विश्वसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि रशिया

    दिनांक : 01-Aug-2022
Total Views |
समाज सुधारक, लोककवी, लेखक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची दि. १ ऑगस्ट रोजी जयंती. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात तोपर्यंत उपेक्षित राहिलेल्या समाजातील व्यक्तींची कथा आलेली आहे. त्यांनी अनेक पोवाडेही लिहिले, तसेच त्यांचे साहित्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि येत्या काळात होणार्‍या कार्यक्रमांची माहिती देणारा हा लेख...

Anna Bhau Sathe 
 
कामगारांच्या-कष्टकर्‍यांच्या कष्टाचे खर्‍या अर्थाने चित्रण करणार्‍या आणि महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार असणार्‍या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २०१९ साली संपूर्ण महाराष्ट्रासह जगात अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम झाले. मुंबई ही अण्णा भाऊंची कर्मभूमी राहिली आहे आणि सांगलीमधील वारणेच्या तीरावरील वाटेगाव ही त्यांची जन्मभूमी राहिली आहे. यामुळेच वाटेगावप्रमाणेच मुंबईचेसुद्धा एक वेगळेच महत्त्व अण्णा भाऊंच्या जीवनामध्ये राहतं. २०१९ साली अनेक ठिकाणी झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये मुंबई विद्यापीठाने रशियामध्ये मॉस्को येथे पुश्किन विद्यापीठाबरोबर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती, तीसुद्धा जागतिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाची अशी परिषद होती. मुंबई विद्यापीठाच्या पुढाकारामुळेच हे कार्यक्रम होऊ शकले आहेत.
 
अण्णा भाऊंनी आपलं काही लिखाण रशियाबद्दल केलेले आहे, त्यामध्येसुद्धा स्टालिनग्राडचा पोवाडा, माझा रशियाचा प्रवास आणि अण्णा भाऊंच्या रशियन भाषेत भाषांतरित झालेल्या अनेक कथा आणि कादंबर्‍या यांचा समावेश आहे. यामुळे अण्णा भाऊ रशियामध्येसुद्धा प्रसिद्ध झाले होते. ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. एक अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील कायमस्वरूपी असे स्मारक तेथे उभे राहिले आहे. या स्मारकाच्या स्वरूपात तशाच प्रकारचे एक विचारपीठ-एक आंतराष्ट्रीय स्मारक ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी मास्को’ यांनी उभे केले आहे, असे वाटते.
 
शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी योग किंवा व्यायाम केला जातो, तसेच प्रगती होण्यासाठी, वैचारिकदृष्ट्या विकसित होण्यासाठी आपण महापुरुषांच्या विचारांचे मनन-चिंतन करणे गरजेचं असतं. त्याचाच एक भाग म्हणून अशा महापुरुषांच्या नावाने अशा प्रकारची स्मारके निर्माण करणे, ही त्यांच्या विचारांच्या प्रसारासाठी, विचाराच्या चिंतनासाठीची महत्त्वाची केंद्रे ठरू शकतात.लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या सर्व साहित्यात स्वतः पाहिलेल्या, समाजात अस्तित्वात असणार्‍या व्यक्तींना स्थान दिले आहे. ‘चंदन’, ‘चिखलातील कमळ’, ‘माकडीचा माळ’, ‘मास्तर’, ‘वारणेच्या खोर्‍यात’, ‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’, ‘अलगुज’, ‘अग्निदिव्य’ या सर्व कादंबर्‍या म्हणजे एकप्रकारचा समाजाचा आपल्या संस्कृतीचा इतिहास आहे. तो अशा समाजाचा इतिहास आहे की, ज्यांचा इतिहास कधी कोणी लिहिलाच नव्हता. त्यांच्या कथा-कादंबर्‍यातून असणारी सगळी माणसं जीवंत माणसं होती आणि खरंतर त्यातून एका अर्थानं त्या माणसांचासुद्धा इतिहास आलेला आहे.
 
‘मास्तर’मध्ये त्यांनी आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण केलं आहे. त्यांच्या सर्वच साहित्य कलाकृती अभिजात अशा स्वरूपाच्या आहेत. मग ती ‘फकिरा’ असो किंवा ‘वारणेचा वाघ’ असो. ‘माझी मैना’ असो किंवा ‘मुंबईची’ लावणी असो.पाच पातशाह्यांना पाणी पाजणार्‍या या मातीचे प्रेरणास्थान असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी रशियामध्येसुद्धा गायला होता.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंझार लेखणीस अर्पण केलेली ‘फकिरा’ ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी म्हणता येऊ शकेल. महाराष्ट्र शासनाचे पारितोषिकसुद्धा या कादंबरीस मिळाले आहे.ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, अशा इंग्रज साम्राज्याच्या विरोधात उभा राहिलेल्या गावकुसाबाहेरच्या वस्तीतून आलेल्या वीरांचे चित्रण ‘फकिरा’मध्ये आलेले आहे.आपला समाज, आपली संस्कृती, आपली माती, आपली माणसे ही नेहमीच महत्त्वाची असतात. त्यांचे परकीय शक्तींनी चालवलेल्या शोषणाच्या विरोधाचे चित्रण त्यांनी आपल्या या कादंबरीत केले आहे.
 
