मुलाकडून फुटला वडिलांचा मोबाइल, आईने मारहाण करीत काढले मुलाला घराबाहेर

    दिनांक : 19-Jul-2022
Total Views |
'समतोल'ने केले कुटूंबियांचे समुपदेशन

जळगाव : भुसावळ तालुक्यात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाकडून वडीलांचा मोबाईल फुटला. या कारणावरुन आईने मुलाला मारहाण केली आणि घरातून बाहेर काढले. हा मुलगा तीन दिवस जिल्ह्यात फिरत राहिला. अखेर सोमवारी रात्री समतोल प्रकल्पाच्या बाल सहाय्य कक्षाच्या सदस्यांनी त्याची चौकशी करून बालगृहात रवानगी केली.
 

Samtol 
 
भुसावळ तालुक्यातील या मुलाकडून तीन दिवसांपूर्वी वडीलांचा मोबाइल फुटला होता. त्यामुळे आईने रागाच्याभरात मारहाण करुन त्याला घराबाहेर काढले. मार मिळाल्यामुळे मुलानेही डोक्यात राग घालून थेट घर सोडले.
 
घर सोडल्यानंतर एक दिवस तो जळगाव तालुक्यातील आजीकडे येऊन राहिला. दुसऱ्या दिवशी दुचाकीवरुन लिफ्ट मागुन जामनेर शहरात गेला. दिवसभर पावसात भिजल्यामुळे त्याची तब्येतही खराब झाली. सोमवारी रात्री तो भुसावळ रेल्वेस्थानकावर आला. तेथून रेल्वेने पुण्याला मोठ्या भावाकडे जाण्याची त्याची इच्छा होती. तत्पूर्वी हा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे समतोल प्रकल्पाचे महेंद्र व प्रशांत चौधरी यांनी भुसावळ स्थानकावर त्याला विश्वासात घेऊन विचारपुस केली.
 
यानंतर सर्व घटनाक्रम उघड झाला. चौधरी यांनी रात्री उशिरा या मुलास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी केली. मुलगा घरी जाण्यास नकार देत असल्यामुळे त्याची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांनाही संपर्क करण्यात आला आहे. समुपदेशन करुन या मुलाला परत घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.