आता करुणा नाहीच...!

    दिनांक : 25-Aug-2022
Total Views |
वेध
राज्यात सत्तांतर होऊन बरेच दिवस लोटलेत. मात्र, सत्ता हातून गेल्याची खंत काही कधीकाळच्या सत्ताधार्‍यांच्या मनातून जाताना दिसत नाही.
 
 
Shinde
 
 
 
आता फासे उलटे पडले आणि सत्तेत असलेल्यांना विरोधक म्हणून विधान भवनाच्या पायर्‍यांवर येत घोषणा देण्याची वेळ आली. सत्ता बदल ही एक प्रक्रिया असली, तरी त्यानंतर एकमेकांचे काढले जात असलेले उखाळे रंजक ठरत आहेत. विशेष करून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले भाषण आणि त्यात माजी मंत्री Dhananjay Munde धनंजय मुंडेंसाठी 'करुणे'वरून केलेले मिश्कील भाष्य कदाचित पुरे झाली आता 'करुणा' असेच सांगणारे असावे. शेवटी उताविळपणाचे चटके तर बसणारच ना!
 
राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. नवा गडी नवा राज असल्याने या अधिवेशनाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे... अगदी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेपासून प्रचंड मोठा हादरा बसलेल्या शिवसेनेच्या कृतीपर्यंत! प्रत्यक्षात अधिवेशनाच्या मागील काही दिवसात ज्यांना खूप काही सोसावे लागले, अशा शिवसेनेचे आमदार फारसे आक्रमक नाहीत, जेवढे राष्ट्रवादीचे दिसताहेत. विरोधात असताना विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून सरकारविरोधात नारेबाजी करणे हा शिरस्ता आहे. त्यामुळे ते नवल नाही. कधी कुणी म्याऊचा आवाज काढतो तर कधी आणखी काही. पण सध्या विधान भवनाच्या पायर्‍यांवर दिल्या जाणार्‍या घोषणांमध्ये गगनभेदी आवाज ऐकायला येतो आहे, तो राष्ट्रवादीच्या आमदारांचा. कधी गद्दार, तर कधी 50 खोके एकदम ओक्के म्हणून सत्ताधारी आमदारांना चिडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांकडून केले जात असलेले हे कृत्य काही वेगळे नाही. अधिक तळमळीने करणे अपेक्षित होते, ते शिवसेनेच्या आमदारांनी. परंतु चित्र वेगळेच आहे. राष्ट्रवादीचे आमदार पोटतिडकीने घोषणा देत विरोध दर्शविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. राष्ट्रवादीच्या आवाजापुढे सेना आमदारांचा मात्र आवाज 'दाबल्या'च गेला आहे. त्यातही आघाडीवर आहेत, ते राष्ट्रवादीचे माजी मंत्री Dhananjay Munde धनंजय मुंडे. याच मुंडेंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात खरपूस समाचार घेतला. मात्र, यावेळी त्यांनी मिश्कीलपणे बोललेल्या दोन ओळी बरेच अर्थ काढण्यासाठी पुरेशा आहेत.
धनंजय मुंडे हे जानेवारी 2021 मध्ये चर्चेत आले होते, ते करुणा शर्मा प्रकरणामुळे! करुणा शर्मा यांनी अनेक आरोप तत्कालीन आघाडी सरकारातील मंत्री मुंडे यांच्यावर केले. दोन्ही बाजूने तक्रारी झाल्या. दोनदा करुणा यांना अटकही झाली. त्यावेळच्या विरोधकांकडून Dhananjay Munde धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. परंतु सत्तेच्या जोरावर मुंडे सुरक्षित राहिले. पण आता हे करुणा प्रकरण पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंडे यांना 'त्यावेळी देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखविली होती, असे म्हणत कदाचित आता ही दाखविली जाणार नाही, असेच सांगण्याचा प्रयत्न केला. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे प्रकरण सर्वश्रुत झाले. मुंडे यांनी त्यांच्या संबंधाची कबुलीही दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर झालेले आरोपही महाराष्ट्राने पाहिले. पण तेव्हा सत्ता असल्याने कदाचित 'करुणा' दाखविली गेली असावी. मात्र, आता हेच होणार, याची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
राजकारणात विरोध करताना एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करणे राजकीय धर्माला धरूनच आहे कदाचित. ज्याचं जास्ती जळालं, तो शांत असताना इतरांनी अवडंबर करण्याचा प्रकार म्हणजे सत्ता गेल्यानंतर निर्माण झालेल्या अस्वस्थतेची जाणीव करून देणारा आहे. सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचेच यातून उघड होते. मग हा विरोध करताना आपली घरंही काचेची आहेत, याचाही विसर अनेकांना पडून जातो. बहुतेक Dhananjay Munde मुंंडे साहेबांचेेही तेच झाले असावे. ओघाओघात ते बोलून तर गेले; मात्र मुख्यमंत्र्यांनी सुनावल्यानंतर गप्प राहण्याशिवाय दुसरा इलाज त्यांच्याकडे राहिला नाही. काल मंगळवारी तर ते पायर्‍यांवरील आंदोलनातही दिसले नाहीत. आता मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार देवेंद्रजींनी दया, करुणा दाखविली होती, पण 'एकनाथा'कडे या गोष्टी नसल्या तर?
- विजय निचकवडे

- 9763713417