धक्कादायक : जावयाच्या दागिन्यांवर सासऱ्याचा डल्ला

    दिनांक : 19-Jul-2022
Total Views |
१५ दिवसांपासून होता मुक्कामी; रोकडसह दागिनेही चोरले, गुन्हा दाखल
 
जळगाव : १५ दिवस जावयाकडे मुक्कामी आलेला चुलत सासरा संधी साधून घरातील 90 हजार रुपये रोख व 77 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या असा 1 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज घेऊन रफुचक्कर झाला. या प्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अशिष राजकुमार तेजवाणी (वय 33, रा. टी. एम. नगर) यांच्या घरी हा प्रकार घडला. तेजवाणी यांचा मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. आशिष यांच्या पत्नीचे चुतल काका सुनिल मिठूमल गुमनामी (रा. माणपाडा रोड, डोंबिवली) हे जावई, मुलीस भेटण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून जळगावात आले होते होते.
 

JAL 
 
दरम्यान, रविवारी 17 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास तेजवाणी हे पत्नीसह मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. त्यांची दोन मुले ट्युशनला गेली होती. तर वडील परिसरात चहाच्या दुकानावर गेले होते. यावेळी तेजवाणी यांच्या घरात सुनिल गुमनामी हे एकटेच होते. हिच संधी साधून त्यांनी घरातून 90 हजार रूपयांची रोकड आणि 77 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या असा एकूण 1 लाख 67 हजार रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. सायंकाळी 6.30 वाजता तेजवाणी घरी आल्यानंतर त्यांनी सासरे गुमनामी यांना आवाज दिला. प्रतिसाद न आल्यामुळे तेजवाणी यांनी घरात, परिसरात त्यांचा शोध घेतला.
 
गुमनामी यांचा मोबाइल देखील बंद येत होता. त्यामुळे संशय बळावला. तेजवाणी यांनी घरात कपाटाची तपासणी केली असता सोने, रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले. गुमनामी यांनीच हा ऐवज चोरल्याचा त्यांना संशय आहे. त्यानुसार तेजवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुमनामी यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.