भारताने ठणकावले चीनला!

    दिनांक : 24-Aug-2022
Total Views |
 
‘कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच’ ही म्हण चीनबाबत चपखल लागू पडते. आता या सर्व प्रकारावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला रोखठोक शब्दांत सुनावले आहे. “चीनने भारताबरोबरच्या सीमा करारांची अवहेलना केली असून,यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होत आहे. स्थायी संबंध एकतर्फी नसतात, त्यात परस्पर सन्मान असला पाहिजे,” असे ते म्हणाले.
 

bharat

 
जगावर अधिराज्य गाजवण्याच्या इर्ष्येने दादागिरी, दंडेली करणार्‍या चीनला आपल्यासमोरील सर्वात मोठा अडथळा वाटतो तो भारताचा. कारण, भारत साधनसंपत्ती, मनुष्यबळ, तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संशोधनात चीनच्या तोडीसतोड आहे. भारत आपले वर्चस्व तर मान्य करणार नाहीच, पण सभोवतालच्या व जगभरातल्या छोट्या-मोठ्या देशांनाही चिनी जाळ्याविरोधात एकवटवू शकतो, याची जाणीव चीनला आहे. त्याचमुळे चीन सतत भारताविरोधात हालचाली करत असतो, कधी पाकिस्तानला हाताशी धरून तर कधी नेपाळमध्ये घुसखोरी करून तर कधी बांगलादेश-श्रीलंकेला आर्थिक मदतीच्या सापळ्यात अडकवून.
 
पण, गेल्या काही काळापासून चीनने भारतीय सैनिकांवर हल्ले करण्याचे, सीमा ओलांडण्याचे उद्योगही करून दाखवले. त्याला अर्थातच भारताने जशास तसे उत्तर दिले आणि चीनला माघार घ्यावी लागली. असे असले तरी चीनला अजूनही भारतीय प्रदेश बळकावण्याची स्वप्न पडत असतात. ‘कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच’ ही म्हण चीनबाबत चपखल लागू पडते. आता या सर्व प्रकारावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला रोखठोक शब्दांत सुनावले आहे. “चीनने भारताबरोबरच्या सीमा करारांची अवहेलना केली असून,यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होत आहे. स्थायी संबंध एकतर्फी नसतात, त्यात परस्पर सन्मान असला पाहिजे,” असे ते म्हणाले.
 
2014 साली केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशाच्या परराष्ट्र धोरणात परिवर्तन झाले. चीनसारख्या बलाढ्य प्रतिमा निर्माण केलेल्या देशाशीदेखील डोळ्याला डोळे भिडवूनच चर्चा करणार, हे भारताने ठणकावून सांगितले. त्यालाच अनुसरुन एस. जयशंकर यांनी आताचे विधान केले. कारण, स्वतः कितीही कुरापती केल्या तरी भारताबरोबरील बिघडलेल्या संबंधांना भारतच जबाबदार असल्याचे चीनचे म्हणणे असते. पण, भारताने चीनशी नेहमीच सौहार्दाचे संबंध निर्माण करायला प्राधान्य दिले.
 
जवाहरलाल नेहरुंनी भाबड्या आशावादाने का होईना ‘हिंदी चिनी-भाई भाई’ची घोषणा दिली. पण, त्यांचा विश्वासघात करण्याचे काम चीननेच केले होते. त्यानंतरही अरुणाचल प्रदेश असो वा लडाख असो वा सिक्कीम असो, प्रत्येक ठिकाणी चीनने आगळीक केली. नजीकच्या काळात डोकलाम टापूवरुनही चीनने भारताची खोड काढली, तर गलवान खोर्‍यातही हिंसाचाराला सुरुवात केली. म्हणजेच, भारताशी संबंध खराब करण्यासाठी चीनच आघाडीवर असल्याचे यातून स्पष्ट होते. त्यामुळेच आता जयशंकर यांनी जागतिक मंचावर चीनचा खरा चेहरा दाखवून देत, स्थायी संबंध एकतर्फी नसतात, हे स्पष्ट केले. त्यातून भारताने चीनला इशाराही दिला आहे. इतकी वर्षे आम्ही तुमच्याशी उत्तम संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, पण तुम्ही त्याची जाणीव ठेवली नाही, त्यामुळे यापुढे तुमच्या कृतींमुळे संबंध आणखी वाईट झाल्यास त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल, हेच यातून एस. जयशंकर यांनी चीनला सूचित केल्याचे दिसते.
 
