जिल्ह्यातील नगरपरिषदांची रणधुमाळी

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |
९ नगरपालिकाक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू
 
जळगाव : राज्यासह जिल्हयातील लांबणीवर पडलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दुपारनंतर उशीराने करण्यात आली. नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रमानुसार १८ ऑगस्ट रोजी मतदान तर १९ रोजी मतमोजणी या निमित्ताने नगरपरिषद निवडणूकांची रणधुमाळीस सुरूवात झाली असून जिल्हयातील निवडणूक घेण्यात येणार्‍या नगरपालिका परिषद क्षेत्रात आदर्श आचार संहिता लागू झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.


Nagar Pachayat Election 
 
राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरीषदा आणि ४ नगरपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. यात जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, यावल या एकूण नऊ नगरपालिकांचा समावेश आहे. यातील भुसावळ ही अ वर्गातील, अमळनेर आणि चाळीसगाव या ब वर्गातील तर अन्य नगरपालिका क वर्गातील आहेत. या नगरपरिषदांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार्‍या नगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. यात २२ ते २८ जुलै २०२२ या कालावधीत शनिवार २३ आणि रविवार २४ जुलै सुटीचे दिवस वगळता निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या वेबसाईवर नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. यानंतर २९ रोजी छाननी तर ४ ऑगस्ट ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. या नंतर निवडणूक प्रचारास सुरूवात होउन दिनांक १८ रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी घेतली जाणार आहे. यामुळे आता नऊ ठिकाणी रणधुमाळीस प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
निवडणूक उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र सुलभरित्या दाखल करता यावे, यासाठी महाऑनलाईनव्दारा तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरव्दारे स्विकारण्यात येणार असून त्यात उमेदवाराने अचूक माहिती नमूद करीत स्वाक्षरीसह निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे ऑनलाईन सादर केलेेला अर्ज ग्राह्य असेल.
 
निवडणूक आदर्श आचार संहिता शुक्रवार ८ जुलै सायंकाळपासूनच लागू झाली असून निवडणूक निकाल जाहिर होईपर्यंत अंमलात राहिल. यादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकणारी कृती, घोषणा, उद्धाटने आदी विविध कामे आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांना करता येणार नाहीत.
 
दरम्यान, आज निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार पहिल्या टप्प्यात भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, यावल या ९ तर उर्वरित पाचोरा, भडगाव, चोपडा, सावदा आणि नव्याने अस्तित्वात आलेली नशिराबाद नगरपंचायत अशा ५ नगरपालिकांचे मतदान पुढील टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.