निर्बंधमुक्तीचा उत्सव

    दिनांक : 23-Jul-2022
Total Views |
परवाच फडणवीस-शिंदे सरकारने कोरोना काळातील जाचक निर्बंधांतून सण-उत्सवांना सर्वार्थाने मुक्त केले. त्यामुळे हे सरकार नुसते नामधारी हिंदुत्ववाद्यांचे नसून कृतिशील हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे मजबूत सरकार आहे, हा स्पष्ट संदेश राज्यातील जनतेलाही तितकाच सुखावणारा म्हणावा लागेल.
 
 

shinde 
 
 
 
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
 
बा. सी. मर्ढेकर वरील काव्यपंक्तीत आषाढ-श्रावणातील वर्षाऋतूची चातकप्रतीक्षा अगदी नेमक्या शब्दांत विशद करतात. तसेच, हे दोन मास अधिक भाद्रपदातील सण-उत्सवांची हिंदू बांधवही अगदी चातकासारखीच प्रतीक्षा करत असतात. परंतु, कोरोना नावाची महामारी आणि ठाकरे सरकारच्या साठमारीच्या कारभारामुळे मागील दोन वर्षांत उत्सवी महाराष्ट्राला निर्बंधांच्या निरुत्साहाचे ग्रहण लागले. त्यामुळे किमान यंदा तरी सण-उत्सव पूर्वीसारखेच जल्लोषात साजरे करता येणार का, अशी धाकधूक अवघ्या महाराष्ट्राला होती.
 
परंतु, यंदा पंढरीची वारी निर्बंधमुक्त झाली आणि राज्यभरातील वारकर्‍यांनी आपल्या लाडक्या विठूरायाचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शनही घेतले. त्यामुळे आषाढी वारीनंतर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव, दहीहंडीबाबत राज्यातील नवनिर्वाचित सरकार काय निर्णय घेते, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होतेच. तेव्हा, अपेक्षेप्रमाणे फडणवीस-शिंदे सरकारने नियमांच्या जंजाळातून या सणांची मुक्तता केली आणि महाराष्ट्राच्या उत्साहाला पारावार उरले नाही.
 
महाविकास आघाडीच्या अवघ्या अडीच वर्षांच्या काळात सण-उत्सवांवर कोरोनामुळे संक्रांत ओढवली. हळूहळू इतर गोष्टींवरील निर्बंध उठविणारे ठाकरे सरकार मात्र हिंदू सण-उत्सवांच्या बाबतीत प्रचंड उदासीन दिसून आले. मदिरालये जोरात सुरू होती. पण, मंदिरांना टाळे होते. जणू कोरोनाचा फैलाव सार्वजनिक सण-उत्सवांतूनच होतो, अशाप्रकारे ठाकरे सरकारने जाचक निर्बंधांनी आधीच महामारीने त्रस्त जनतेला अधिक वेठीस धरले. यासंदर्भात आज लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्ताने सार्वजनिक सण-उत्सवांचे महत्त्व उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही.
 
गणेशोत्सव, शिवजयंतीला सार्वजनिक स्वरुप देऊन त्याचे महत्त्व अधोरेखित करताना ‘केसरी’च्या एका अग्रलेखात टिळक म्हणतात, “हिंदू धर्मात सण कमी आहेत असे नाही. पण, त्यापैकी एक-दोन सणांखेरीज बाकी सण प्रत्येकाने आपापल्या घरी करण्याचे आहेत. त्यामुळे त्यापासून जितका सार्वजनिक फायदा व्हावयाचा तितका होत नाही. पंढरीच्या विठोबाच्या उत्सवासारखा एखादा दुसरा उत्सव सर्व लोकांना प्रिय होण्यासारखा आहे. पण, हे उत्सव अथवा यात्रा पुरातन असल्याने त्याचे स्वरूप आपल्याला पाहिजे, तशा रितीचे करणे अशक्य नसले तरी बहुतेक असाध्यच आहे असे म्हटले तरी चालेल. त्यातून जो सार्वजनिक उत्सव असावयाचा तो ठिकठिकाणच्या लोकांना आपापल्या गावी करता येण्यासारखा पाहिजे, तसा विठोबाच्या यात्रेचा प्रकार नाही.
 
ही उणीव गणपतीच्या उत्सवाने नाहीशी होईल, अशी आमची समजूत आहे. वर्षातून दहा दिवसच का होईना, पण एका प्रांतातील सर्व हिंदू लोकांनी एका देवतेच्या उपासनेत गढून गेलेले असावे, ही लहानसहान गोष्ट नव्हे व ही जर साध्य झाली, तर आपल्या भावी अभ्युदयाचा आपण पाया घातल्यासारखे होईल. (केसरी - दि. 3 सप्टेंबर, 1895) त्यामुळे अगदी स्पष्ट शब्दांत टिळकांनी सार्वजनिक उत्सवांची महती वेळोवेळी मांडली होती. पण, दुर्दैवाने ठाकरे सरकारच्या काळात निर्बंधांचा सर्वाधिक फटका याच सण-उत्सवांना बसला. उत्सवामागील समाजभान, हिंदू बांधवांची एकदंरच सामाजिक मानसिकता, त्याचे सांस्कृतिक मूल्य वगैरे बाबी ठाकरे सरकारच्या खिसगणतीतही नव्हत्या.
 
हिंदूंचे सण-उत्सव म्हणजे निव्वळ हुल्लडबाडी आणि गदारोळ, या पुरोगाम्यांच्या सडक्या बुद्धीतून प्रसवलेल्या विचारांच्या आधारावरच ठाकरे सरकारने सण-उत्सवांवर अंकुश लावले. खरंतर आधीच महामारीने पिचलेल्या, सामाजिक अंतराने समाजाशी नाळ तुटलेल्या जनतेला सण-उत्सवाच्या निमित्ताने एक सकारात्मक सामूहिक ऊर्जा प्राप्त झाली असती. कोरोना प्रतिबंधक नियमांचे सुयोग्य पालन करुनही हे सण-उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरेही करता आले असते. परंतु, मुखी हिंदुत्व आणि कृतीत काँग्रेसत्व आत्मसात केल्याने ठाकरेंनी सण-उत्सवांचा जाचक अटी-शर्ती लादून पुरता विचका केला. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, हिंदू उत्सव आकारापासून ते स्वरुपापर्यंत नाना निर्बंधांत कैद केले.
 
दर दोन दिवसांनी बदलणारी नियमावली, संबंधितांशी चर्चा न करता घेतलेले एककल्ली निर्णय, हिंदू बांधवांवर वेळोवेळी दाखवलेल्या प्रचंड अविश्वासामुळे ठाकरे सरकारविषयी हिंदू जनमानसातही रोष होताच. त्यात मोहरमच्या मिरवणुकांना वगैरे परवानग्या दिल्याने हिंदू बांधव केवळ दुखावले नाही, तर एक प्रकारचा रोष, चीड या हिंदूद्वेषी सरकारविरोधात निर्माण झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसून सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हिंदूंशी ठाकरेंनी केलेली प्रतारणा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली.
 
त्यामुळे आज ठाकरेंनी ‘मी हिंदू, शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही’ वगैरे कितीही दावे केले तरी महाराष्ट्र दृतराष्ट्राच्या भूमिकेत नक्कीच नाही. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या काळात शिवसेनेने अल्पसंख्याकांच्या मतांसाठी केलेल्या लांगूलचालनापासून ते हिंदूंना सरसकट ग्राह्य धरण्यापर्यंत केलेल्या पापांचा घडा भरला अन् हिंदुत्वाच्या बोटचेप्या भूमिकेमुळेच शिवसेनाही दुभंगली आणि ठकरे सरकार कोसळले. त्यानंतर आज हिंदुत्वाच्याच भक्कम पायावर फडणवीस-शिंदे सरकार आत्मविश्वासाने उभे आहे. म्हणूनच जे जे हिंदूहिताचे, ते ते जनहिताचे अशाच निर्णयांचा धडाका या सरकारने लावलेला दिसतो.
 
गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथकांनाही फडणवीस-शिंदे सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांतून मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशमूर्तींच्या उंचीवरील मर्यादा हटविण्यासापासून ते मंडपांना एक खिडकी परवानगी देणे, ऑनलाईन नोंदणी, अनावश्यक शुल्कातून सूट, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे यांसारखे या सण-उत्सवांना चालना देणारे निर्णय फडणवीस-शिंदे सरकारने घेतले. त्यामुळे सण-उत्सव साजरे करायचे म्हटले की होणारी सरकारी आडकाठी, अडवणूक यालाही यंदा मोठ्या प्रमाणात चाप बसेल. शिवाय गणेशभक्त, गोविंदापथके यांच्या वेळेची अन् पैशाचीही बचत होईल. परिणामी, उत्सवापूर्वी विविध परवानग्यांची गुंतागुंत आता संपुष्टात आली असून खर्‍या अर्थाने सर्व उत्सव आता उत्साहात साजरे करता येतील.
 
त्यामुळे साहजिकच हे नवीन सरकार हिंदू बांधवांच्या, त्यांच्या सण-उत्सवांमागील भावना, परंपरा यांचा आदर करणारेच आहे, ही बाब यानिमित्ताने ठळकपणे अधोरेखित होते. पण, गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथकांना असा मोठा दिलासा जरी सरकारने दिला असला तरी सर्व सण-उत्सव सामाजिक बांधिलकी, कायदे, नियमांच्या चौकटीतच साजरे करायचे आवाहनही सरकारने केले आहे. त्यामुळे सण-उत्सव निर्बंधमुक्त झाले, तरी सामाजिक जबाबादारीचे आणि कर्तव्याचे भान राखून यंदा हे सण-उत्सव पार पडतील, यात शंका नसावी.