जळगावमध्ये वाळू माफियांचा हैदोस, मात्र प्रशासन हतबल- आ. एकनाथ खडसे

    दिनांक : 25-Jul-2022
Total Views |
जळगाव : विधानपरिषदेवर निवडून आल्यानंतर आमदार खडसे यांनी प्रथमच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची मांडणी करीत त्यांची सोडवणूक करण्याची विनंती खडसेंनी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जिल्ह्यातील जिल्ह्यात वाळू माफियांनी गोंधळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे. प्रशासन त्यांच्यासमोर हतबल झाले आहे. प्रशासन वाळू तस्करीसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगते, तरीही वाळू तस्करी का थांबत नाही, असा प्रश्न आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे.
 

khadase
 
 
वाळू तस्करीवरुन खडसेंनी प्रशासनाला धारेवर धरले. खडसे म्हणाले, वाळू तस्करीविरोधातील कारवाईदरम्यान जप्त केलेले ट्रक, ट्रॅक्टर हे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पाठवावेत. अशी वाहने किमान दोन महिने जप्त करुन ठेवावीत. वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांवर एमपीडीएअंतर्गत गुन्हे दाखल करा. कठोर कारवाई केल्यास काही प्रमाणात प्रतिबंध लागू शकतो.
 
वाळू तस्करांवर कारवाई करण्यास यंत्रणाच कमकुवत
 
खडसे म्हणाले, वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यात आपण स्वत: तहसीलदारांना पाठवले होते. मात्र, तहसीलदार जाईपर्यंत वाळू तस्कर फरार झाले. यंत्रणाच अशी कमकुवत असेल तर वाळू तस्करी कशी थांबेल. प्रशासनाने वाळू माफियांवर नियंत्रण आणले पाहिजे.
 
ठेकेदाराचा हलगर्जीपणा
 
खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. ते अपूर्णावस्थेत आहे. जवळपास एक लाख लोकसंख्येला त्यामुळे त्रास होत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. केवळ ठेकेदाराचे भले होण्यासाठी त्याला वारंवार मुदतवाढ दिली जाते.
 
जळगाव-अंजिठा रस्त्याची रखडपट्टी
 
खडसे म्हणाले, जळगाव-अजिंठा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. त्याचे कामही रखडलेले आहे. येथील राष्ट्रीय महामार्गाच्या आजुबाजूला अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे किरकोळ स्वरुपाचे अपघात होतात. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांवर लक्ष द्यावे. दरम्यान, या संदर्भात मंगळवारी तातडीची बैठक घेवून सूचना देण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी खडसेंना आश्वासन दिले. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
 
रेशन धान्याचा काळाबाजार
 
जिल्ह्यात रेशनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे खडसे म्हणाले. खडसेंनी सांगितले की, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य बाहेर जाते. गेल्या आठवड्यात रेशनचा २५ टनाचा ट्रक भुसावळ पोलिस उपअधीक्षकांनी नशिराबादजवळ पकडला. पुढे काय झाले? कोणताही दंड झाला नाही. जे धान्य रेशनच्या दुकानात येते, ते धान्य गोरगरीबांना मोफत मिळते. मात्र ते धान्य विकले जात आहे. धान्य गोदामात टाकून बाहेरील राज्यात पाठवले जाते. या रॅकेटकडे पोलिस प्रशासन, पुरवठा विभाग यांनी अधिक लक्ष द्यावे. यावर सीसी टीव्हीच्या माध्यमातून असे प्रकार थांबवण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिले.