पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अल्पवयीन मुलगी निघाली गर्भवती; पोलिसच बनले फिर्यादी

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |
दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या प्रकरण
 
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पमुलीने लहान बहिणीच्या समोर विषप्राषण करुन आत्महत्या केल्याची घटना १६ मे २०२२ रोजी घडली होती. दोन महिन्यांनंतर पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यानंतर संबधित मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार न देण्याची भुमिका घेतली. अखेर महिला व बाल समितीच्या अहवालावरुन पोलिस स्वत:च फिर्यादी झाले. शनिवारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MuktaiNagar 
 
पालकांची संशयास्पद भूमिका
 
सविस्तर घटना अशी की, या मुलीने शेतात जाऊन विष प्राषण केले. यावेळी तिची लहान बहिण सोबतच होती. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचा तासाभरात मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नव्हते. अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखीव ठेऊन पोस्टमार्टमचा अहवाल मागवला. दोन दिवसांपूर्वीच हा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. संशयास्पद प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी हा अहवाल महिला व बाल कल्याण समितीसमोर सादर केला. तेथे मृत मुलीच्या पालकांना बोलावण्यात आले. त्यांनी या संदर्भात काहीच माहिती नाही, आमचा कोणावरही संशय नाही, आम्हाला तक्रार द्यायची नाही अशी भूमिका घेतली. पालकांची भूमिका देखील संशयास्पद असल्यामुळे अखेर समितीने पोलिसांना आदेश करुन गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल श्रावण जवरे यांच्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर तपास करीत आहेत.