‘ते’ पुन्हा आले महाराष्ट्र बदलण्यासाठी! महाराष्ट्र घडविण्यासाठी!

    दिनांक : 23-Jul-2022
Total Views |
 
फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत येताच, अवघ्या काही दिवसांच्या अवधीतच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात जातीने लक्ष घालून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा प्रश्न मार्गी लावला. यानिमित्ताने म्हणूनच म्हणावेसे वाटते की, ‘ते’ पुन्हा आले महाराष्ट्र बदलण्यासाठी! महाराष्ट्र घडविण्यासाठी!
 
 
 
fadanvis
 
 
 
 
देशातील सर्वात कमी वयाचा म्हणजे फक्त वयवर्ष २५ असताना महापौर बनून नागपूर महापालिकेला सर्वोत्कृष्टमहापालिकेचा सन्मान मिळवून देणारा हा युवक आज देशाच्या राजकारणातील एक ‘आयडॉल’ बनला आहे. देवेंद्रजींचा माझा परिचय गेल्या २५ वर्षांचा... नागपूरचे महापौर म्हणून युती शासनातील जीवन प्राधिकरणावर त्यांची सदस्य म्हणून नियुक्तीही करण्यात आली होती. त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या बैठकीला ते सतत मंत्रालयात येत असत. मी पाणीपुरवठा मंत्र्यांचा खासगी सचिव असल्यामुळे ते मंत्रालयात आले की, माझ्या दालनात येत व नागपूर महानगरपालिकेतील नवनवीन प्रयोगांबद्दल भरभरुन बोलत असत. तेव्हाच त्यांच्याबाबत माझ्या मनात एक उमदा, शांत व संयमी, अभ्यासू तरुण व कल्पक नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. पुढे मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ती अधिकच दृढ झाली.
 
पुढे युवा मोर्चाचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे प्रभारी आणि प्रदेशाचे सरचिटणीस या संघटनात्मक जबाबदार्‍या पार पाडतानाही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुशल व अभ्यासू नेतृत्वाची चुणूक दाखवत, जुन्या- जाणत्या नेत्यांवरही आपल्या कर्तृत्वाची व स्वभावाची भुरळ घातली. अत्यंत गोड व लक्ष वेधून घेणार्‍या या अभ्यासू नेतृत्वाला हेरुन गोपीनाथराव मुंडे यांनी आपला सहकारी बनविले. विधानसभेत अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर मुंडेसाहेब जेव्हा बोलायला उभे राहायचे, तेव्हा सभागृह अवाक होऊन मुंडे साहेबांची भाषणे ऐकत असे. या भाषणातील संदर्भ-माहिती आणि संशोधनामागे देवेंद्र फडणवीस यांची मेहनत असायची. मुंडे साहेबांनी सांगिलतेली माहिती जीवापाड मेहनत करून जमवायची आणि आपल्या नेत्यांना द्यायची. पुढे पुढे तर मुंडेसाहेबच देवेंद्रजींना म्हणायला लागले, “देवेंद्र, या विषयावर तुझाच अभ्यास अधिक आहे, म्हणून हा विषय माझ्याऐवजी तूच सभागृहात मांड.” असे अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात मांडतच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आपली वचक निर्माण केली. मतदारसंघातील विकासकामे आणि विधानसभेतील नियमानुसार काम करण्याची पद्धती यामुळे देवेंद्र फडणवीस यांची पक्षात व पक्षाबाहेरही एक अभ्यासू आमदार अशी प्रतिमा निर्माण झाली.
 
देवेंद्रजी पहिल्यांदा प्रदेशाचे सरचिटणीस झाले. वांद्रेला रंगशारदा सभागृहात प्रदेशाच्या कार्यसमितीची बैठक होती, या बैठकीत ‘२०२० सालचा महाराष्ट्र’ या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी एक सादरीकरण (प्रेझेंटेशन) केले होते. ते आजही माझ्या स्मरणात आहे. ते संपूर्ण सादरीकरण म्हणजे देवेंद्र यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या परिवर्तनाचे संकल्पचित्र होते. कुठे आमदार आहे, सत्ता येणार आहे की नाही, याची कल्पना नसतानाही समृद्ध महाराष्ट्राचे दहा वर्षे अगोदर संकल्पचित्र चितारणारा, ‘महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणारच’ असा कमालीचा आत्मविश्वास जोपासणारे, देवेंद्र फडणवीस हे प्रतिभासंपन्न व दूरदृष्टीचे नेते ठरले आहेत.
 
