मुलाखतीचाही आवेशच!

    दिनांक : 29-Jul-2022
Total Views |
 
उद्धव ठाकरेंची मुलाखत जितकी असबद्ध होती तितकीच त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाटचालही असबद्धच होती. फरक एवढाच की, आता त्यावरची सत्तेची झालर उडाली आहे.
 
 
 
thakare
 
 
 
 
एखाद्या बलाढ्य संघटनेची सूत्रे एखाद्या बेतास बेत माणसाच्या हाती पडली तर काय होईल, हे समजून घ्यायचे असेल, तर उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत पाहावी. बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळे उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व आले. जोपर्यंत बाळासाहेब होते, तोपर्यंत त्यांच्या छत्राखाली त्यांच्या उणिवा पूर्णपणे झाकल्या गेल्या. आर्थिक आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर बलाढ्य असलेल्या शिवसेनेची सुरुवात व्यवस्थाविरोधी प्रवाह म्हणून झाली होती. हा विरोध करता करता शिवसेनाच एक व्यवस्था बनून गेली. चळवळीची व्यवस्था झाली की, जे व्हायचे तेच होते. शिवसेनेचेही तेच झाले.
शिवसेनेची मूळ गरज आक्रमक नेतृत्वाची! शिवसेनाप्रमुखांचा आक्रमकपणा उद्धव ठाकरेंना न पेलविणारा; मग त्यांना साजेसे कार्यक्रम व्यवस्था म्हणून शिवसेनेने सुरू केले. ज्यात त्यांचे व्यक्तिमत्व मोठे दिसावे म्हणून इतरांना लहान करण्याचे प्रयोग झाले. खरे तर मुलाखत देणे म्हणजे खुला खेळ; मात्र हा खेळ उद्धव ठाकरेंनी एखाद्या ‘फिक्स मॅच’प्रमाणे खेळला. प्रारंभीपासून त्यांची वाटचालच याच प्रकारे झालेली असल्याने त्यात त्यांचा तरी काय दोष?
 
खरे तर शिवसेनेला बंड नवीन नाही. अशी कितीतरी ज्ञात-अज्ञात बंड शिवसेनेने पचविली आणि शिवसेना पुढे जात राहिली. यावेळचे बंड मात्र शिवसेनेच्या वर्मी बसले. त्याचे खरे कारण म्हणजे, शिवसेनाप्रमुखांचे नसणे. बाळासाहेब राजकीय नेता म्हणून जितके प्रभावी होते, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट ते कुशल संघटक आणि माणसांची पारख असणारे होते. भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांच्या ही त्यांच्या हयातीत झालेले उठाव. यात राज ठाकरे यांचा अपवाद होता तो केवळ त्यांनी स्वत:चा वेगळा पक्ष काढला म्हणूनच. हे सगळे प्रसंग जगजाहीर आहेत. गणेश नाईक सोडले, तर बाकी सगळ्यांचे बाळासाहेबांनी काढलेले वाभाडेही जगजाहीर आहेत. बाळासाहेबांची क्षमता इतकी मोठी होती की, हे उठाव त्यांनी पचविले. एक न कळलेला उठावही शिवसेनेत होता. बाळासाहेबांनंतर राज ठाकरे यांची लोकप्रियता बाळासाहेबांच्या खालोखाल वाढत होती. ‘भारतीय विद्यार्थी सेना’ हे शिवसेनेचे युवांना आकर्षित करणारे मोठे व्यासपीठ होते. राज ठाकरेंना यातूनच लोकप्रियता मिळाली.
 
राज ठाकरे मोठे होणार, हे बाळासाहेबांनाही स्पष्ट दिसत होते. त्यांनी अगदी अलगदपणे राज ठाकरेंना भारतीय विद्यार्थी सेनेच्या नेतृत्वातून बाहेर काढले. अगदी आदित्य ठाकरेंची युवासेना येईपर्यंत भारतीय विद्यार्थी सेना सक्रिय होती. नंतर आदित्यसाठी तिचेही खच्चीकरण करण्यात आले. या सगळ्या प्रक्रियेत शिवसेनेतली चांगली माणसे बाळासाहेबांबरोबरच काळाच्या पडद्याआड गेली किंवा बाजूला झाली. प्रमोद नवलकरांपासून ते दत्ताजी नलावडेंपर्यंत लिलाधर डाकेंपासून ते दत्ताची साळवींपर्यंत प्रारभींचे हे १२ नेते शिवसेनेचे बिनीचे शिलेदार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे सगळेच लोक लोकांमधून निवडून येत होते.
 
