जळगाव जनता सहकारी बँकच्या निवडणुकांची तारीख जाहीर; ३१ जुलैला मतदान

    दिनांक : 06-Jul-2022
Total Views |
जळगाव : जळगाव जनता सहकारी या राज्यस्तरीय बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या बँकेच्या निवडणुकीसाठी ३१ जुलै रोजी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ८१ बुथवर मतदान प्रक्रिया होणार आहे. २ ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन लगेच निकाल जाहीर करण्यात येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बीडवई यांनी दिली.
 

JJSB 
बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आलेली आहेत. १८ जुलै रोजीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पात्र उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारी यादी प्रसिध्द करण्यात येईल. ३१ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
 
 या मतदार संघासाठी निवडणूक होणार 
जळगाव जिल्ह्यातून सर्वसाधारण १० जागा, जळगाव जिल्ह्याव्यतिरिक्त सर्वसाधारण २, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय १, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती १, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र १ अशा एकूण १७ संचालकपदाच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
 
जळगाव जनता बँकेचे ५१ हजार ५७९ सभासद
 
या बँकेचे जिल्ह्यासह राज्यात एकूण ५१ हजार ५७९ सभासद आहेत. एका बुथवर ७०० सभासद संख्या गृहीत धरुन ८१ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव शहर, आसोदा, इदगाव, ममुराबाद व म्हसावद या शाखांचे एकूण २० हजार ६६६ सभासद असून त्यासाठी २९ बुथ राहणार आहेत. भुसावळ 4, यावल 2, जामनेर 3, बोदवड 2, अमळनेर 3, चाळीसगाव 3, धुळे 5, नंदुरबार 2, नाशिकमध्ये 4 बूथ राहणार आहेत. उर्वरित फुपनगरी, नशिराबाद, मुक्ताईनगर, सावदा, कुऱ्हा काकोडा, फैजपूर, पारोळा, धरणगाव, एरंडोल, चोपडा, पाचोरा, रावेर, शेंदुर्णी, भडगाव, औरंगाबाद, सिल्लोड, जालना, शिरपूर, शहादा, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, कल्याण व खामगाव येथे प्रत्येकी एक बूथ राहणार आहे. या शाखांव्यतिरिक्त फुपनगरी, नशिराबाद, मुक्ताईनगर, फैजपूर व शेंदुर्णी हे मतदार संघही आहेत.