असे अनेक विषय त्यांनी सभागृहात मांडले. ते सभागृहाप्रमाणेच संघटनेतही प्रभावी काम करू शकतात, असा विश्वास असल्याने मुंडेसाहेबांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा आग्रह धरला आणि ते प्रदेशाध्यक्ष झाले. गोपीनाथजींनंतर सर्वात तरुण प्रदेशाध्यक्ष होण्याचे भाग्य देवेंद्र फडणवीस यांना लाभले. अवघ्या वर्षभरात देवेंद्र फडणवीसांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. पक्षाची संघटनात्मक बांधणी केली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे २०१४च्याविधानसभेच्या निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. २०१४च्या निवडणुकी अगोदरचा दि. १६ ऑगस्ट, २०१४चा ‘मनोगत’ पाक्षिकाचा ‘महाराष्ट्र बदलू! महाराष्ट्र घडवू!!’ या शीर्षकाचा अंक आठवा. संग्रही असेल तर जरूर पाहा. या अंकात प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची मी प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. ती मुलाखत म्हणजे महाराष्ट्राच्या तत्कालीन परिस्थितीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाष्य आणि २०१४च्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या विकासासंबंधीच देवेंद्र यांच्या मनातील संकल्पचित्र आणि त्याप्रमाणेच महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर झालेले बदल पाहिले की त्यांच्या निर्धार शक्तीची कल्पना येते.
 
ध्यास, परिश्रम, प्रामाणिकपणा आणि नियोजन असेल, तर काय घडू शकते, हे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात दाखवून दिले. २०१४ साली झालेलं महाराष्ट्रातील सत्तांतर आणि देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री होणं साहजिकच महाराष्ट्रातील प्रस्थापितांना रुचणार नव्हतं. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध काहूर उठविण्याचे प्रयत्न सुरू झाले. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या विकासकामांच्या धडाक्यामुळे आपलं अस्तित्व संपतं की काय, या भीतीने पछाडलेल्या विरोधकांनी त्यांना विरोध सुरू केला. शेतकर्‍यांना उठवलं, मराठा आरक्षण विषयावरून वातावरण तापवलं गेलं, वनवासींनाही भडकावण्याचे प्रयत्न झाले, जातीत आणि धर्मात विष पेरून पाहिलं. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्या निर्मळ, प्रेमळ, प्रामाणिक स्वभावाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा ठाकला. सार्‍या संकटावर मात करीत महाराष्ट्र घडला, महाराष्ट्र बदलला! ’हा ब्राह्मण माणूस याला शेतीकाम काय कळते? याला समाज काम कळतो? हा महाराष्ट्र कसा चालवू शकतो?’ हा विरोधकांचा अपप्रचार त्यांनी हाणून पाडला.
 
महाराष्ट्रात एकाही जातीत दंगल होऊ दिली नाही, एकही अतिरेकी हल्ला होऊ दिला नाही. अंडरवर्ल्ड दिवस मोजू लागले. शेतकर्‍यांना कर्जमाफी, भरघोस विमा, साखर कारखानदारीलाही सहकार्य, दुध उत्पादकाला दिलासा, पीक कर्जासाठी रांगा नाहीत. बुलेट ट्रेन, मेट्रो, ‘मुख्यमंत्री सडक योजना’, जलयुक्त शिवार, उद्योगाला विकासाला भरारी, परदेशी गुंतवणुकीचा विक्रम मोडला. याच भरवशावर ‘मी पुन्हा येईन’ असं त्यांनी म्हंटल होतं. जनतेने त्यांना पुन्हा आणलंही, पण विश्वासघाताने हिरावलं. ‘मी पुन्हा येईन!’ हा शब्द महाराष्ट्रात घुमत होता. विरोधकांनी तर चेष्टेचा विषय केला होता. परंतु, संकटाला संधी समजणार्‍या देवेंद्र यांनी हार मानली नाही. चेष्टाही सकारात्मक स्वीकारली आणि करून दाखवलं. ‘मी पुन्हा येईन’ हा शब्द खरा करून दाखविला. तो पुन्हा आला आहे, त्याच इराद्याने, त्याच विचाराने, महाराष्ट्र बदलण्यासाठी! महाराष्ट्र घडविण्यासाठी!! त्यासाठी देवेंद्र तुम्हाला लाख लाख शुभेच्छा!
 
- गणेश हाके