आगीत जळालेल्या सात लाखांपैकी तीन लाख रुपये रिझर्व्ह बँकेने केले शेतकऱ्यास परत

    दिनांक : 20-Jul-2022
Total Views |
 
आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
 
चाळीसगाव: तालुक्यातील पोहोरे येथील शेतकरी केशव राघो महाजन यांच्या घराला १९ फेब्रुवारी रोजी गॅस गळतीमुळे आग लागली होती. या आगीत ७ लाख ७० हजारांची रोकड जळून त्यातील काही नोटा अर्धवट जळाल्या होत्या. त्या नोटा आ. मंगेश चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेत जमा केल्या होत्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे रिझर्व्ह बँकेने अर्धवट जळालेल्या नोटांचा मोबदला म्हणून तीन लाख रुपये शेतकरी केशव महाजन यांच्या खात्यात जमा केले.
 
 
nota
 
  
 
महाजन कुटुंबियांनी नवीन घर घेण्यासाठी ७ लाख ७० हजार रुपये जमवून घरात ठेवले होते. २१ फेब्रुवारीला घराची खरेदी करायची होती, त्यापुर्वीच १९ फेब्रुवारीला त्यांच्या घराला आग लागली होती. या घटनेत महाजन कुटुंबाचे नवीन घर घेण्याचे स्वप्न जणू या आगीत खाक झाले होते. या कुटुंबाला माणुसकी दाखवत ग्रामस्थांनी सर्वतोपरी मदतीचा हात दिला होता. तसेच ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून सव्वा लाख रुपयांची मदत केली होती. आगीमुळे नुकसान झालेल्या घराची पाहणी करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण आले असता, त्यांनीही केशव महाजन यांना रोख ५० हजार रुपयांची मदत केली होती. तसेच आगीत अर्धवट जळालेल्या नोटा बदलून आणण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.
 
आमदारांनी आश्वासन दिल्यानंतर जळालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी पाच महिने पाठपुरावा केला. रिझर्व्ह बॅँकेच्या क्लिष्ट प्रक्रियेची माहिती नसल्याने, आमदारांनी वेळोवेळी बँकेच्या विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच अनेकदा मुंबई व नागपूर येथे आपल्या स्वीय्य सहायकांना पाठवून पाठपुरावा केला. अखेर पाठपुराव्याला यश आले. जळालेल्या रकमेकी तीन लाख रुपये रिझर्व्ह बँकेने नुकतेच शेतकरी महाजन यांच्या खात्यात जमा केले. त्यामुळे महाजन कुटुंबाला नक्कीच आधार मिळणार आहे.