सुकी नदीच्या पुरात अडकलेल्या मुक्ताईनगरच्या ९ पर्यटकांची सुटका

    दिनांक : 19-Jul-2022
Total Views |
जळगाव : तालुक्यातील पाल जवळील गारबर्डी धरण ओव्हर फ्लो झाल्याने सुकी नदीला पूर आला आहे. या पुरात मुक्ताईनगर तालुक्यातील ९ पर्यटक सायंकाळी साडेसात वाजता अडकल्याचे समोर आले. एकीकडे नदीचा पूर वाढत असताना रात्रीच्या अंधारात तब्बल पावणेतीन तास कसरत करून रात्री ९.१५ वाजता प्रशासनाने स्थानिक पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने या सर्व ९ जणांना सुखरुप बाहेर काढले. मात्र, सुटकेचा हा थरार क्षणाक्षणाला अंगावर काटा आणणारा ठरला.

Raver 
 
गणेश पोपटसिंग मोरे (वय २८), आकाश रमेश धांडे (वय २४), मुकेश श्रीराम धांडे (वय १९), पीयूष मिलिंद भालेराव (वय २३), लखन प्रकाश सोनवणे (वय २५), अतुल प्रकाश कोळी (वय २२), विष्णू दिलीप बोरसे (वय १९), रमेश सोनवणे (वय २४, सर्व रा.एकनाथ नगर, मुक्ताईनगर) आणि जितेंद्र शत्रुघ्न पुंड (वय ३० रा.चिखली ता.मुक्ताईनगर) हे नऊ जण सोमवारी पाल (ता.रावेर) येथील सुकी नदीवरील गारबर्डी धरण परिसरात फिरायला गेले होते. हे सर्व जण धरणाच्या सांडव्यापासून २०० मीटर अंतरावरील टेकडीवर होते. दरम्यान, दुपारी ४ वाजता धरण १०० टक्के भरल्यानंतर सांडव्यावरून १० सेंटिमीटर ओव्हर फ्लो सुरू झाला.
 
यानंतर धरणातील आवक कायम असल्याने हा विसर्ग सायंकाळी ६ वाजता ५० सेंटी मीटरपर्यंत पोहोचताच सुकी नदीला पूर आला.
सहा जणांनी वाचवले प्राण....पुरात अडकलेल्या ९ जणांना सुरखप बाहेर काढण्यात गारबर्डी व पाल येथील नागरिकांनी महत्त्वात भूमिका बजावली. पाल येथील संतोष दरबार राठोड, इम्रान शाह इक्बाल शाह, रतन भंगी बारेला (रा.गारखेडा), दारासिंग रेवालसिंग बारेला (गारबर्डी), गोविंदा चौधरी (रा.खिरोदा), सिकंदर गुलजार भील (रा.पाल) या सहा जणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून पर्यटकांना बाहेर काढले. मदत कार्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील मदत केली.