नक्की कोणाला हवीय शांतता?

    दिनांक : 23-Aug-2022
Total Views |
 
पाकिस्तानच्या शांततेच्या इच्छेमागे दुसरा कुठला तरी डावही असू शकतो. पाकिस्तान विश्वास ठेवण्यालायक देश नाही, त्यामुळे आता शांततेचा मुद्दा उपस्थित करून त्या देशाचा भारताविरोधात कटकारस्थान करण्याचाही हेतू असू शकतो. म्हणजे, शांततेची चर्चा करायची, त्यातून स्वतःचे चांगले रुप पेश करायचे, जगभरातून निधी लाटायचा, पण तो पैसा देशाच्या उन्नतीसाठी नव्हे, तर पुन्हा भारताविरोधातच वापरायचा, अशी काही पाकिस्तानची योजना असू शकते.
 
 

sharif 
 
"पाकिस्तानला भारताशी चर्चेच्या माध्यमातून कायमस्वरुपी शांतता हवी आहे. काश्मीर प्रश्नावर तोडग्यासाठी युद्धाचा पर्याय असू शकत नाही,” असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतेच व्यक्त केले. चालू महिन्याच्या 14 आणि 15 तारखेला अनुक्रमे पाकिस्तान व भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत भारताने विविध क्षेत्रात प्रगतीची भरारी घेतली, तर पाकिस्तान मात्र अधिकाधिक गर्तेतच जात असल्याचे दिसून आले. आज तर पाकिस्तानची अवस्था इतकी दयनीय आहे की, देश चालवण्यासाठी त्याला दुसर्‍याने भिक म्हणून टाकलेल्या तुकड्यांवर अवलंबून राहावे लागते.
 
पाकिस्तानमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्या देशाची स्थिती अशीच असते. पाकिस्तानमधील प्रत्येक सरकार आपल्या देशाला बिकटावस्थेतून बाहेर काढण्यात अयशस्वीच ठरते. त्यातल्या अनेक कारणांपैकी एक कारण भारताशी गेल्या आठ दशकांपासून पाकिस्तानने स्वतःच्या धोरणाने बिघडवलेले संबंध हेदेखील आहे. त्याचमुळे आज तो देश भारताशी संबंध सुधारू इच्छितो आणि शांतता ठेवू इच्छितो. पण, शहबाज शरीफ यांची शांततेची मागणी कधीही प्रत्यक्षात न येण्यासारखी आहे. कारण, भारत आणि पाकिस्तानमधील अशांततेत काश्मीरचा मुद्दा प्रमुख आहे.
 
भारताने पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीर व लडाख भारताचा अविभाज्य घटक असल्याचे अनेकदा ठणकावून सांगितलेले आहे. अखंड भारताच्या फाळणीवेळी महाराजा हरीसिंग यांनी जम्मू-काश्मीरच्या भारतातील संपूर्ण विलिनीकरणावर स्वाक्षरी केलेली आहे. पण, जम्मू-काश्मीरवर आपलाच अधिकार असावा असे पाकिस्तानला वाटते आणि त्यातूनच दोन्ही देशांत तणाव निर्माण होतो. त्यावरून पाकिस्तानने भारतावर तीन युद्धेही लादली, पण त्यात अर्थातच भारतानेच पाकिस्तानला लोळवले. म्हणूनच आता शाहबाज शरीफ यांनी काश्मीर प्रश्नावर तोडग्यासाठी युद्धाचा पर्याय नसल्याचे म्हटले, पण तसे म्हणताना संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाचा उल्लेख केला. “संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावानुसार, काश्मीर मुद्द्यावरील तोडगा प्रदेशातील स्थायी शांततेशी संबंधित आहे.
 
पाकिस्तानने या प्रदेशात शांतता कायम ठेवण्याचा संकल्प केला आहे,” असे शाहबाज शरीफ म्हणाले. याचाच अर्थ भारत व पाकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावानुसार शांतता नांदावी, असे त्यांना वाटते. पण, शाहबाज शरीफ यांच्या नुसत्या वाटण्याने काही होणार नाही. कारण, दि. 21 एप्रिल, 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पारित केलेल्या प्रस्तावानुसार पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर खाली करून सैन्याला माघारी बोलावण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणजेच संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव पाकव्याप्त काश्मीरलाही लागू होतो आणि त्यानुसार पाकव्याप्त काश्मीर जम्मू-काश्मीरशी जोडावे लागेल. त्यामुळे पाकिस्तान ज्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाआडून भारताशी शांतता कायम राखू इच्छितो, त्या पाकिस्तानने आधी पाकव्याप्त काश्मीर खाली करावे.
 
