‘लोकमान्य’ तरुणाईचे ताईत व्हावेत म्हणून!

    दिनांक : 01-Aug-2022
Total Views |
सकाळी ‘चहा’त घालायच्या साखरेपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पैशांच्या किमतीबद्दल प्रत्येक बारीकसारीक बाबतीत टिळकांनी आपल्याला खूप काही सांगून ठेवलंय. इंग्रजांनी आपली किती संपत्ती लुटली, याचा हिशेब मांडला होता त्यांनी. आपला हक्काचा पैसा इंग्रज खोर्‍याने ओढून नेत आहेत, याची जाणीव पहिल्यांदा करून देणारे बळवंतरावच. देशाच्या स्वातंत्र्याचा रस्ता दाखवणारेही तेच! ओल्या मातीतली शेती असो किंवा कर्मयोग कसा श्रेष्ठ असं सांगणारी ’गीता.’ टिळक भारतीय संस्कृतीचं अंगांग व्यापून राहिलेत. म्हणून उद्या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगायला हवं येणार्‍या प्रत्येक पिढीला, टिळक समजून घेणं आहे तुमच्यासाठी खूप खूप मोलाचं!
 
Lokmanya Tilak
 
दादरच्या ‘आयडियल’चा किस्सा आहे. प्रसंग दोनेक महिन्यांपूर्वीचा. दुपारी २च्या सुमारास तातडीने काही पुस्तकं हवीत म्हणून आत डोकावले. हवी ती मिळावी म्हणून शोधमोहीम सुरू होती. तेवढ्यात एक पंचविशीचा तरुण आणि त्याची मैत्रीण प्रवेशले. समवयस्कच असावेत दोघेही. त्यांची कुजबूज सुरु झाली.
 
तो तिला म्हणाला, “काहीतरी भन्नाट, वेगळं, हटके वाचायला हवं यार!” ती त्याला, “सस्पेन्स, हॉरर स्टोरीज् बघ ना सापडतात का?” असं म्हणाली. तरुण पोरं ‘सस्पेन्स’ किंवा ‘थ्रिलर’ काहीका असेना, मराठी वाचत आहेत, हे बघून जरा हायसं वाटलं.तेवढ्यात...
 
त्यानं आवाज दिला, “ए, हे बघ, मला सापडलं, गीताचं रहस्य!” “क्या बात हैं यार! हे बरंच जुनं दिसतंय, म्हणजे जुन्या काळातली ‘स्टोरी’ असणार. घेऊया विकत.” तिने त्याला दुजोरा दिला. माझे कान जरा जास्तच टवकारले, न राहवून मी समोर जाऊन बघतो, त्या पोराने ‘सस्पेन्स स्टोरी’ म्हणून हातात घेतलेलं पुस्तक होतं, टिळकांच ‘गीतारहस्य.’
 
मी कमालीचा चक्रावलो, धक्काच बसला मला. तरी कसाबसा त्या पोरांच्या जवळ जाऊन सौम्य स्वरात बोललो त्यांच्याशी. त्यांना वाटणारं ‘गीताचं रहस्य’ आणि टिळकाचं जगविख्यात ‘गीतारहस्य’ यातला फरक समजावला. साधारण माझ्याच वयाची पोरं ती, रागावून उपयोग नव्हता. ‘गीतारहस्य’ नेमकं काय ते सांगितलंच नव्हतं ना त्यांना कुणी!
 
‘आयडियल’ बाहेर आलो. दादरच्या गर्दीप्रमाणे मनात भलभलते विचार दाटीवाटी करू लागले. ‘टिळक, तुमचं पुण्यस्मरण करणारी आमची ही शेवटची पिढी बहुतेक, बहुतेक नाही, नक्कीच!’ हे वाक्य मी ‘लोकमान्य’ सिनेमात ऐकलं होतं, तेव्हा मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. तीच अस्वस्थता पुन्हा जाणवू लागली.
 
