अधिवेशनात गुलाबराव पाटलांचे आक्रमक भाषण; ‘आम्ही बंड नाही तर…उठाव केलाय'

    दिनांक : 04-Jul-2022
Total Views |
मुंबई : आम्ही बंड केला नसून उठाव केला आहे. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते, ते गेल्यानंतर आम्ही २० आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. 'असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या', त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केला. तसंच, 'या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
 

Gulabrao Patil 
 
एकनाथ शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. यावर शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या भावनाला वाट मोकळी करून दिली.
 
 
 
“शिवसेना जेव्हा जन्माला आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. टपरीवाला, चहा विकणारा, रिक्षावाला, टोपली विकणारा, पुंगानी वाजवणारा, ज्याला काही काम नव्हतं अशा नेतृत्वांना पुढे आणलं. बाळासाहेबांनी तुम्ही एक दिवस आमदार व्हाल असं आमचं प्रारब्ध लिहिलं होतं. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले,” असेदेखील गुलाबराव पाटील म्हणाले.
 
“शिवसेना जे सोडून जातात ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असं म्हणण्यात आलं. पण आम्ही शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडून येण्याची चिंता करण्याची गरज नाही,” असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला. 'अजितदादा म्हणाले, शिवसेना फोडल्यानंतर आमदार निवडून येत नाही. पण आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही सेनेतच आहोत. ५५ आमदारांमधून ४० आमदार कसे काय फुटतात, एक जिल्हाप्रमुख फुटणार असं कळलं होतं, त्यावेळी रात्रभर घेऊन त्याला बसलो होतो, त्यावेळी त्याला नको सोडून अशी समजूत काढली होती'असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
 
आमची अंत्ययात्रा काढली जाणार आहे. पाच आमदार गेले ठीक आहे. ४० आमदार सोडून जात आहे. अरे २५-२५ वर्ष आमदार राहिलेले लोक सोडून जात आहे. मंत्रिपद सोडून जात आहे तरी आमची किंमत नाही. तुम्ही आम्हाला म्हणायला पाहिजे होतं, या चिमण्यानो परत या, मातोश्रीवर या. या चार कंडोळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
 
'सगळे आमदार हे आपलं दु:ख सांगण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. साहेब आमची कामं होत नाही, असं सांगत होतो. पण चहापेक्षा केटली गरम होती. या ठिकाणी हा काही लोक बोलले, बंडखोरांनी नजर फिडवण्याची हिंमत नव्हती असे म्हणाले. पण आम्ही जेलमध्ये गेलो आहे. ३०२ च्या गुन्ह्यात शिक्षा भोगली आहे, तडीपारी होती आमच्यावर, असं असताना शिवसेनेचा भगवा ध्वज हातात घेतला होता, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरे यांना उत्तर दिलं.
 
'तुमची प्रेत बाहेर येईल, तुम्ही डुक्कर आहात, वरळीमधून जाऊ देणार नाही, अशी धमकी देत आहे, पण आम्ही काही लेचेपेचे आमदार नाही. असंच आमदार म्हणून निवडून आलो नाही, हीच आमची निष्ठा, ३५-३५ वर्ष आम्ही शिवसेनेत घातली आहे. बाळासाहेब हे आमच्या ह्रदयात राहतील. आम्ही योग्यच केलं आहे, भाजप-शिवसेनेची युती राहणार होती, तेच आम्ही केलं आहे, असंही गुलाबराव पाटलांनी ठणकावून सांगितलं.
 
'शिंदे साहेब गेल्यानंतर आम्ही २० आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. असं असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, आमची आजही उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे, त्यांनी आम्हा सर्वांचा विचार करावा, असं भावनिक आवाहनच गुलाबराव पाटील यांनी केलं.