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी, शेजारी कधी बदलता येत नसतात, असे विधान एकदा केले होते. ते सार्वकालिक सत्य असून देशांच्या बाबतीत तर शेजारी बदलण्याची संधीच नसते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध हवे असतात. भारतालाही पाकिस्तानसह चीन वा आपल्या इतर शेजार्‍यांशीही उत्तम संबंध हवे आहेत, त्यासाठी भारताने अनेकदा पुढाकारही घेतला. पण, शेजारीदेखील संबंध चांगले ठेवण्याच्या मानसिकतेचे असायला हवेत! तेच इथे नाहीये. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही भारताबरोबर कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली. पण, पाकिस्तानचा स्वभाव शांततेला अनुकूल नाही, तसेच चीनचेही आहे.
 
चीनलाही शांतता वा इतरांशी चांगुलपणाने वागणे आवडत नाही. त्यामुळेच त्याचे फक्त भारताबरोबरच नव्हे, तर तब्बल 17 देशांशी जमीन आणि सागरी सीमेचे वाद सुरू आहेत. इथेच चीन स्वतः भांडण करायला, खुसपटं काढायला आणि इतरांचे प्रदेश हडपायला तयार असतो, असे दिसते. त्याने भारताबरोबरही तेच केले. त्यामुळे प्रदेशात नेहमी तणाव असतो. दोन वर्षांपूर्वी चीनने गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांवर हल्ला केला, त्यात भारताने चिनी सैनिकांना लोळवलेदेखील. पण, त्यानंतर दोन्ही देशांत कोअर कमांड चर्चेच्या 16 फेर्‍या झाल्या, तरी समस्येवर तोडगा निघाला नाही. कारण, चीनचा दुसर्‍याचे सारे काही बळकावण्याचा स्वभाव. पण, हे जास्त दिवस चालणार नाही, याचेच संकेत जयशंकर यांनी दिले.
 
भारत-चीनमध्ये 90च्या दशकापासून सीमावादाशी संबंधित अनेक करार झालेले आहेत. 1988 मध्ये राजीव गांधींनी चीनचा दौरा करत ‘लुक फॉरवर्ड’अंतर्गत सीमाप्रश्न सोडवण्यासाठी द्विपक्षीय संबंध विकसित केले. 1993 मध्ये नरसिंह राव यांनी चीनचा दौरा केला व चीनबरोबर सीमा शांततेचा करार केला. 1996 मध्ये चीनचे जियांग जेमिन भारतात आले आणि याहीवेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा व सैनिकांशी संबंधित करार झाला. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्या काळातही बैठका, चर्चा झाल्या.
 
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर दोनवेळा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा भारतात पाहुणचार केला, विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पण, भारताने सीमासमस्या सोडवण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे, करारांचे चीनने पालन केलेच नाही. सीमेवर शांतता हवी असेल,तर करारांचे पालन करतानाच दोन्ही देशांनी एकमेकांचा सन्मान करणेही आवश्यक असते, तो सन्मान भारताने केला, पण चीनने नाही. प्रत्येकाचे आपले निहितार्थ असतात, पण दोन्ही देशांनी एकमेकांच्या चिंतेबद्दल संवेदनशील असले पाहिजे. ती संवेदनशीलता भारताने दाखवली, पण चीनने नाही.
 
म्हणूनच पाकिस्तानात ‘सीपेक’ प्रकल्पाचे काम चीनने केले, त्याचा काही भाग पाकव्याप्त काश्मीरातून जात आहे, तर नुकतेच श्रीलंकेच्या बंदरात चीनने आपले टेहळणी जहाज पाठवले. म्हणजेच कुरापत काढण्यासाठीच आमचा जन्म, आमचे अस्तित्व, असेच चीन सांगत आहे. त्या चीनला सुनावण्याचे काम एस. जयशंकर यांनी केले, ते उत्तमच!