बळवंतराव टिळक हा माणूस आमच्या पिढीला पुरेसा सांगितला गेला नाही. शेंगा आणि त्यांची टरफलं या वाक्याने टिळक सुरु झाले आणि स्वराज्याचा जन्मसिद्ध हक्क मिळवण्याच्या संकल्पात लोकमान्य शालेय अभ्यासक्रमातून संपले. ३० कोटी भारत बांधवांच्या मनावर ज्याने आपल्या नेतृत्वाचं गारुड केलं, तो देशाचा पहिला लोकनेता अशा दोन वाक्यात बाजूला टाकला गेला. टिळक गेले, पाठोपाठ टिळक विचाराला पुढच्या पिढ्या पारख्या झाल्या. अधूनमधून हे असे प्रसंग घडतात, खपल्या निघतात आणि मग माझ्या लाडक्या तरुण मित्रांना सांगावसं वाटतं, टिळक समजून घेणं, आहे तुमच्यासाठी खूप खूप मोलाचं!
 
पश्चिमी पारतंत्र्यात पूर्वेच्या स्वातंत्र्यासाठी वाट तुडवत होते दोन जिवलग. टिळकांचा बळवंता आणि आगरकरांचा गोपाळा. पैशाने दोघेही कफल्लक, पण मनात मात्र जिद्द कितीतरी मोठी! हल्ली वृत्तपत्र सुरू करायचे म्हटले, तर आर्थिक गणितं, वशिले, मग त्यातून येणारे व्यवहार, असे नाना व्याप सांभाळावे लागतात. तेव्हा तर हाती भांडवल नसताना ही दोन पोरं आपल्या पोटापाण्यासाठी आणि लोकांच्या शहाणपणासाठी, हा असला ‘उद्योग’ सुरू करत होती. इथे ‘उद्योग’ हा शब्द उपरोधात्मक नाही बरं! बळवंत आणि गोपळाने सुरू केलेला ‘केसरी’ आणि ‘मराठा’ आता आपण म्हणतो तसं ‘पार्टनरशिप’ मधला उद्योग, म्हणजे व्यवसायच होता ना. फक्त त्याच्यामागे तळमळ होती देशप्रेमाची. त्यांच्या देशावर दुसरेच कुणीतरी येऊन बसले होते.
 
आम्ही इंग्रजांची चाकरी करणार नाही, असा जळजळीत स्वाभिमान दोघांनी दाखवला होता, त्यांना आपल्या माणसांसाठी खूप काही करायचं होतं. दोघं पोरं संसारी होती. घरादारावर तुळशीपत्र ठेवून नव्हतं करता येणार हे! म्हणून त्यांनी मधला मार्ग निवडला, आधी शाळा आणि मग वर्तमानपत्र सुरू करून लोकांना शहाणं करण्याचा. आपण अज्ञानी आहोत, हे ज्यांना पटलंय त्यांचं सोडा, इथे रोजचा सामना होता अशांशी, जे स्वतःला आधीच कितीतरी ‘शहाणे’ समजत होते. ‘करिअर’ म्हणून या दोघांनी हा व्यवसाय केला. त्यात त्यांना घर चालवण्यापुरती अर्थप्राप्ती झाली आणि देशाच्या सेवेचं जे वाण घेतलं होतं त्यांनी, त्याच्या पूर्ततेसाठी आपण काहीतरी करतोय, याचं समाधानही पूर्ण मिळालं.
 
‘न्यू इंग्लिश शाळा’ आणि पुढे ‘फर्ग्युसन कॉलेज’ या संस्था आजही दिमाखात काम करत आहेत. अगदी सुरुवातीलाच त्यांनी ठरवलं होतं, गरजेपुरता पगार घ्यायचा आणि गरजा मर्यादित ठेवायच्या. हा नियम काटेकोरपणे त्यांनी पाळला. आपलं ‘करिअर’ निवडताना मानसिक समाधान खरंच मिळतंय का, हा प्रश्न आजच्या अनेक बाळ-गोपाळांना पडलेला दिसेल! पण, नेमकं धोरणं आणि ताळमेळ जमला की, व्यवसायातून आपण हवं तेवढं मानसिक समाधान मिळवू शकतो, स्वतःला वाव देऊ शकतो, हे त्या आजच्या बाळ-गोपालांनी तेव्हाच्या बाळ-गोपाळ जोडीकडून शिकण्यासारखं आहेच ना!
 
