‘अग्निपथ’ योजनेला कॉर्पोरेट कंपन्यांचेही पंख

    दिनांक : 20-Aug-2022
Total Views |

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला तीव्र विरोध करण्याचे विरोधकांचे आणि देशविघातक शक्तींचे मनसुबे पूर्णत: फोल ठरले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारने या योजनेविषयी अपप्रचाराला मोडून काढलेच, शिवाय कॉर्पोरेट कंपन्यांनीही ‘अग्निवीरां’ना नोकरीत प्राधान्यक्रम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी सविस्तर...
 
 
 
 
agnipath
 
 
 
 
केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या ‘अग्निपथ’ वा ‘अग्निवीर’ योजनेला मिळणार्‍या वाढत्या प्रतिसादामुळे या योजनेला प्रारंभी झालेला विरोध झाकोळला गेला आहे. त्याचबरोबर विविध प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांनी देखील ‘अग्निपथ’ योजना भविष्यात महत्त्वपूर्ण व विशेष स्वरूपात उपयुक्त ठरणार असल्याने, या योजनेला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.यामुळे ‘अग्निपथ’ योजनेला मोठे पाठबळ प्राप्त होतानाच, योजनांना होणारा विरोध नक्कीच मावळला आहे.
 
यासंदर्भात व्यवस्थापकीय कंपन्यांच्या मते, भारतीय सैन्यदलांतर्गत तिन्ही संरक्षण दलांना शिस्त, क्षमता, कार्यक्षमता, नेतृत्व याची प्रदीर्घ व यशस्वी अशी परंपरा लाभली असून, त्याची भलावण वेळोवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करण्यात आली आहे. त्याला आता ‘अग्निपथ’द्वारा नवे व उपयुक्त स्वरूप दिले जात आहे. कंपन्यांच्या मते, तिन्ही संरक्षण दलाच्या ‘अग्निवीरां’ना त्यांच्या कौशल्य व गुणात्मक विकासाच्या दृष्टीने जे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्याचा मोठा फायदा कंपन्यांना होणार आहे.
 
कारण, या कंपन्यांना शिस्तीसह कौशल्य प्रशिक्षित उमेदवार कर्मचारी म्हणून लाभणार आहेत. तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या वाढत्या गरजा व सैन्यदलातील शिक्षण-प्रशिक्षण व अनुभवाच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, सैन्यदलात प्रशिक्षण वा सेवा करणार्‍यांमध्ये अधिकांश उमेदवार हे तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षितच नव्हे, तर प्राविण्यप्राप्त असतात. वाहनांची दुरुस्ती व निगराणी, वायुदलातील विमान दुरुस्ती, नौदलातील तंत्रज्ञान व इंजिन हाताळणी या विशेष तांत्रिक बाबींशिवाय संरक्षण दलांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित असणार्‍या मालवाहतूक व हाताळणी, संदेशवहन, बांधकाम, आरोग्य सेवा वा प्रशासन अशा विविध खासगी क्षेत्रातील कंपन्यांना अनुभवी कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.
 
बर्‍याच मोठ्या कंपन्या त्यामुळेच त्यांच्या प्रकल्प व्यवस्थापन, पायाभूत सुविधा व बांधकाम, प्रशासन, वाहतूक व्यवस्था अशा क्षेत्रातील अनुभवी जाणकार व मुख्य म्हणजे अनुभवी उमेदवारांच्या निवडीसाठी सैन्यदलात अल्पकालीन सेवा करून निवृत्त होणार्‍या कर्मचारी-अधिकारी यांना नेहमीच प्राधान्य देतात. ‘अग्निवीरां’च्या संदर्भात सुद्धा हीच बाब निश्चितपणे व वेगळ्या संदर्भात लागू होणारी ठरते.
 
सकृतदर्शनी पाहता, सैन्यदलाच्या ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत शारीरिकदृष्ट्या सक्षम व पात्रताधारक तरुणांना सैन्यदलाच्या तिन्ही विभागांतर्गत विविध प्रकारचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साडेचार वर्षांचा असून त्यादरम्यान त्यांना वर नमूद केल्याप्रमाणेच सैन्यदलात विविध प्रकारचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर उपलब्ध प्रशिक्षणार्थी ‘अग्निवीरां’पैकी विशेष उल्लेखनीय पात्रताधारक सैन्यदलात सामावून घेतले जाणार असून उर्वरित उमेदवारांना प्रशिक्षणानंतर सैन्यदलात पुढील संधी मिळणार नसल्याने सेवामुक्त करण्यात येणार आहे व यावर बरीच चर्चा झाली आहे.
 
