सामान्य नागरिकांना दरवाढीचा पुन्हा दणका ; घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ !

    दिनांक : 06-Jul-2022
Total Views |
 
नवी दिल्ली : सध्या देशातील सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक गरजा भागावितांना जीव अगदी मेटाकुटीला येत आहे. महागाईतून दिलासा मिळण्याची आशा दिसत नाही. अशातच , गॅस कंपन्यांनी देशाला महागाईचा आणखी एक मोठा धक्का दिला आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे, त्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये त्याची किंमत आता 1003 रुपयांवरून 1053 रुपयांवर पोहोचली आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 6 जुलैपासून लागू झाल्या आहेत. म्हणजेच आज तुम्ही स्वतःसाठी गॅस सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला आता 1003 रुपयांऐवजी 1053 रुपये मोजावे लागतील.
 
 

gas
 
 
इंडियन ऑइलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबर 2021 ते 21 मार्च 2022 पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर होत्या. त्यानंतर 22 मार्च 2022 रोजी गॅसच्या gas cylinder किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आणि त्याची किंमत 899.50 रुपयांवरून 949.50 रुपयांपर्यंत वाढली. पण महागाई इथेच थांबली नाही आणि 7 मे 2022 रोजी पुन्हा एकदा गॅसच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर घरगुती गॅसचे दर 949.50 रुपयांवरून 999.50 रुपयांपर्यंत वाढले आहेत. 7 मेच्या या वाढीनंतर काही दिवसांनी म्हणजेच 19 मे रोजी पुन्हा एकदा गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या. मात्र, यावेळी एका सिलिंडरवर 3.50 रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत 999.50 रुपयांवरून 1003 रुपयांपर्यंत वाढली आहे. आणि मग आज, म्हणजे 6 जुलै 2022 रोजी, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा 50 रुपयांनी वाढल्या आहेत, ज्यामुळे आता त्याची किंमत 1053 रुपये झाली आहे.