तोट्यात म्हणजे ‘लॉस’मध्ये असलेला, कर्जात बुडालेला व्यवसाय कोण कशाला घेईल अंगावर? बळवंतरावांनी ‘केसरी’, ‘मराठा’ जेव्हा स्वतःच्या जबाबदारीवर चालवायला घेतला, तेव्हा तो कर्जात होता. जिद्दीने त्यांनी ‘केसरी’, ’मराठा’ कर्जातून बाहेर काढला, व्यवसाय सचोटीने केला की, तो नफा देऊन जातो, हे सिद्ध करून दाखवलं. ’केसरी’, ‘मराठा’, शाळा-महाविद्यालय यापलीकडे किती व्यवसाय केले टिळकांनी? भारतातला पहिला ‘लॉ क्लास’ बाळ गंगाधर टिळक या मराठी माणसाने सुरू केलेला आहे. ’खासगी क्लासेस’ या व्यवसाय संकल्पनेचे जनक आहेत टिळक! लातूरला त्यांनी ’जिनिंग’ कारखाना काढला. काचकारखाना हा त्यांचा आणखी एक प्रयोग. मुंबईत ‘टाटां’ना घेऊन त्यांनी सुरू केला उद्योग नवा, ‘बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स’च्या ‘शेअर होल्डर’मध्ये टिळकाचं नाव अग्रभागी आहे, ‘गुगल सर्च’ एकदा करून बघा!
 
टिळक जन्मभर असे उद्योग करत राहिले असते, तर तेव्हाचे टाटा, बिर्ला, अंबानी झाले नसते का? झाले असते ना! पण, इथेच फरक आहे. फक्त पैसा कमवून जगले असते ते तर ते ‘लोकमान्य’ झाले असते का? याचा विचार करा. संसाराचा उदरनिर्वाह महत्त्वाचा आहेच, पण त्याच्यापुढे आहे माझा देश! देशावरचं संकट हे माझ्या घरावरचं संकट मानून ते लढले. वर्तमानपत्र सुरू केल्यावर चार-पाच महिन्यांत ही पोरं तुरुंगात गेली, पण त्यांची उमेद कमी झाली का? तर अजिबात नाही. दुष्काळाच्या काळात त्यांनी शेतकर्‍यांसाठी उसासून काम केलं. महाराष्ट्रभर हिंडले. ‘प्लेग’ने त्यांचा मुलगा हिरावून घेतला, तरी एकही अग्रलेख थांबला नाही त्यांचा. रायगडावर शिवउत्सवासाठी आले असताना समजलं त्यांना आता धाकल्याची तब्येतसुद्धा बरी नाही.
 
टिळकांनी बजावलं, इथला कार्यक्रम संपेपर्यंत कुठलीही बातमी मला कळवू नका. इथे त्यांनी दिलं प्राधान्य स्वतःच्या संसाराहून अधिक देशाला! डगमगले नाहीत कुठल्याच संकटात. १८९० ते १९१६ तब्बल २६ वर्षे हा माणूस राष्ट्रीय सभा जहाल मतवादी करण्यासाठी झुंजला. त्याला त्रास देत होते, स्वजन नेमस्तच. पण, तरीही कधीच धीर सोडला नाही बळवंतरावांनी! तीनदा तुरुंगवास भोगला. तुरुंग म्हटल्यावर अवसान गाळणारे भलेभले बघतो आपण आजही. टिळक म्हणाले, “तुरुंग ही माझी विश्रांती आहे.” लोहारग्रामाची भट्टी असते जितकी तापलेली, त्या उष्णतेत कर्मयोगाची किमया सांगणारं शास्त्र लिहिलं टिळकांनी पेन्सिलीने.
 
