झपाट्याने अधोगतीकडे!

    दिनांक : 27-Aug-2022
Total Views |
 
मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त झपाट्याने अधोगतीकडेच जायचे, हे उद्धव ठाकरेंचे एकमेव लक्ष्य राहिल्याचे दिसते. त्याचमुळे आज त्यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली तरी त्याचा धक्का बसत नाही.
 
 

adhogati 
 
 
माणसाचे कर्तृत्व संपले की त्याला आपली जात आठवते. अशी माणसे आपलेे स्वतःचे काही कर्तृत्व नसले तरी एकेकाळी आपल्या जातीत जन्माला आलेल्या, शूरवीरांच्या पराक्रमाच्या कथा सांगून फुशारक्या मारण्याची कामे करायला लागतात. परिणामी आपल्या जातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या कथा सांगून फुशारक्या मारणे, हाच या लोकांचा अस्मितेचा धंदा होऊन बसतो.
 
बाकी आपल्या जातीची अस्मिता म्हणजे काय, त्याची जपणूक कशी केली पाहिजे, त्या अस्मितेंतर्गत येणार्‍या जातबांधवांच्या उन्नतीसाठी काय करायला हवे, याची कसलीही भ्रांत त्यांना नसते वा त्यासाठी काही करण्याचीही तयारी नसते. तरीही भारतासह महाराष्ट्रात पूर्वापारपासूनच अशा फुशारक्या मारणार्‍यांची चलती आहे.
 
‘आमच्या अमक्याने तमके काम केले होते, म्हणून आम्हीही त्यांच्याच इतके कर्तृत्ववान आहोत,’ असे सांगण्याचाही या लोकांचा फुशारक्यांमागचा उद्देश असतो. त्यातून ‘तुम्ही जसा आमच्या जातीतल्या पूर्वजांना मान-सन्मान देता, तितकाच मान-सन्मान आम्हालाही द्यावा आणि न दिल्यास तो आमच्या शूरवीरांचा अपमान समजला जाईल,’ अशा मानसिकतेतही ही माणसे जगत असतात. शिवसेनेची आताची अवस्था अगदी तशीच झालेली आहे, तर संभाजी ब्रिगेड सुरुवातीपासून आजपर्यंत त्याच अवस्थेत आहे.
 
इतकी दिवस हे दोन्हीही जात वा अस्मितेचे राजकारण करणारे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले होते. पण, आता मात्र राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोण आपला पक्ष सर्वात आधी रसातळाला नेतो, याची जणू स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी आपल्या वडिलांच्या हिंदुत्वाच्या शिकवणीला विरोध करणार्‍या आणि एकेकाळी स्वतःलामाफी मागायला लावणार्‍या संभाजी ब्रिगेडशीच युतीची घोषणा केली.
 
मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीत आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण, गेल्याच महिन्यात तथाकथित पुरोगामी अन् फुले-शाहु-आंबेडकरवादी सुषमा अंधारेंना उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत प्रवेश दिला होता. सुषमा अंधारेंनी तोपर्यंत स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवून घेत असलेल्या शिवसेनेवर आणि हिंदुत्ववादी विचारांवर अतिशय हीन भाषेत टीका-टिप्पणी केली होती. पण, त्यांनाही उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत प्रवेश दिला.
 
सुषमा अंधारेंनंतर आता आपले अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तद्दन जातीयवादी, विखारी जातीयवादी संभाजी ब्रिगेडची मदत घ्यायलाही मागेपुढे पाहिले नाही. यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनगटातले बळ जवळपास संपल्याचे अन् त्याला टेकू देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या जातीयवादाची गरज असल्याचेच दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे, सुषमा अंधारे, संभाजी ब्रिगेड आदी स्वतःला आपापल्या जातीच्या आवाजाचे प्रतिनिधी मानतात. लोकशाही व्यवस्थेत तसे म्हणवून घ्यायला कोणाची काही हरकत असण्याचेही कारण नाही. पण, यापैकी कोणीही आपल्या जातीच्या, आपल्या जातीतल्यांच्या सर्वंकष उत्थानासाठी झटल्याचे उदाहरण पाहायला मिळत नाही.
 
