दमदार पाऊस, बळीराजा आनंदात, जिल्ह्यात ७९ टक्के पेरण्या पूर्ण

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |
६ लाख ११ हजार ५०९ हेक्टर क्षेत्रावर बागायती कपाशीसह अन्य वाणांची लागवड

जळगाव : जिल्हयात गेल्या दोन -तीन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या तर काही ठिकाणी दमदार पावसामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासोबत पेरण्यांच्या कामांना वेग आला असून आतापर्यत ६ लाख ११ हजार ५०९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ७९ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.


Sheti 
 
जिल्ह्यात जून अखेर पाऊस लांबल्यामुळे बागायती क्षेत्रासह सरासरी ५१ टक्के खरीप पिकांची धुळपेरणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली होती. तर जुलैच्या दुसर्‍या सप्ताहात पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने बहुतांश ठिकाणी खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरूवात झाली असून बागायती ऊस क्षेत्र वगळता आतापर्यत ७९ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यातील सरासरी ७ लाख ७० हजार ८७४ हेक्टर पेरणी लायक क्षेत्रापैकी ६ लाख ११ हजार ५०९ हेक्टर क्षेत्रावर तालुका पातळीवर खरीप वाणांची लागवड झाली आहे.

दाळवर्गीय ४५ तर तेलबीया वर्गीय वाणांची ३१ टक्के लागवड
 
यात ज्वारी 15757 हेक्टरपैकी 3540 हेक्टर (22टक्के), मका 98684 पैकी 56541 हेक्टर (57टक्के), तर दाळवर्गीय पिकांमध्ये तूर 16343 पैकी 7655(47टक्के), मूग 27966 पैकी 11124 (40टक्के), उडीद 27136पैकी 13306 (49टक्के) एकूण खरीप वाणात 236622 हेक्टर पैकी 107026 म्हणजेच (45 टक्के )वाणांची पेरणी झाली आहे. तर भुईमूग 21टक्के, तीळ 10टक्के, सुर्यफूल 75 टक्के, सोयाबीन 34 टक्के असे सरासरी 31 टक्के तेलबिया वर्गीय वाणांची पेरणी झाली आहे.
 
सर्वात जास्त ९९ टक्के कोरडवाहू आणि बागायती कपाशी वाणाची लागवड
 
जिल्हयातील 4 लाख 98 हजार 925 हेक्टर कापूस लागवडीखालील अपेक्षीत क्षेत्रापैकी 2लाख 74 हजार 584 हेक्टरवर कोरडवाहू तर 2 लाख 19 हजार 44 हेक्टरवर बागायती असे एकूण 4 लाख 93 हजार हेक्टर म्हणजेच सरासरी 99 टक्के क्षेत्रावर कपाशी वाणाची लागवड पूर्ण झाली आहे. सर्वात जास्त 109 टक्के कपाशी वाणाची लागवड अमळनेर तालुक्यात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.