परदेशातील विद्यापीठात शिकवण्याचा मोह पडला महागात

    दिनांक : 17-Aug-2022
Total Views |
प्राध्यापकाला ११ लाखांचा गंडा
 
जळगाव : नॅशनल युनिर्व्हसिटी सिंगापूर येथे नोकरीस लावून देण्याचे आमिष देत एका प्राध्यापकाची भामट्यांनी 10 लाख 87 हजार 488 रुपयात फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Cyber 
 
कांतीलाल पितांबर राणे (वय 49, रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, एम. जे. कॉलेज परिसर) यांची फसवणूक झाली आहे. राणे हे हैद्राबाद येथील के. एल. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत.
 
14 सप्टेबर 2021 रोजी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन फोन आला. आम्ही प्लेसमेंटचे काम करतो, जगभरातील विविध देशांमध्ये असलेल्या नामांकीत विद्यापीठांमध्ये आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो, तुम्हाला अप्लाय करायचा आहे का? अशी विचारणा समोरच्या व्यक्तीने केली. राणे यांना देखील परदेशात नोकरी करायची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस प्रतिसाद दिला. यानंतर सुरू झाली फसवणूकीची कहाणी. राणे यांच्या प्रतिसादानंतर त्यांना वेळोवेळी अनेक मोबाईल क्रमांकावरुन फाेन येऊ लागले.
 
यात शिल्पा, आर. एम, करणसिंग असे नाव सांगून भामटे त्यांच्याशी बोलत होते. सिंगापूर विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी राणेंकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने पैसे मागीतले. भामट्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या राणे यांनी 29 जुलै 2022 पर्यंंत वेळोवेळी पैसे दिले. 10 लाख 87 हजार 488 रुपये दिले गेल्यानंतरही भामटे पैसे मागतच होते. नोकरीच्या बाबतीत समाधानकारक उत्तरे देत नव्हते. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच राणे यांनी दिलेले पैसे परत मागीतले. यानंतर भामट्यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे निश्चित झाल्यानंतर राणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.