‘अग्निदिव्य’ ही त्यांची शेवटची आणि प्रचलित अर्थाने ऐतिहासिक म्हणावी, अशी कादंबरी आहे. तिचे नायक म्हणजे मराठ्यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर हे आहेत. त्यांनी नेसरीच्या खिंडीमध्ये आदिलशाही सरदार बहलोलखान याच्याशी केलेल्या लढाईवर ही कादंबरी आधारलेली आहे.‘माझा रशियाचा प्रवास’ हे रशियाबद्दल मराठी भाषेत लिहिले गेलेले एकमेव प्रवासवर्णन असावं, असं मला वाटतं. साहित्यरत्न अण्णा भाऊ रशियाला गेले असताना तेथे ‘सोव्हिएत स्काय’ या हॉटेलमध्ये अनेक महिने राहिले होते. २०१९ मध्ये मॉस्को-रशिया येथील कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून, भारतातून ३६८ बुद्धिवंत गेले होते. नांदेडच्या आपल्या बांधवांनी अण्णा भाऊंचे एक तैलचित्र ‘सोव्हिएत स्काय’ या हॉटेलमध्ये आठवण म्हणून दिलेले आहे. मास्को येथे नांदेडवरून ४७ जणांचा समूह आला होता. सर्वांना एकत्र करणे आणि समन्वय साधणे, यामध्ये शिवा कांबळे यांचा वाटा महत्त्वाचा होता.
 
अण्णा भाऊंना पारंपरिक अर्थाने शिक्षण मिळाले नसले, तरी समाजाच्या शाळेत जीवनाच्या शाळेत आपल्या अनुभवाच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले आहे. जाणीव आणि नेणिवेच्या सीमेवर त्यांचे साहित्य जन्माला येते. कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेता, ते एक सर्वोत्कृष्ट साहित्यिक बनले आहेत. साहित्यरत्न अण्णा भाऊंनी अशाप्रकारे विश्व विख्यात साहित्यिक बनणे हे जगातील एक आश्चर्यच मानावे लागेल. प्रचलित शिक्षण व्यवस्थेतून अण्णा भाऊंनी शिक्षण घेतले असते, तर कदाचित वास्तव चित्रण करणारे अण्णा भाऊ आपणांस दिसतात तसे दिसले नसते. प्रचलित शिक्षण पद्धती मानवी मनाला मर्यादा घालते. व्यक्तीच्या कल्पनाशक्तीला संकुचित करून टाकते, असं वाटतं. उपनिषदात सांगितल्याप्रमाणे ‘सा विद्या या विमुक्तये’ माणसाला मुक्त करणारी अशी विद्या असते. अशा प्रकारे विद्या प्राप्त केल्याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आहेत. त्यांचे साहित्य हे पूर्णार्थाने मुक्त आहे, ते कोणत्याही धर्माच्या जातीच्या बंधनात अडकलेले नाही. त्यामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागाचं उत्कृष्ट चित्रण येतं.चिरागनगरची भूते येतात, तशाच कृष्णाकाठच्या कथा येतात. विष्णुपंत कुलकर्णी येतात, तसेच सत्याप्पा भोसले आणि ‘फकिरा’ येतात.अशा प्रकारे समाजाच्या शाळेत शिकलेले जागतिक स्तरावरील लेखकाचे दुसरे उदाहरण म्हणजे, मॅक्झिम गोर्की यांचे आहे. त्यामुळेच काहीजण अण्णा भाऊ यांना भारताचे मॅक्झिम गोर्की असे म्हणतात.
 
