दलितसुरक्षेत काँग्रेस अपयशी

    दिनांक : 18-Aug-2022
Total Views |
 
राजस्थानमध्ये एक नव्हे, तर दलितांविरोधात शेकडो गुन्हे घडले तरी सर्व काही आलबेलच असते. तिथले सरकार दलितविरोधी नसते, तिथली कायदा-सुव्यवस्था ढासळलेली नसते, तिथे जंगलराज अवतरलेले नसते, कारण ते सरकार काँग्रेसचे असते. यावरुनच, राजस्थानमधील घटनाक्रम पाहता, काँग्रेसचा हात दलितविरोधकांसोबतच असल्याचे सिद्ध होते.

dalit 
 
 
हाथरसमध्ये तमाशा करायला गेलेल्या काँग्रेस नेतृत्वाच्या आदेशाने चालणार्‍या राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारमध्ये दलितांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकत्याच एका घटनेत जालोर जिल्ह्यातील शाळा शिक्षकाने अतिशय निर्दयतेने केलेल्या मारहाणीत नऊ वर्षीय दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राजस्थानमधील राजकीय वातावरण तापले असून, विद्यार्थ्याची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे.
 
त्यावरून भाजपने राजस्थानच्या काँग्रेसी गहलोत सरकारला तर घेरलेच, पण काँग्रेसचेच अटरुचे आमदार पानाचंद मेघवाल यांनी तर थेट आपल्या आमदारकीचाच राजीनामा दिला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही राज्यात दलितांवर सातत्याने अन्याय-अत्याचार होत असून त्याने व्यथित होऊन आपण राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. यावरुनच राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या अपयशाची प्रचिती येते तसेच गहलोतकाळात राज्यातील दलितांची स्थिती किती वाईट आहे, हे स्पष्ट होते.
 
पण, उत्तर प्रदेश वा इतर भाजप शासित राज्यांतील दलितांवरील तथाकथित अन्याय-अत्याचाराविरोधात भेटीगाठींची, आंदोलनाची नौटंकी करणार्‍या प्रियांका गांधी, राहुल गांधींना आपल्या पायाखाली काय जळतेय हे दिसत नाही. हाच प्रकार अन्य कुठे झाला असता तर आतापर्यंत दोघा बहीण-भावांनी आपणच दलितांचे एकमेव कैवारी असल्याचे सोंग आणले असते, संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली असती आणि तिथल्या सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर तोंडसुख घेतले असते.
 
पण, आता प्रियांका गांधींची माया आटली, त्यांना नऊ वर्षांच्या निरागस मागासवर्गीय विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू होऊनही कळवळा आला नाही. राहुल गांधींना निदान ट्विटरवर का होईना, राजस्थान सरकारला खडे बोल सुनवावेसे वाटले नाही. उलट दोघा भावंडांच्या मते, राजस्थानमध्ये एक नव्हे, तर दलितांविरोधात शेकडो गुन्हे घडले तरी सर्व काही आलबेलच असते. तिथले सरकार दलितविरोधी नसते, तिथली कायदा-सुव्यवस्था ढासळलेली नसते, तिथे जंगलराज अवतरलेले नसते, कारण ते सरकार काँग्रेसचे असते. यावरुनच, राजस्थानमधील घटनाक्रम पाहता, काँग्रेसचा हात दलितविरोधकांसोबतच असल्याचे सिद्ध होते.
 
शाळा शिकणार्‍या बालकाला इतक्या निर्दयतेने मारहाण करण्यापर्यंत शिक्षकाची मजल गेली. कारण, राजस्थान सरकारची बेपर्वा वृत्ती. त्यामुळे राजस्थानच्या सरकारी शाळांत विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. कधी कधी तर इतकी मारहाण केली जाते की, त्या निरागस बालकांची हाडेही तुटतात. पण, सरकारचा कसलाही वचक नसल्याने त्याचे कोणालाच काही वाटत नाही.
 
संवेदना हरवलेल्या आणि दलितांचे शत्रू ठरलेल्या काँग्रेस सरकारला या सगळ्याची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, असे कधी वाटत नाही. उल्लेखनीय म्हणजे, जालोरमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्याला झालेली मारहाण राजस्थानमधील एकमेव दलितविरोधी घटना नाही. मागासवर्गीय महिलांवर बलात्कार करण्याची, दलितांना मारहाण करण्याची, दलितांची हत्या करण्याची अनेक प्रकरणे राजस्थानमध्ये गेल्या चार वर्षांत घडली आहेत.
 
