मोठी बातमी... ओबीसी आरक्षण आणि पावसामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता !

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |
सर्वपक्षीयांची मागणी, मुख्यमंत्री सकारात्मक

मुंबई: महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यामधील 92 नगरपरिषदांची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. याला महाविकास आघाडीसह भाजपचाही विरोध आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local self-government bodies) निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) घेण्यात येऊ नये अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांची असल्याचं दिसून येतंय. ओबीसी आरक्षणासहितच ही निवडणूक व्हावी ही सरकारची भूमिका असून पावसाळ्यात निवडणूक घेण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने निवडणूक पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार ते पाच महिने पुढे जाण्याची शक्यता आहे.
 
 

matadan
 
 
 
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाने एक पहिलं पाऊल टाकलं आहे. पण राज्य सरकार या निवडणुका तातडीने घेण्याच्या मनस्थितीत नाही. आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुका लांबणीवर जाण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय राज्यातल्या पावसाच्या स्थितीत ही निवडणूक कशी घेणार असा सवाल अनेकांनी विचारला आहे.
 
ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात ही आपलीही मागणी असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सध्याचा निवडणूक कार्यक्रम हा पावसाळ्यात जाहीर होण्यावरही प्रश्नचिन्ह व्यक्त केलं आहे. निवडणुका घेण्यात अनेक प्रशासकीय अडचणीही असतात असं म्हणत याबाबत आपण निवडणूक आयोगाशी बोलू असंही ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे न्यायालयाच्या आदेशाने जाहीर केलेल्या या निवडणुकांबाबत आता राज्य सरकार पुन्हा कोर्टातून स्थगिती मिळवणार अशी चर्चा सुरू आहे. अजून चार ते पाच महिने या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय आणि शिवसेनेतली चिन्हाची लढाई या दोन कारणांमुळे निवडणुका तातडीने घेणे सरकारला अडचणीचं आहे.