घरफोड्या करून विमानाने प्रवास करणाऱ्या सराईत भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |
जळगाव : देशभरातील मोठ्या शहरांमध्ये घरफोड्या करुन त्या पैशांतून विमानाने इतरत्र फिरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार येथुन अटक केली. त्याच्यावर खुनासह ५० गंभीर गुन्हे आहेत. फक्त दिवसा घरफोडी करण्याची त्याची खास पद्धत आहे.
 


Jimmi1 
 
जिम्मी उर्फ दीपक विपील शर्मा (वय 29, रा. गुरूकुलनगर, नंदुरबार) असे गुन्हेगाराचे नाव आहे. जिम्मीने ३० जून रोजी भरदिवसा चोपड्यात चार व अमळनेर येथे एक असे पाच घरे फोडली. या घरफोड्यांमध्ये त्याने साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लांबवला होता. ऐवज लांबवल्यानंतर त्याच रात्री तो रेल्वेने मुंबईला गेला. तेथुन विमानाने दिल्लीला पळुन गेला होता. तर दुसरीकडे एकाचवेळी पाच घरे फुटल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी चोपडा, अमळनेरला पोहोचले.
 
सीसीटीव्ही फुटेजमुळे भामटा पोलिसांच्या जाळ्यात
 
अमळनेर येथील घरफोडीच्या ठिकाणावरुन पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. परंतु, ते अस्पष्ट होते. हे फुटेज स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी अमळनेर ते नरडाणा या मार्गावरील हॉटेल, ढाब्यांच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यात दोन जण मिळुन आले होते. फुटेज स्पष्ट केल्यानंतर तो नंदुरबार येथील अट्टल गुन्हेगार जिम्मी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नंदुरबार येथे जाऊन चौकशी केली असता जिम्मी दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली.
 
शनिवारी दुपारीच तो दिल्लीहुन परत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, परेश महाजन, मुरलीधर बारी यांच्या पथकाने नंदुरबार शहरात सापळा रचला. जिम्मी शहरात येताच त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला चोपडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.