शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम आठवड्यात पूर्ण करा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकारी यांचे आदेश

    दिनांक : 27-Jul-2022
Total Views |
जळगाव : शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पूल व इतर प्रलंबीत असलेल्या प्रश्नांवर आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून तीव्र रोष व्यक्त केला. त्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली. या उड्डाण पुलाचे काम आठवडाभरात पूर्ण न झाल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. मात्र याचवेळी पावसाने साथ दिली तर असाही उल्लेख त्यांनी केला.
 

shivaji nagar pull 
 
 
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, वाहतूक शाखेचे निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम रखडल्याने जनप्रक्षोभ झाला आहे. हे काम आठवडाभरात पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदाराला देण्यात आलेल्या आहेत. अजिंठा रस्त्याचे कामही रखडलेले आहे.
 
असोदा-पिंप्राळा पुुलाचे काम लवकर करा
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ना-हरकत देण्याबाबत मदत करण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. महामार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही संयुक्त पथकाला देण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर उड्डाण पुलाप्रमाणे असोदा व पिंप्राळा उड्डाण पुुलांना विलंब लागू नये,यासाठी इतर सोपस्कार पूर्ण करुन त्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत.
 
रस्त्यांच्या कामांना गती द्या
 
नगरविकास विभागाने दिलेल्या 42 कोटींच्या निधीतून शहरातील रस्त्यांची कामेही रखडलेली आहेत. त्यालाही दिरंगाई होत आहे. आठ ते दहा कामांना मनपाने ना-हरकत दिलेली आहे. या कामांना गती देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्यावरील टोल वसुलीचा प्रश्न गंभीर असून त्या संदर्भातही कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
 
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 2 कोटी रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे. यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे. त्याचप्रमाणे रेशनचे धान्य लाभार्थी विकत असल्यास त्यांना अपात्र ठरवत त्यांच्यावर कारवाईही करण्यात येईल. रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी रेशन दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.
 
महामार्गावर वेगाची मर्यादा पाळा
 
महामार्गाचे काम झाल्यानंतर त्यावर जाणाऱ्या वाहनांची वेग मर्यादा वाढल्यामुळेही अपघात होत आहेत. महामार्गावर 80 किमीची वेग मर्यादा आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी वेग मर्यादेचे पालन करुन वाहने चालवावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.