स’ या शीर्षकाने लेख लिहिला. यातून या सर्वांचाच, गौतम अदानी वा ‘अदानी समूहा’ला मोदी सरकारची भयानक ‘कॉर्पोरेट’ शाखा ठरवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. डाव्यांचे टाळके आणि टोळके असाच विचार करते,
‘अदानी समूहा’मुळे उभे राहणारे उद्योगधंदे, मिळणारे रोजगार, देशाच्या ‘जीडीपी’ वाढीत दिले जाणारे योगदान, सरकारी तिजोरीत भरला जाणारा प्रचंड कर, असे काहीही त्यांना दिसत नाही. फक्त उद्योगपती आहे ना, मग करा बदनाम, एवढा एककलमी कार्यक्रम या लोकांनी हाती घेतल्याचे दिसते. पण, जेफ बेझोसविरोधात ‘वॉशिंग्टन पोस्ट’ बोलणार नाही वा आपल्या टोळक्यातल्यांविरोधातही बोलणार नाही. तिथे त्यांची दातखीळ बसते, लेखणीतील शाई संपते वा किबोर्डची बटणे तुटतात-फुटतात. त्यावेळी त्यांना माध्यम स्वातंत्र्य आठवत नाही. माध्यम स्वातंत्र्याचा दांभिकपणा म्हणतात तो हाच, माध्यम स्वातंत्र्य संकटात आल्याचे म्हणतात ते हेच!