त्यासाठी आपल्या जातबांधवांपुढील शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याची, उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. पण, तसे काही न करता, तुमच्यासमोर शिक्षण, आरोग्य वा रोजगाराचे प्रश्न अन्य जातींमुळे विशेषतः ब्राह्मणांमुळे निर्माण झाले, तुमच्यावर आताची कंगाल परिस्थिती ओढावली ती अन्य जातींमुळे विशेषतः ब्राह्मणांमुळे, असे सांगत द्वेष पसरवण्याचेच त्यांचे ध्येय असते. संभाजी ब्रिगेडने आपल्या व्याख्यानातून, पुस्तकांतून वा आंदोलनातून फक्त ब्राह्मणविरोधी विखार पसरवला, ब्राह्मणविरोधी जनमत तयार करण्याचे काम केले. त्यासाठी संभाजी ब्रिगेडने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसह अन्य इतिहासकारांनी लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नाकारला व इतिहास पुनर्लेखनाचे हास्यास्पद काम केले, त्यालाच आजकाल ‘पिवळी पुस्तके’ म्हटले जाते.
 
ब्राह्मण द्वेषातून संभाजी ब्रिगेडने 2004 साली पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थे’वर हल्ला केला, लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवला, रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडली, नंतर पुण्यातील संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरींचा पुतळा तोडला, बाबासाहेब पुरंदरेंवर शाईफेक केली. सर्वात कहर म्हणजे, संभाजी ब्रिगेडच्या प्रवर्तकांपैकी असलेल्या पुरुषोत्तम खेडेकरांनी तर ब्राह्मण महिलांविषयी अतिशय आक्षेपार्ह व चिथावणीखोर लेखन केले.
 
त्याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारेंनी हिंदू देव-देवता, ब्राह्मण समाजावर वाईट भाषेत व्याख्याने दिलेली आहेत. त्यांची नवरात्र व देवी आणि हिंदूंच्या उपवासावरील टीका तर अतिशय विकृत होती. अशा दोन्ही हिंदूविरोधी, विशिष्ट जातविरोधी प्रवृत्तींना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने प्रवेश दिलेला आहे. खरे म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच युती सरकारच्या काळात ब्राह्मण मुख्यमंत्री बसवण्याचे धाडस करून दाखवले होते.
 
आज मात्र त्यांचेच सुपुत्र ब्राह्मण अन् त्याआडून हिंदूविरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसले. कोणत्याही राजकीय पक्षाचा निष्ठावान मतदार किंवा ‘कोअर व्होटर’ असतो, तसा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाही आहे. पण, उद्धव ठाकरेंनी आपला निष्ठावान मतदार, आपले पूर्वज आणि त्यांच्या वैचारिकतेलाच हरताळ फासायचे ठरवले आहे. त्याचमुळे उद्धव ठाकरेंनी आधी हिंदूविरोधी द्वेष पसरवणार्‍या सुषमा अंधारेंना पक्षात प्रवेश दिला, आता हिंदू-हिंदूंत फुट पाडणार्‍या संभाजी ब्रिगेडशी युती केली, त्यानंतर त्यांचे पुढचे पाऊल सर्वसामान्य जनतेने, मतदारांनी ओवाळून टाकलेल्या ‘बामसेफ’, ‘मुस्लीम लीग’, ‘एमआयएम’, ‘पीएफआय’ची राजकीय शाखा ‘एसडीपीआय’पासून थेट नक्षलवादी, नक्षलवाद्यांच्या बंदी घातलेल्या पक्षांपर्यंत युती करण्यासाठीही पडू शकते. कारण, मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त झपाट्याने अधोगतीकडेच जायचे, हे उद्धव ठाकरेंचे एकमेव लक्ष्य राहिल्याचे दिसते. त्याचमुळे आज त्यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली तरी त्याचा धक्का बसत नाही.