तीन भाषा शिकले टिळक तुरुंगात. इकडे बळवंतराव तुरुंगात आणि तिकडे त्यांची सहचारिणी सत्यभामा गेली त्यांना सोडून कायमची. पोरं एकटी पडली, तरीही नाही हरला हा माणूस, उठला, उभा राहिला, चालू लागला, धडपडला, पण पुन्हा पुन्हा लढला. कसं सहन केलं असेल, टिळकांनी हे सगळं? प्रश्न पडायला हवा आपल्याला. अचंबा वाटायला हवा की, आपल्यासमोर त्यांच्या तुलनेत काहीच अडचणी नाहीत. तरीही तक्रार करत बसतो आपण. कितीतरी तरुण मुलं ‘फ्रस्ट्रेट’ होताना बघतो मी आजूबाजूला. निराशेतून आत्मघात करेपर्यंत मजल जाते त्यांची. हे ‘टिळकायन’ खरंतर त्यांच्यापुढे गायला हवं. टिळकांची ही सहनसिद्धी आजच्या तरुणांचं ‘मनोबल’ आणि ‘आत्मबल’ दोन्ही वाढवेल.
 
बळवंतराव मुलखावेगळे होते. राजकीय नेते म्हणून जरी ते सिंहासारखे दिसले तरी माणूस म्हणून ते फारफार सहृदयी होते. नामजोशी हे जिवलग मित्र वारल्यावर टिळकांनी जोशांच्या पोराबाळांच्या मुंजीपासून लग्नापर्यंत सगळ्याची जबाबदारी घेतली. स्वतःच्या पैशाने त्यांचा संसारखर्च चालवला.
 
आगरकरांच्या पश्चात त्यांच्या मुलांसाठी टिळकांनी लग्न जुळवली. मित्रांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबासाठी कुणी करतं का एवढं? कुठल्याही नात्यात क्षुल्लक कारणाहून मतभेद होतात, लोक लगेच संवाद थांबवतात. कालपरवा जोडलेली नाती दोनचार दिवसांत तोडली जातात, ‘रिलेशनशिप’ संपतात, हे आपण सर्रास बघतो ना हल्ली. अशावेळी टिळकांनी जपलेल्या या नात्यांना काय नाव द्यायचं?
 
१९०५ साली बडोदानरेश सयाजीरावांकडून टिळकांनी नारायण पेठेत वाडा विकत घेतला. तो गायकवाडवाडा आता ‘केसरी वाडा’ झालाय. सांगायचा मुद्दा हा की, त्या काळात बळवंतराव हा सगळा व्यवहार ‘कॅश’ देऊन सहज करू शकले असते, पण त्यांनी गायकवाडांना मुंबईच्या ‘सिटी बँके’चा ‘चेक’ दिला. तेव्हाच्या काळात प्रचलित नव्हते असे कितीतरी प्रघात बळवंतरावांनी सुरू केले, जे आज आपण सर्रास वापरतो. ‘जॉईंटस्टोक कंपनी’ सुरू करा, असं त्याचं सांगणं असो किंवा ‘शेअर मार्केट’मध्ये गुंतवणुकीचा सल्ला. त्यांनी स्वतःच्या मुलाला कॅमेरा घेऊन दिला होता तेव्हाच्या काळात. मुलींना घरीच का होईना, पण आपले सगळे ऐतिहासिक पौराणिक ग्रंथ शिकवले होते.
 
“पोरांनो, तुम्ही जोडे शिवण्याचा उद्योग जरी सुरू केला, तरी त्यात ‘बेस्ट’ गाठलं पाहिजे. इतकं की, पुण्यात जोडे कुणाकडून घ्यायचे, असं विचारल्यावर, टिळकांकडून! हेच उत्तर यायला हवं,” असं टिळक म्हणाले होते त्यांच्या मुलांना. हल्लीचे किती पालक ’करिअर’ निवडण्याच्या बाबतीत आपल्या मुलांना इतकं स्वातंत्र्य देतील? यश प्रत्येकालाच मिळवायचं आहे, पण त्यासाठी साधना, परिश्रम करायचे हे विसरतो आपण. ‘इन्स्टंट’च्या जमान्यात दोन मिनिटांत ‘यश’ हवं असतं ना प्रत्येकाला. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. अन्न शिजण्यासाठी ते आगीवर उकळावं लागतं. चटके सोसल्याशिवाय ते नाही शिजत. आयुष्याचंही तसंच आहे. योग्य वयात योग्य चटके सोसावे लागतातच. त्याशिवाय ‘चव’दार यशप्राप्ती कशी होणार?
 
