धर्मांधांना पाठीशी उभे करण्यासाठी

    दिनांक : 08-Jul-2022
Total Views |
महुआ मोइत्रा व शशी थरुर काँग्रेसचे खासदार आहेत. यातून तृणमूल काँग्रेस व काँग्रेसला मुस्लिमांना अन् इस्लामी कट्टरपंथीयांना संदेश द्यायचा असतो. हिंदूंना जे काफिर समजतात, त्या काफिरांबद्दल आमचेही मत तुमच्यासारखेच आहे, असे या दोन्ही पक्षांना धर्मांधांना सांगायचे असते. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे राहा, असे केल्याने तुम्हालादेखील तुमचा हिंदूद्वेषाचा सिलसिला सुरू ठेवता येईल, असे सांगायचे असते. पण, याचा एक ना एक दिवस उलटा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
 
mahua
 
 
 
 
"माझ्यासाठी कालीचा अर्थ मांस आणि मद्य ग्रहण करणारी देवी,” असे म्हणत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांनी पुन्हा एकदा हिंदू धर्माचा अपमान केला. त्याआधी त्यांनी ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण सुरू असतानाही हिंदू धर्माचा व शिवलिंगाचा अपमान केला होता. ज्ञानवापीच्या वजुखान्यात शिवलिंग आढळल्यानंतर हिंदूंनी मोठा आनंद साजरा केला. पण, त्यावर प्रतिक्रिया देताना शिवलिंग सापडल्याने व हिंदू आनंदित झाल्याने मिरच्या झोंबलेल्या महुआ मोइत्रा यांनी ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’चे छायाचित्र ट्विट करत ‘पुढचा क्रमांक याचा...’ असे म्हणत शिवलिंगाचा अपमान केला होता. आजही त्यांच्या ट्विटर खात्यावर ते ट्विट जसेच्या तसे पाहायला मिळते. म्हणजेच महुआ मोइत्रा हिंदू धर्माचा, हिंदू श्रद्धास्थानांचा अपमान करण्यासाठी सोकावलेल्या आहेत. तरीही त्या अजून तृणमूल काँग्रेसचा भाग आहेत. कारण, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी स्वतः घोर हिंदूद्वेष्ट्या आहेत. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाला विरोध करण्यासाठी त्या थेट रस्त्यावर उतरुन त्यांच्या समोर आलेल्या हिंदूंवर धावल्या होत्या. तसेच, श्रीराम नवमी, वसंत पंचमी आणि इतरही अनेक हिंदू सणांवेळी वेडेवाकडे निर्बंध लादणे अन् हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे इतरही अनेक प्रयोग त्या पश्चिम बंगालमध्ये करत असतात. त्यामागे एकगठ्ठा मुस्लीम मतपेटी आपल्या गाठीशी सर्दैव बांधून ठेवण्याचा त्यांचा अजेंडा असतो. म्हणूनच त्यांनी महुआ मोइत्रांनी देवी कालीविषयी आक्षेपार्ह विधान केले तरी त्यांच्यावर ठोस कारवाई केलेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, महुआ मोइत्रांनी देवी कालीविषयी वादग्रस्त विधान करावे आणि शशी थरुर यांनी मध्ये न पडावे असे होणार नाही, हे सिद्ध करत काँग्रेस खासदार शशी थरुरांनी महुआ मोइत्रांचे समर्थन केले.
 
“कालीविषयी महुआ मोइत्रा तेच बोलल्या जे प्रत्येक हिंदू जाणतो,” असे ते म्हणाले. त्यांच्यावरही काँग्रेसने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याचे कारण काँग्रेस सातत्याने हिंदूंचा द्वेष करत आली. काँग्रेस नेते राहुल गांधी वा प्रियांका गांधींचे ‘टेम्पल रन’ फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित असते, त्यामागे आस्था वा भावनेचा लवलेशही नसतो. तसे असते तर कोणीही शिवलिंग वा देवी कालीचा केलेला अपमान काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला सहन झाला नसता, ना त्या पक्षाच्या खासदाराने त्या अपमानाचे समर्थन केले असते. पण, तसे होते. कारण शशी थरुर आणि काँग्रेसचे हिंदू धर्माच्या अपमानाबाबत एकमत आहे. त्याचा प्रत्यय फक्त आताच नाही, तर वेळोवेळी येत असतो.
 
