आपली ध्वज संहिता (भाग- 7)

    दिनांक : 10-Aug-2022
Total Views |
 
 
 
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, इमारतीवर तिरंगा ध्वजाचा मान व सन्मान राखून फडकावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज संहितेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून विविध भागात ही माहिती देण्यात येत आहे. त्याचा सातवा व अंतिम भाग असा…
 
कलम 11 : ध्वज अर्ध्यावर उतरवणे- पुढील उच्च पदस्थ व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रसंगी त्या प्रत्येकासमोर दर्शविण्यात आलेल्या ठिकाणी त्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या निधनाच्या दिवशी ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. (उच्चपदस्थ व्यक्ती, ठिकाण किंवा ठिकाणे या क्रमाने) : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री- भारतात सर्वत्र.
 
 
tiranga1
 
 
 
लोकसभेचे अध्यक्ष, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती- दिल्ली. केंद्रीय कॅबिनेट मंत्री- दिल्ली आणि राज्यांच्या राजधान्या. केंद्रीय राज्यमंत्री किंवा उपमंत्री- दिल्ली. राज्यपाल, उपराज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, संघराज्य क्षेत्राचे मुख्यमंत्री- संबंधित राज्य किंवा संघराज्य क्षेत्रे यांमध्ये सर्वत्र. राज्यातील कॅबिनेट मंत्री- संबंधित राज्याची राजधानी. कोणत्याही उच्चपदस्थ व्यक्तीच्या मृत्यूची माहिती दुपारी मिळाली असेल, तर अंत्यसंस्कार त्या दिवशी सूर्योदयापूर्वी करण्यात आले नसतील, तरच केवळ वर दर्शविण्यात आलेल्या ठिकाणी नंतरच्या दिवशी सुद्धा ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. वरील उच्चपदस्थ व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले असतील त्या ठिकाणी ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. कोणत्याही उच्चपदस्थ व्यक्तीच्या मृत्यूचा दुखवटा पाळावयाचा असेल, तर केंद्रीय उच्चपदस्थ व्यक्तींच्या बाबतीत भारतात सर्वत्र आणि राज्याच्या किंवा संघराज्य क्षेत्राच्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या बाबतीत संबंधित राज्यात किंवा संघराज्य क्षेत्रात सर्वत्र दुखवट्याच्या संपूर्ण कालावधीत ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील.
 
परदेशी उच्चपदस्थ व्यक्तीच्या मृत्यूमुळे ध्वज अर्ध्यावर उतरविण्याच्या किंवा आवश्यक असेल त्याबाबतीत दुखवट्याचे पालन करण्याच्या प्रत्येक प्रकरणी गृहमंत्रालयाकडून वेळोवेळी विशेष सूचना देण्यात येतील. वरील तरतुदी असताना सुद्धा ध्वज अर्ध्यावर उतरवण्याचा दिवस प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती, राष्ट्रीय सप्ताह (सहा ते 13 एप्रिल जालियनवाला बाग हुतात्मा स्मृती सप्ताह) तसेच भारत सरकारने विनिर्दिष्ट केल्यानुसार राष्ट्रीय आनंदोत्सवाच्या कोणत्याही इतर विशिष्ट दिवशी किंवा राज्यांच्या बाबतीत राज्य स्थापनेच्या वर्धापन या दिवशी येत असेल, तर ज्या इमारतीत मृतदेह ठेवला असेल त्या इमारतीखेरीज इतर कोणत्याही इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर फडकवता कामा नये. तसेच त्या इमारतीवरही मृतदेह तेथे आहे तोपर्यंतच ध्वज अर्ध्यावर ठेवावा. मृतदेह तेथून हलविल्यानंतर ध्वज पूर्ववत पूर्ण उंचीवर फडकवावा. जर दुखवट्यानिमित्त असलेल्या संचलनामध्ये किंवा मिरवणुकीबरोबर ध्वज न्यायचा असेल, तर ध्वजाच्या वरच्या टोकास काळ्या क्रेप कपड्याच्या दोन पट्ट्या स्वाभाविकपणे खाली सोबत राहतील, अशा प्रकारे लावाव्यात. काळ्या क्रेपच्या कापडाचा अशा पद्धतीने उपयोग फक्त सरकारच्या आदेशानेच करता येईल.
 
जेव्हा ध्वज अर्ध्यावर फडकवयाचा असेल तेव्हा तो प्रथम क्षणभर वरच्या टोकास फडकावावा आणि नंतर अर्ध्यावर उतरवावा. तसेच त्या दिवशी ध्वज उतरवून घेण्यापूर्वी तो पुन्हा एकदा वरच्या टोकास नेवून नंतरच खाली आणावा. (ध्वज अर्ध्यावर आणणे याचा अर्थ ध्वजाचे वरचे टोक आणि दोरीचा आकडा (गायलाइन), यामधील अंतराच्या निम्म्यापर्यंत आणि जेथे असा दोरीचा आकडा नसेल तेथे काठीच्या निम्म्यापर्यंत तो उतरविणे असा होय). सरकार, सेनादल, केंद्रीय निमलष्करी दलांमार्फत काढण्यात आलेल्या अंत्ययात्रा या प्रसंगी ध्वज ताटीवर अगर शवपेटीवर आच्छादला पाहिजे. तसे करताना केशरी पट्टा हा ताटीच्या अगर शवपेटीच्या डोक्याकडील बाजूस ठेवला पाहिजे. ध्वजाचे मृतदेहाबरोबर दहन वा दफन करता कामा नये. परदेशी राष्ट्रप्रमुख  किंवा परदेशी सरकार प्रमुखांच्या मृत्यूच्या प्रसंगी त्या देशाच्या अधिस्वीकृत भारतीय मंडळास जरी ती घटना प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती, राष्ट्रीय सप्ताह (सहा ते 13 एप्रिल जालियनवाला बाग हुतात्मा स्मृती सप्ताह) किंवा भारत सरकारने विनिर्दिष्ट केल्यानुसार राष्ट्रीय आनंदोत्सवाच्या कोणत्याही दिवशी घडली, तरी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवता येईल. त्या देशाच्या अन्य कोणत्याही उच्च पदस्थ व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रसंगी स्थानिक प्रथा किंवा शिष्टाचार (आवश्यक असेल त्या बाबतीत ती राजनैतिक सेनेच्या डीनकडून निश्चित करण्यात यावी) यानुसार त्या देशातील विदेशी मंडळाचा राष्ट्रध्वज सुद्धा अर्ध्यावर उतरविणे आवश्यक असल्याशिवाय त्या मंडळाकडून राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. (समाप्त)
 
 
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,
धुळे