यातल्या अनेकांना विधान परिषद किंवा राज्यसभेसारख्या मागच्या दरवाजातून आत शिरावे लागले नाही. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामधला प्रमुख फरक हाच की, त्यांच्या भोवतालचे सगळेच कडबोळे हे अशा प्रकारच्या परावलंबी लोकांचेच होते. ही सगळीच मंडळी कशाचा ना कशाचा आवेश आणलेलीच होती. अखेर या मुलाखतीचा भागही सर्वच अर्थाने तसाच आव आणलेला आहे. टीका, टोमणे, इतरांना बोल याच्याशिवाय या मुलाखतीत काहीच नाही.
 
महाराष्ट्रासारख्या एका अत्यंत प्रभावी राज्याचा नुकताच पायउतार झालेला मुख्यमंत्री कितीतरी गोष्टी सांगू शकतो. हे राज्य असे आहे की, मुंबईसारखे शहर या राज्याचे अर्थचक्र सुरळीत ठेवते. विकासांची कामे, नवे प्रकल्प, गुंतवणूक किती काय काय राज्य म्हणून घडत असते. मात्र, याचा साधा लवलेशही उद्धव ठाकरेंच्या भाषणात नव्हता. याचे मूळ कारण म्हणजे उद्धव ठाकरे व त्यांच्या चिंरजीवांचे कर्तृत्व. आपल्या आजारपणाचे जे काही भांडवल त्यांनी केले, त्याची आज सोशल मीडियावर यथेच्छ चेष्टा केली जात आहे. मनोहर पर्रिकरांसारखा कॅन्सरशी लढणारा माणूस मुख्यमंत्री म्हणून काम करीत झगडताना देशाने पाहिला. इथे दुखणार्‍या मानेचे केवढे कौतुक आणि चिंता काय तर खाजवायचे कसे?
 
हिंदुत्वाचा मुद्दा तर शिवसेनेने सत्तेत येण्यासाठी सोडलाच होता. ज्या बाळासाहेबांनी बेहरामबागेत जाऊन दंगलीच्या आगीतून हिंदूंना वाचविले, त्याचा बेहरामबागांमधून टिपू सुलतानच्या नावाने उद्याने उभी राहायला सुरुवात झाली, ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच. प्रत्येक जिल्ह्यात उर्दु भवन काय? आणि जनाब उद्धव ठाकरे काय? मुस्लीम तुष्टीकरणाच्या बाबतीत शिवसेनेने तर काँग्रेसलाही मागे काढले. भाजपशी युती तोडल्याने जी मते जातील ती अल्पसंख्याकाकडून भरून काढण्याचा हा डाव होता. जो कदापि यशस्वी होऊ शकला नाही. भाजपचे हिंदुत्व मोदी-शाहंच्या खांद्यावर आहे, त्याला संघासारख्या त्यागी, विरागी संघटनेची साथ आहे. त्यांनी त्यांचे हिंदुत्वविषयीचे दायित्व सिद्ध केले आहे. राम मंदिर ते ज्ञानवापी या आणि अशा कितीतरी ठणकावून सांगण्याच्या गोष्टी मोदी-शाहंच्या बाजूने आहेत. उद्धव ठाकरेंकडे काय आहे?
 
आता एक नवा खेळ राऊत ठाकरे जोडीने सुरू केला आहे. जो आपल्याला पेलवत नाही, त्याची यथेच्छ नालस्ती करायची आणि त्याची प्रतिमा खराब करायचे सगळे उद्योग करायचे असा हा बनाव असतो. भुजबळ, राणे यांच्याबाबतही हे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आता प्रतिमाभंजन करण्याचे उद्योग सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदानंतर शिवसेनाप्रमुख होण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचा दावा आता राऊत-ठाकरे करीत आहेत. हे राजकारण इतक्या बालीश स्तरावर जाईल, असा विचार कुणीच केला नसेल. पण, ज्यांना ‘मातोश्री’वरून चालणारे राजकारण कळते त्यांना यात काहीच वावगे वाटणार नाही. कुठलीही जबाबदारी नाही. एका भाबड्या भावनिक वातावरणात चाललेली संघटना व तिचे अचानक उगवलेले लाभधारक, अशी ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत जितकी असबद्ध होती तितकीच त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाटचालही असबद्धच होती. फरक एवढाच की, आता त्यावरची सत्तेची झालर उडाली आहे.