हिंदू अस्मितेचा अपमान करताना महुआ मोइत्रा, शशी थरुर वा इतर कोणीही असो ते नेहमी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आधार घेत असतात. पण, त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य फक्त हिंदू धर्माचा अपमान करण्यासाठीच का बाहेर पडत असते? कारण, त्यांना माहिती आहे, आपण हिंदू धर्माविषयी कितीही विचित्र विधाने केली तरी कोणीही आपल्या घरावर दगडफेक करणार नाही वा घरात घुसून मारहाण करणार नाही वा आपला गळा कापणार नाही. हिंदू जास्तीत जास्त निषेधाचे दोन शब्द बोलेल वा एखादा मोर्चा काढेल, त्याहून जास्त काही करणार नाही, याची त्यांना खात्री आहे. अर्थात, हिंदूंचा स्वभाव हजारो वर्षांपासून जाऊ द्या, सोडून द्या, मला काय त्याचे या प्रकारचा वा माफ करण्याचा आहे. इतिहासातही अशी शेकडो उदाहरणे मिळतील, म्हणूनच भारतात म्हणजे हिंदूंमध्ये ईशनिंदेचा प्रकार नाही. पण, याचमुळे आज हिंदू धर्म व हिंदू धर्मीय सातत्याने चिरडले जात आहेत. त्यात परक्यांसह स्वकियांचाही मोठा भरणा आहे. महुआ मोइत्रा आणि शशी थरुरांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. दोघांनाही स्वतःला उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी दाखवायचे आहे. त्या जोरावर त्यांना आपले राजकारणातले मतलब साध्य करायचे आहेत. उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्षतावाद्यांचे आजचे निकष हिंदू धर्माचा जास्तीत जास्त द्वेष करणे, हे झालेले आहेत. यातूनच हिंदूंविषयी कोणताही मुद्दा आला तरी त्यावर अपशब्द बोलणे आणि हिंदूंचा अपमान करण्याचा एककलमी कार्यक्रम तथाकथित उदारमतवादी व धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून चालवला जातो. पण, त्यांचा उदारमतवाद आणि धर्मनिरपेक्षतावाद मुस्लीम, ख्रिश्चनांसमोर शेपूट घालत असतो.
 
पुढचा मुद्दा अधिक महत्त्वाचा म्हटला पाहिजे. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबराविषयी हदीस वगैरेमध्ये लिहिलेलीच गोष्ट सांगितली, तर त्यावरुन धर्मांध मुस्लिमांकडून हैदोस घातला गेला. पण, नुपूर शर्मांना व त्यांच्या आडून भाजप, रा. स्व. संघाला लक्ष्य करण्याचेही प्रकार केले गेले. त्यात मुस्लिमांबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष व डाव्या पक्षांची मंडळी होती. शब्द नुपूर शर्मांचे असले, तरी त्यामागचा मेंदू भाजप-संघाचा आहे, असे म्हणत त्यांनी टीकेचा भडीमार केला. खरे म्हणजे तसे काहीही नव्हते, नुपूर शर्मांच्या शब्दांमागे भाजप वा संघ नव्हे, तर डॉ. तस्लीम रहमानीच होते. त्यांनीच नुपूर शर्मांना भडकावले व म्हणूनच त्या जे मोहम्मद पैगंबराविषयी इस्लामी धर्मग्रंथांत लिहिलेले आहे तेच वाक्य बोलल्या. आता मात्र महुआ मोइत्रा आणि शशी थरुर यांनी देवी कालीविषयी केलेल्या विधानापासून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने अंतर राखले आहे. दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत, त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका आहे.
 
पण, मग जर नुपूर शर्मांच्या वक्तव्याचा भाजप-रा. स्व. संघाशी संबंध असेल, तर महुआ मोइत्रा व शशी थरुर दोन्ही काँग्रेसपासून वेगळे कसे असतील? शशी थरुरांनी तर याआधी हिंदू धर्माच्या तालिबानीकरणाचे, हिंदू पाकिस्तानचे आणि इतरही कितीतरी विधाने केलेली आहेत. ती वैयक्तिक कशी असू शकतील? तर तसे नाहीच, मोइत्रा व थरुरांची विधानेदेखील तृणमूल काँग्रेस अन् कॉँग्रेसशी निगडितच आहेत. त्यामुळेच महुआ मोइत्रा व शशी थरुर काँग्रेसचे खासदार आहेत. यातून तृणमूल काँग्रेस व काँग्रेसला मुस्लिमांना अन् इस्लामी कट्टरपंथीयांना संदेश द्यायचा असतो. हिंदूंना जे काफिर समजतात, त्या काफिरांबद्दल आमचेही मत तुमच्यासारखेच आहे, असे या दोन्ही पक्षांना धर्मांधांना सांगायचे असते. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे राहा, असे केल्याने तुम्हालादेखील तुमचा हिंदूद्वेषाचा सिलसिला सुरू ठेवता येईल, असे सांगायचे असते. पण, याचा एक ना एक दिवस उलटा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही अन् काँग्रेस संपली तशी तृणमूल काँग्रेसही रसातळाला जाईलच!