चिंता वाढवणारी बातमी! अमळनेरात आढळला स्वाईन फ्लूचा रुग्ण

    दिनांक : 25-Aug-2022
Total Views |
अमळनेर : शहरात स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळून आला तर एल.आय.सी. कॉलनी भागात आणखी एक डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. दरम्यान या भागात नगरपालिकेने रोज धुरळणी आणि सर्वेक्षण सुरू केले आहे. शहरात काही आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देवून माहिती घेतल्याचे वृत्त आहे.

Swain Flu 
 
शहरातील भालेराव नगर मधील रहिवासी पंचायत समितीचा एक कर्मचारी निमोनियाचे लक्षणे जास्त आढळून आल्याने धुळे येथे उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी केल्यानंतर या कर्मचार्‍याला स्वाइन फ्ल्यू निष्पन्न झाला आहे. त्याला उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. दरम्यान विद्यानगर व एल.आय.सी. कॉलनी परिसरात डेंग्यूने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला व एक महिला डेंग्यू सदृश्य आढळल्यानंतर आणखी एक रुग्ण डेंग्यू सदृश्य आढळून आल्याने खळबळ माजली आहे. नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.
 
शहरातील स्टेशन रोड, श्रीराम नगर, बंगाली फाईल भागात प्रचंड झुडपे वाढली आहेत. यामुळे डांसांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. पालिकेने या भागातील झुडपे कापावीत व परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.