पण, तसे होण्याची शक्यता कमीच. त्याला पाकिस्तानमधूनच जोरदार विरोध केला जाईल. तसेच, पाकिस्तानी सैन्यही तसे काही करणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधून बाहेर पडण्याला ते आपला पराभव समजतील, संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव वा निर्देश नव्हे. ते पाहता, पाकिस्तान भारताशी आपल्या स्वतःच्या अटींवर शांतता ठेवू इच्छितो, असे दिसते. पण, भारतासमोर त्याची डाळ शिजणार नाहीच.
 
उल्लेखनीय म्हणजे, भारताने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला. पण, पाकिस्तान मात्र भारतद्वेषातूनच अस्तित्वात आलेला आहे. म्हणून त्याने स्वातंत्र्यानंतर लगोलग भारतावर टोळीवाल्यांच्या माध्यमातून हल्ला केला, त्यानंतर 1965, 1971 आणि 1999च्या पाकिस्तानने लादलेल्या युद्धावेळीही भारताने त्या देशाला चारीमुंड्या चित केले. युद्धाद्वारे भारताचे नुकसान करता येणे शक्य नसल्याचे पाहून पाकिस्तानने नंतर 90च्या दशकापासून दहशतवादाचा सहारा घेतला. अगणित दहशतवादी हल्ले करून भारताला आपल्याला हवे तसे वागवता येईल, असे पाकिस्तानला वाटले. पाकिस्तानच्या याच कुरापतखोर व दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या स्वभावामुळे भारताने पाकिस्तानशी सर्वप्रकारच्या चर्चा बंद केल्या. तरी तो देश आता पुन्हा एकदा भारताशी चर्चेच्या माध्यमातून शांतता हवी असे म्हणत आहे, यामागे त्या देशाची बिघडती परिस्थिती कारणीभूत आहे.
पाकिस्तानचा परकीय चलन साठा वेगाने घटत आहे, तो देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, जगभरात कोणाकोणाकडे झोळी पसरूनही त्याच्या पदरात दान पडत नाहीये आणि म्हणूनच पाकिस्तानला भारताशी शांतता हवी आहे, भारताबरोबरील संबंध सुधारायचे आहेत.
 
मात्र, पाकिस्तानच्या शांततेच्या इच्छेमागे दुसरा कुठला तरी डावही असू शकतो. पाकिस्तान विश्वास ठेवण्यालायक देश नाही, त्यामुळे आता शांततेचा मुद्दा उपस्थित करून त्या देशाचा भारताविरोधात कटकारस्थान करण्याचाही हेतू असू शकतो. म्हणजे, शांततेची चर्चा करायची, त्यातून स्वतःचे चांगले रुप पेश करायचे, जगभरातून निधी लाटायचा, पण तो पैसा देशाच्या उन्नतीसाठी नव्हे, तर पुन्हा भारताविरोधातच वापरायचा, अशी काही पाकिस्तानची योजना असू शकते. ते करण्यासाठी जरा उसंत हवी म्हणूनही त्या देशाने शांततेचा मुद्दा चर्चेत आणला असेल. अन्यथा पाकिस्तान, पाकिस्तानचे सरकार व त्याला चालवणारे सैन्य-‘आयएसआय’ वगैरे शांततेचे पाठीराखे अजिबात नाहीत.
 
त्यामुळे शांतता नक्की कोणाला हवी आहे? त्याचे एक उत्तर भारताला शांतता हवी आहे, हे आहेच, पण पाकिस्तानचे काय? तिथे कोणाला हवी आहे शांतता? पाकिस्तानमध्ये वरवर लोकशाही दिसत असली तरी त्या देशाच्या प्रत्येक संसाधावर सैन्याचेच वर्चस्व आहे. ते भारताविरोधात युद्धासाठी जमवलेल्या अफाट निधीच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे. दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित झाल्यास सैन्याला निधी मिळणे बंद होईल व त्याचे वर्चस्वही कमी होत जाईल. ते पाहता, शाहबाज शरीफ यांचा शांततेचा मुद्दा प्रामाणिक नव्हे, तर काही काळापुरता, तयारीसाठी वेळ घेण्यापुरता व नंतर पुन्हा भारताविरोधी कारवाया सुरू करण्यासाठीचाच वाटतो.