दलित नवरदेव घोड्यावर बसल्याने त्याला मारहाण झाली, दलित व्यक्तीने मिशी ठेवल्याने हत्येचा प्रयत्न केला गेला, असे प्रकार इथे घडले. पण, चौकशी अन् तपासाच्या नावावर संबंधित प्रकरणाची फाईल फक्त इकडून तिकडे फिरवण्याचे व पीडित दलितांना त्यातच अडकवून ठेवण्याचे काम राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या कारभारात होते. त्यानेच दलितविरोधी कामे करणार्‍यांची हिंमत वाढत जाते. आपण काहीही केले तरी काँग्रेस सरकार आपल्याविरोधात कारवाई करणार नाही, याची खात्री त्यांना वाटते. त्यातूनच राजस्थान अराजकस्थान होत आहे.
 
दलितांवरील अन्याय-अत्याचाराबरोबरच राजस्थानमध्ये देशविघातक, हिंदूद्रोही मानसिकताही फोफावत चालली आहे. अशोक गहलोत काँग्रेसचे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी आपल्या मालकाप्रमाणे स्वतःही सत्तेवर आल्या आल्या मुस्लीम लांगूलचालनाचे उद्योग सुरू केले. हिंदू कुटुंबातील पाच जण पाण्यात बुडून मरण पावले, तर फक्त संवेदना आर्थिक मदत नाही आणि मुस्लीम कुटुंबातील दोन जण पाण्यात बुडून मरण पावले, तर त्यांना संवेदनेसह पाच लाखांची आर्थिक मदत, असा भेदभाव अशोक गहलोत यांनी केलेला आहे.
 
यंदाच्या रिट परीक्षेदरम्यान काँग्रेसशासित राजस्थानात मुस्लीम परीक्षार्थी मुलींच्या हिजाबला आक्षेप घेतला गेला नाही, पण हिंदू परीक्षार्थी मुलींना मात्र ओढणी, कपड्यांना लावलेली बटणे, मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण, केसाची क्लिप, साडीची पिन काढून टाकायला लावले. भाजपने यावरुनच काँग्रेस सरकारवर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला. पण, काँग्रेसी अशोक गहलोतांच्या दाढ्या कुरवाळू राजकारणामुळेच राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल तेली यांची जिहाद्यांनी निर्घृण हत्या केली.
 
त्याआधी कन्हैयालाल यांनी संरक्षण मागितले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले अन् धर्मांधांना हिंसाचाराची खुली सुटच दिली गेली. जिहाद्यांनी केलेल्या हत्येतून त्यांच्या मनात राजस्थान पोलीस, कायदा, व्यवस्था आणि काँग्रेस शासनाची अजिबात भीती नसल्याचे दिसून आले. कारण, राजस्थान सरकारने तोपर्यंतच्या आपल्या कारभारातून मुस्लीम लांगूलचालनाचे अनेक दाखले दिले होते. त्यातून धर्मांधांची भिड चेपली आणि त्यांनी शांत राजस्थानला आपली कर्मभूमी केले.
आधी कधीही राजस्थानमध्ये जिहादी हिंसाचाराची उदाहणे पाहायला मिळाली नव्हती. पण, आता मात्र कन्हैयालाल तेली यांच्या हत्येसह इथल्या करौली, अलवर, जोधपूर, भिलवाडा आणि हनुमानगढपर्यंत हिंदूविरोधी घटना झाल्या. करौलीमध्ये हिंदू नववर्षाच्या बाईक रॅलीवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली, जोधपूरमध्ये तर पोलिसांना चकमा देऊन जिहाद्यांच्या २०० पेक्षा जास्त जणांच्या जमावाने शहरात यथेच्छ उच्छाद माजवला, हनुमानगढमध्ये मंदिराजवळ बसून मुलींना छेडणार्‍या तरुणांना रोखले, तर ‘विश्व हिंदू परिषदे’च्या स्थानिक नेत्यावर हल्ला करण्यात आला.
 
पण, अशोक गहलोत असा काही प्रकार झाल्याचे मान्यच करत नाहीत. त्याचे कारण मुस्लीम मतपेटीत सामावले आहे. म्हणजेच, एका बाजूला दलितांवर कोणी अन्याय-अत्याचार करत असेल, तर त्यावर कठोर कारवाई करायची नाही आणि धर्मांध मुस्लीम हिंसाचार घडवत असतील, तर त्यांनाही जरब बसवायची नाही, असा सगळा प्रकार राजस्थानमध्ये सुरू आहे. राजस्थानमध्ये कोणीही सुरक्षित नाही. यातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी व राजस्थान पूर्वीप्रमाणे शांतीस्थान व्हावे, हीच इथल्या जनतेची अपेक्षा आहे. पण, त्यासाठी अर्थातच, राजस्थानमधील काँग्रेसी सरकारला मतदानाच्या माध्यमातून मूठमाती देणे गरजेचे आहे.