पोस्ट विभाग : देश-विदेशात पोहोचणार बहिणींच्या संरक्षणाचा धागा

    दिनांक : 02-Aug-2022
Total Views |
जळगाव : जिल्ह्यातील ७६ पोस्टांमधून दीड हजार वॉटरप्रूफ लिफाफ्यांद्वारे देश-विदेशात बहिणी आपल्या भावांसाठी संरक्षणाचा धागा पाठवत आहेत. संपूर्ण भारतात सध्या पावसाळी दिवस असल्याने आपल्या भावापर्यंत सुरक्षित राखी पोहोचावी यासाठी पोस्टातील वॉटरप्रूफ लिफाफ्यांद्वारे बहिणी आपल्या भावासाठी राख्या पाठवत आहेत.
 

postal_department
 
रक्षाबंधन पावसाळ्यात येत असल्याने भावापर्यंत राखी सुरक्षित व कोरडी राखी पाठवण्यासाठी जिल्ह्यातील ७६ पोस्टात दीड हजार वॉटरप्रूफ लिफाफे आले आहेत. महिला वर्गाकडून देशासह विदेशात राख्या पाठवण्यात महिला आघाडीवर आहेत. यात जळगाव विभागातील ४२ पोस्टांना हजार, तर भुसावळ विभागासाठी ५०० वॉटरप्रूफ लिफाफे आले आहेत. यातील अनेक लिफाफ्यांतून राख्या पाठवण्यात आल्या आहेत.
 
पोस्टात मिळणाऱ्या वॉटरप्रूफ लिफाफ्याची किंमत १० रुपये आहे. देशात या लिफाफ्यांतून राखी पाठवण्यासाठी राखी पॅक झाल्यावर २० ग्रॅमपर्यंत १० रुपयांचे तिकीट लावावे लागते. त्या पुढील प्रति २० ग्रॅमला ५ रुपये तिकीट खर्च येतो. तर विदेशात राखी स्पीडपोस्टातून पाठवण्यात येते. यासाठी अंतरानुसार खर्च आकारण्यात येतो.
 
देशाच्या कानाकोपऱ्यासह विदेशात राखी पाठवण्यासाठी महिलांना पोस्टाचा आधार वाटतो. त्यामुळे महिला देशांत तर राख्या पाठवत आहेतच याचबरोबर विदेशातील आपल्या भावाला राखी पाठवण्यात या महिला आघाडीवर आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून विदेशात यूएई, टोकियो, कॅनडा, कावासकी, युनियन सिटी, सुसबोटी आदी शहरांत पोस्टाच्या वॉटरप्रूफ लिफाफ्यातून राख्या पाठवण्यात आल्या आहेत.
 
वॉटरप्रूफ लिफाफा कलात्मक डिझाइनद्वारे तयार केला आहे. लिफाफ्यावर हॅपी रक्षाबंधन असे लिहण्यात आले आहे. तसेच या लिफाफ्यावर राखीचे चित्रही चितारण्यात आले आहे. जळगाव विभागाला हजार लिफाफे ४२ पोस्टांकडे मागणीनुसार वितरित केले आहे. अशी माहिती बी. व्ही.चव्हाण यांंनी दिली.