अण्णा भाऊंच्या लेखणीने भाषेच्या आणि देशाच्या सीमासुद्धा ओलांडलेल्या आहेत.युद्धांच्या इतिहासातील सर्वात मोठे युद्ध आपण ज्याला स्टालिनग्राडचा लढा म्हणतो, ही दुसर्‍या महायुद्धातील सर्वात मोठी लढाई होती. आपण तिला युद्धाचा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणू शकतो, अशी ती लढाई होती. याच घटनेवर आधारित स्टालिनग्राडचा पोवाडा नावाचे एक महाकाव्य साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी रचलेले आहे. या युद्धाला त्यांनी मानवतेच्या मुक्तीचे युद्ध असे नाव दिले आहे, रशिया या राष्ट्राच्या अस्तित्वाच्या लढ्यावर लिहिलेले, त्यातील सर्वसामान्य लोकांचा सहभाग, स्त्रियांचा सहभाग यावर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकाश टाकला आहे. त्यामुळेच अण्णा भाऊंची रशियातील लोकप्रियता वाढली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु रशियाला गेले असताना त्यांना विचारले गेले होते की, आमचे अण्णा भाऊ कसे आहेत. त्यावरुन आपणास अण्णा भाऊ यांच्या रशियातील लोकप्रियतेचा प्रत्यययेतो.
अण्णा भाऊंनी केवळ रशियाबद्दलच लिहिलेले आहे, असे नाही तर बर्लिनचा पोवाडा, जर्मनीबद्दल आहे. त्यांनी नानकिंगचा पोवाडा चीनबद्दल लिहिला आहे. याशिवाय ‘बंगालची हाक’, ‘तेलंगणचा संग्राम’, ‘दिल्लीचा दंगा’ असे अनेक पोवाडे आणि काव्ये त्यांनी लिहिली आहेत. ३५ कादंबर्‍या, १३ कथासंग्रह, प्रसिद्ध पोवाडे, प्रवास वर्णन अशा अनेक प्रकारचे लेखन करून अण्णा भाऊंनी मराठी साहित्यसृष्टी समृद्ध केली आहे. अण्णा भाऊंनी विपुल साहित्य संपदा निर्माण केली आहे आणि एवढं करूनही अण्णा भाऊंना आपल्या उतरंडीच्या भारतीय समाजात विशेष महत्त्व मिळालं नाही, असं वाटतं.
 
मुंबई विद्यापीठाने मॉस्को येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात २०१९ साली पुढाकार घेतला होता. मॉस्को येथे अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्याससुद्धा मदत केली आहे. त्यामुळे मराठीप्रेमी अण्णा भाऊप्रेमी अशा सर्व बंधू-भगिनींच्यावतीने डॉ. पेडणेकर, कुलगुरू मुंबई विद्यापीठ, डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरु मुंबई विद्यापीठ तसेच डॉ. संजय देशपांडे या सर्वांचे खूप खूप धन्यवाद!यावर्षीसुद्धा मास्को रशिया येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये खालील गोष्टींचा समवेश आहे.
 
१. ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ मॉस्को, रशिया येथे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुतळा दोन वर्षांपूर्वीच पोहोचला आहे.
 
२. ५० वर्षांपूर्वी रशियन भाषेत भाषांतरित, प्रकाशित अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींचे ‘मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून पुनर्प्रकाशन. यामध्ये ‘चित्रा’, ‘फकिरा’ अशा कादंबर्‍या आणि ‘सुलतान’सारख्या कथांचा समावेश आहे.
 
३. भारतीय दूतावास मॉस्को येथे अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण. यामध्ये विनय सहस्रबुद्धे, अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक परिषद, भारत सरकार यांचे महत्त्वाचे सहकार्य आणि पुढाकार आहे.‘मिलिनियर चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ यांनी ‘आयसीसीआर’ यांना तैलचित्र दिल्ली येथे दिलेले आहे.
 
४. भारत-रशिया राजनैतिक संबंध स्थापनेच्या ७५ व्या वर्षाला अनुसरून संबंधित विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ मॉस्को येथे घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी’ मॉस्को, ‘इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज’, ‘रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’ मॉस्को, ‘स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट पिटर्सबर्ग’ आणि ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ यांचा समावेश आहे. भारतातून मुंबई विद्यापीठ, मुंबईमधील ‘सेंटर फॉर युरेशियन स्टडिज’चे संचालक डॉ. संजय देशपांडे, तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे संचालक डॉ. बळीराम गायकवाड यांचा पुढाकार आहे. या सर्व कार्यक्रमांना डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरु आणि डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आहे.
 
उपरोक्त चारही कार्यक्रम १४-१५ सप्टेंबर रोजी नियोजित आहेत.
 
शोध निबंध सादर करणार्‍या प्राध्यापकांना ‘आयसीसीआर’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदेसाठीचे आर्थिक साहाय्य मिळेल, यासाठी आपण मदत करीत आहोत. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड याबाबत संपर्क आणि समन्वय साधत आहेत.
 
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून, त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून भारतीय विचारांचे आंतरराष्ट्रीयीकरण होते आहे. भारतीय विचाराला स्वीकारण्यास विश्व किती उत्सुक आहे, हे सुद्धा यातून दिसते.
 
तुमच्या आणि अनेक मित्रांच्या, वरिष्ठांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने आपली पहिली मोहीम २०१९ मध्ये यशस्वी झाली होती, तशीच ही मोहीमसुद्धा यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.
 
- सुनील वारे