आपली ध्वज संहिता (भाग- 6)

    दिनांक : 10-Aug-2022
Total Views |
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज संहितेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून विविध भागात ही माहिती देण्यात येत आहे. त्याचा सहावा भाग असा…
 
 
 
tiranga1
 
 
 
कलम आठ, सरकारी इमारतींवर, शासकीय निवासस्थानांवर ध्वज लावणे – सामान्यत: उच्च न्यायालये, सचिवालये, आयुक्तांची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, तुरुंग व जिल्हा मंडळे, नगरपालिका व जिल्हा परिषदा व विभागीय, सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांची कार्यालये यासारख्या इमारतींवरच ध्वज लावावेत. सीमा प्रदेशांमध्ये सीमा जकात नाकी, तपासणी नाकी, चौक्यांवर आणि इतर विशेष जागा जेथे ध्वज उभारण्याचे विशेष महत्व आहे, अशा जागी ध्वज लावता येतील. तसेच सीमेवर गस्त घालणाऱ्या सैनिकांच्या छावण्यांवरही ध्वज लावता येतील. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, उपराज्यपाल जेव्हा आपल्या मुख्यालयात असतात तेव्हा त्यांच्या सरकारी निवासस्थानांवर आणि जेव्हा ते आपल्या मुख्यालयाबाहेर दौऱ्यावर असतात तेव्हा ते ज्या इमारतींमध्ये राहतात त्या इमारतींवर राष्ट्रध्वज लावण्यात यावा. मात्र, सरकारी निवासस्थानावर लावलेला ध्वज उच्चपदस्थ व्यक्तींनी मुख्यालय सोडताच खाली उतरविण्यात यावा आणि ते त्या मुख्यालयात परतताना इमारतीच्या मुख्य दाराशी येताच त्या इमारतीवर पुन्हा ध्वज चढवण्यात यावा. जेव्हा उच्चपदस्थ व्यक्ती मुख्यालयाबाहेरील ठिकाणी भेट देण्यास जातात तेव्हा त्या व्यक्ती ज्या इमारतीमध्ये राहत असतील त्या इमारतीच्या मुख्य दारात त्यांनी प्रवेश करताच त्या इमारतीवर ध्वज उभारण्यात यावा आणि त्यांनी ती जागा सोडताच ध्वज उतरविण्यात यावा. मात्र, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती, राष्ट्रीय सप्ताह (6 ते 13 एप्रिल जालियनवाला बाग, हुतात्मा स्मृती सप्ताह) तसेच भारत सरकारने विनिर्दिष्ट केल्यानुसार राष्ट्रीय आनंदोत्सवाच्या दिनी उच्चपदस्थ व्यक्ती मुख्यालयात असल्या किंवा नसल्या तरी अशा सरकारी निवासस्थानांवर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात यावा. जेव्हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री एखाद्या संस्थेला भेट देतील त्यावेळी त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून संस्थेला तेथे राष्ट्रध्वज लावता येईल. जेव्हा राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, सम्राट, राजा किंवा युवराज आणि प्रधानमंत्री यासारख्या परदेशी उच्चपदस्थ व्यक्ती भारतास भेट देतात तेव्हा परदेशी उच्चपदस्थ व्यक्तींचे स्वागत करणाऱ्या खासगी संस्थांना कलम सातमध्ये अंतर्भूत केलेल्या नियमांप्रमाणे संबंधित परदेशी ध्वजासमवेत राष्ट्रध्वज लावता येईल आणि त्याचप्रमाणे अशा उच्चपदस्थ व्यक्ती त्या संस्थेस भेट द्यावयाच्या दिवशी ज्या- ज्या सरकारी इमारतींना भेट देणार असतील त्या इमारतींवरही अशा प्रकारे ध्वज लावता येईल. कलम नऊ, मोटार गाड्यांवर ध्वज लावणे- मोटार गाड्यांवर ध्वज लावण्याचे विशेष अधिकार फक्त पुढील व्यक्तींपुरतेच मर्यादित आहेत.
 
त्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल व उपराज्यपाल, परराष्ट्रातील भारताच्या अधिस्वीकृत प्रतिनिधी मंडळाचे, चौकीचे प्रमुख, प्रधानमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री व उपमंत्री, राज्याचे किंवा संघराज्य क्षेत्राचे मुख्यमंत्री, इतर कॅबिनेट मंत्री, राज्याचे किंवा संघराज्य क्षेत्राचे राज्यमंत्री व उपमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, लोकसभेचे उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, राज्य आणि संघराज्य क्षेत्र विधानसभांचे अध्यक्ष, राज्यातील विधान परिषदांचे उपसभापती, राज्य आणि संघराज्य क्षेत्र विधानसभांचे उपाध्यक्ष, भारताचे मुख्य न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ध्वजसंहितेच्या परिच्छेद 3.44 च्या खंड (5) ते (7) मध्ये नमूद केलेल्या उच्चपदस्थ व्यक्तींना आवश्यक किंवा उचित वाटेल तेव्हा त्यांना आपल्या मोटारीवर राष्ट्रध्वज लावता येईल.   शासनाने पुरविलेल्या मोटारीतून परदेशी उच्चपदस्थ व्यक्ती प्रवास करीत असतील तेव्हा राष्ट्रध्वज त्या मोटारीच्या उजव्या बाजूस लावण्यात येईल आणि परदेशी उच्चपदस्थ व्यक्तीच्या देशाचा ध्वज त्या मोटारीच्या डाव्या बाजूस लावण्यात येईल.
 
कलम दहा : रेल्वे व विमानांवर ध्वज लावणे- राष्ट्रपती जेव्हा देशात खास रेल्वेने प्रवास करीत असतील तेव्हा गाडी जेथून सुटत असेल त्या स्थानकाच्या फलाटाभिमुख बाजूने चालकाच्या कक्षामधून राष्ट्रध्वज लावावा. खास गाडी स्थिर असेल तेव्हाच केवळ किंवा जेथे ती थांबणार असेल त्या स्थानकावर येताना ध्वज लावण्यात येईल. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांना परदेशात घेवून जाणाऱ्या विमानावर राष्ट्रध्वज लावण्यात येईल. ज्या देशात ते जाणार असतील त्या देशाचा ध्वजही राष्ट्रध्वजाबरोबर लावावा. तसेच विमान मार्गात ज्या- ज्या देशांमध्ये थांबेल त्या- त्या देशांचे राष्ट्रध्वजही मैत्री सूचक सौजन्य व सदिच्छा यांचे निदर्शक म्हणून लावावेत.
 
राष्ट्रपती भारतात दौऱ्यावर जाणार असतील तेव्हा राष्ट्रपती ज्या बाजूने विमानात चढणार असतील किंवा उतरणार असतील त्या बाजूस राष्ट्रध्वज लावावा.
 
संकलन 
जिल्हा माहिती कार्यालय,
धुळे