मोठमोठ्या कंपन्या चालवताना माणसं कशी सांभाळायची याचं आताशा ‘ट्रेनिंग’ दिलं जातं म्हणे! ‘लीडरशिप डेव्हलपमेंट’ का काय ते म्हणतात त्याला. भारताच्या ३० कोटी जनतेचं नेतृत्व ज्या बाळ गंगाधराने पहिल्यांदा केलं, तेही यशस्वी, तो काय सांगतो बघा.
 
नेत्याने कधीही लोकांना भिऊन मागे राहायचं नाही. पण लोकांना टाकून पुढेही जायचं नाही. लोकांना तयार करत राहायचं. एक-दोन पावलं मागेपुढे राहून लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं. लोकांना तयार करत राहणं हल्ली कमी होतंय. एका समाजाने एका विचाराने झपाटून उभारलेली चळवळ गेल्या १५-२० वर्षांत फारशी दिसली नाही, याला कारण हेच, लोकांना सोबत घेऊन त्यांना तयार करण्यात कमी पडलो आपण. एका विचाराचे लोक घडवण्यासाठी, त्यांना ध्येयवादी बनवण्यासाठी टिळकांनी जीवाचं रान केलं होतं, त्यातून मिळाले होते, त्यांना असंख्य राष्ट्रप्रेमी कार्यकर्ते. आता मात्र नेत्यांच्या मागे तरुणांचे लोंढेच्या लोंढे जाताना हताशपणे बघतो आपण. त्यामागे असतो का कुठला परिपक्व विचार? सोनेरी, चंदेरी, आणि गुलाबी नोटांच्या गुलालामध्ये शोधून तरी सापडेल का अस्मिता, तत्त्वं आणि अस्सल राष्ट्रविचार?
 
टिळकांकडून आणखी किती आणि काय काय शिकायचं? त्यांनी आयुष्यात इतके उद्योग केले, देशासाठी जीवावर उदार होऊन राजकारण केलं. पण, त्यांनी एक गोष्ट कधीही केली नाही. त्यांनी कधीही कुणाला फसवलं नाही, काहीही कुणाचा रुपया बुडवला नाही. टिळकांनी आयुष्यात कधीही लबाडी केली नाही. त्याचं चारित्र्य तेव्हाही नितळ होतं, आजही आहे. आपल्यापैकी प्रत्येकात उतरायला हवा टिळकांचा हा ‘प्रामाणिकपणा.’
 
व्यथित झालेला अर्जुन तेव्हाही होता. आज आपण सारेच ‘अर्जुन’ आहोत. आजचा अर्जुन स्वजनांशी लढायला घाबरत नाही फारसा. त्याचा मोठा लढा सुरू आहे स्वतःशी! स्वतःचं स्वत:सोबत सुरू असलेलं हे द्वंद्व. आज स्पर्धा किती वाढलीये बाहेर. या धावाधावीत आपल्यातील ‘बेस्ट’ लोकांसमोर आणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही सगळी धडपड. त्यासाठी हवी अपार जिद्द. प्रत्यक्ष आभाळ जरी कोसळलं, तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी! असं ठणकावून सांगणारी, टिळकांसारखी ‘बळवंत’ ही जिद्दच आजच्या तरुणांना जगवेल आणि जिंकवेलसुद्धा!
 
मुलांना हव्या असतात, त्यांच्या फायद्याच्या गोष्टी. हे असे आगळेवेगळे ‘टिळक’ दर्शन जर घडू लागले त्यांना, तर आज ना उद्या, ‘बळवंतराव टिळक’ होतील आजच्याही तरुणांच्या गळ्यातील ताईत.आता उसासून, झपाटून, प्रयत्न सुरु करायला हवेत,‘लोकमान्य’ तरुणाईचे ताईत व्हावेत म्हणून !
 
- पार्थ बावस्कर