यासंदर्भात एक धोरणात्मक प्रशासकीय बाब म्हणून सर्वच ‘अग्निवीरां’नाा सैन्यदलात त्यांच्या प्रशिक्षणानंतर संधी मिळणार नाही, ही वस्तुस्थिती असली तरी केवळ त्यामुळेच ‘अग्निवीर’ योजनेचे गुणात्मक मूल्यं कमी होत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, कंपन्या वा औद्योगिक क्षेत्रात उमेदवारी प्रशिक्षण कायदा वा योजनेनुसार ज्याप्रमाणे नवागत उमेदवारांना त्यांच्या एक ते तीन वर्षीय प्रशिक्षण कालावधीनंतर कायम नोकरीची शाश्वती नसली तरी त्यांच्या प्रशिक्षण काळातील कौशल्यामुळे इतरत्र नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. तीच बाब ‘अग्निवीरां’ना लागू होईल.
 
परिणामी प्रत्यक्षात सैन्यदलात पुढील संधी न मिळणार्‍या वा न मिळालेल्या ‘अग्निवीरां’ना त्यांच्या युवावस्थेत सैन्यदलातील शिस्तबद्ध प्रशिक्षणाशिवाय संबंधित तांत्रिक ज्ञान-प्रशिक्षण-सराव याद्वारा कौशल्य विकासाचा महत्त्वपूर्ण फायदा होणार आहे. नव्या संदर्भातील या प्रशिक्षणात संगणकीय प्रणाली व अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे.
 
अशा विशेष व महत्त्वपूर्ण प्रशिक्षण झालेल्या उमेदवारांचा फायदा संबंधित उमेदवारांनाच नव्हे, तर कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापन व कंपन्यांना निश्चितपणे होणार आहे. त्यामुळेच खासगी क्षेत्रातील मोठ्या व्यवस्थापन कंपन्यांशी ‘अग्निवीर’ योजना व ‘अग्निवीरां’चे केवळ स्वागतच केलेले नाही, तर या योजनेच्या पुढील योजनेचा अवलंब करण्यासाठी आपले कृतिशील समर्थन देऊ केले आहे.
 
यासंदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणून सांगायचे झाल्यास, ‘टाटा उद्योग समूहा’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या मते, “ ‘अग्निपथ’ हा तरुणाईला शिस्त व कौशल्य विकासाचा मार्ग दाखविणारा उपक्रमच नाही, तर त्याद्वारा देशाच्या उद्योग आणि प्रशिक्षण व तांत्रिक क्षेत्रातल्या प्रगत ज्ञान असणारे युवा उमेदवार मिळवण्याचा मोठा फायदा होणार आहे.”
 
‘महिंद्रा’चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही ‘अग्निपथ’ व ‘अग्निवीर’ यांसारख्या केंद्र सरकारच्या नव्या व आगळ्या वेगळ्या उपक्रमाला सुरुवातीच्या टप्प्यात व मूळ विषय समजून न घेताच झालेल्या आक्रस्ताळ्या विरोधाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. ‘महिंद्रा’मध्ये प्रशिक्षित ‘अग्निवीरां’ची आवर्जून निवड करण्यात येईल, असे आपले धोरण स्पष्ट करीत असतानाच ‘अग्निवीरां’चे नेतृत्त्व शारीरिक क्षमता, शिस्त व सामूहिक काम करण्याची प्रवृत्ती या कौशल्य गुणांचे आम्ही आवश्य स्वागत करू, असे आनंद महिंद्रा यांनी नमूद केले आहे.
 
‘जेएसडब्यू’ गटाचे अध्यक्ष नवीन जिंदाल यांच्यानुसार समाजातील नकारात्मक वृत्ती आणि प्रवृत्तींनी ‘अग्निपथ’ योजनेमुळे समाजातील युवा वर्गाचे व त्याद्वारे देशाचे लष्करीकरण करण्याचा घाट असल्याचा अनाठायी प्रचार करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र या प्रशिक्षणाद्वारे युवकांना प्रशिक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने संघटित करण्यात येणार आहे. त्यामुळे देश व समाजाचा अविभाज्य भाग असणार्‍या औद्योगिक क्षेत्राला त्याचा अपरिहार्यपणे लाभ होणार आहे.
 
‘आरपीपी’ उद्योग समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेचे स्वागत केले असून ‘अग्निवीरां’चे स्वागत करण्याची सहर्ष तयारी दाखवली आहे. अशीच धारणा ‘बायोकॉन’च्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका किरण शॉ मुजूमदार यांनी व्यक्त केली आहे.
 
या सार्‍या पार्श्वभूमीवर निवडक व विशिष्ट उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या गट-समूहांनी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला केलेल्या विरोधाचा फोलपणा देशासमोर आला असून उद्योगप्रमुखांच्या ठोस समर्थनाने या योजनेला मोठे पाठबळ लाभले आहे.
- दत्तात्रय आंबुलकर