जळगाव प्रशासनाचा अनोखा उपक्रम... विदेशी रेसिडेन्शियल जळगावकरांची वेबसाईट होणार तयार

    दिनांक : 19-Jul-2022
Total Views |
जिल्हाधिकारी राऊत यांचा पुढाकार, शिक्षण-नोकरीसाठी जाणाऱ्यांना होणार मदत
 
जळगाव : लवकरच विदेशी जळगावकरांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फॉरेन रेसिडेन्शियल जळगावकरांची वेबसाईट तयार करण्यात येत आहे.कोरोना संसर्ग कालावधीत विदेशात राहणाऱ्या जळगावकर नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला खूप कसरत करावी लागली. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर अजूनही ही माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
 
 


website-design 
 
 
 
ही वेब साईड तयार करण्याचा हेतू असा कि, त्या त्या देशात शिक्षण, नोकरीसाठी जाणाऱ्यांना त्या देशात राहणारे आपल्याच शहरातील नागरिकांची मदत घेता येईल. सीएसआर, समाजाला इतर बाबतीत मदतीसाठीही आगामी काळात हे संकेतस्थळ उपयोगी ठरेल. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत परदेशात गेलेल्या जळगावकरांची माहिती प्रशासनाकडून संकलीत करण्यात आली. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह विमानतळ प्राधिकरणाची जिल्हा प्रशासनाला मदत घ्यावी लागली होती.
 
या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राऊत यांचा पुढाकार
 
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर यंत्रणांकडून परदेशात गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती येणे बंद झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी जिल्हा सूचना व विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद बोरोले यांना फॉरेन रेसिडेन्सीयल जळगावकरांची वेबसाईट तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बोरोले यांनी वेबसाईट डिझाईन करायला सुरुवात केली आहे. त्या वेबसाईटवर जगभरातील वेगवेगळ्या देशात नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे.
 
विदेशात नोकरीसाठी जाणाऱ्यांना मदत
 
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने माहिती संकलित करणे हा एकमेव हेतू संकेतस्थळ तयार करण्यामागे नाही. जिल्ह्यातून वेगवेगळ्या देशात शिक्षण, नोकरी, उपचार, व्यवसाय व इतर कारणांनी आगामी काळात जाणाऱ्यांना त्या देशात असलेल्या जळगावकरांची मदत होणार आहे. एकट्या मुलीला विदेशात कसे पाठवायचे, अशी पालकांना चिंता सतावत असते. असे पालक त्या संबंधीत देशात असलेल्या जळगावकरांची मदत घेऊ शकतील. त्याचप्रमाणे विदेशातील जळगावकर नागरिकांकडून विविध उपक्रमांसाठी सीएसआर निधीचे आवाहन करता येणार आहे.