गुरुपौर्णिमा आणि राजकीय पाय धुण्याचे कार्यक्रम

    दिनांक : 18-Jul-2022
Total Views |
 
आपल्या राजकीय गुरुसमोर नतमस्तक होणे हे वेगळे आणि त्याच्या पूजनाचे अवडंबर करणे हे वेगळे आहे. यंदा ‘भेटला विठ्ठल’ या गाण्यावर फेसबुक ‘रील’ बनवण्याच्या नादात बहुतांशी अवडंबर बघायला मिळाले. हे कार्यकर्ते आणि नेते दोघांकडून झाले. बघायला गेले, तर त्याने आपल्याला काय फरक पडतो, तर मित्रांनो फरक पडतो. एक आदर्श लोकशाही स्वीकारलेल्या देशातील काही पक्षातील मंडळी अशा प्रकारे एखाद्या सणाचे भरकटलेले अवडंबर माजवत असतील, तर ते लोकशाहीसाठी घातक असेल.
 
 
 
guru
 
 
 
महर्षी वेद व्यासऋषी यांची जयंती जगभर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये ‘गुरू’ या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हजारो वर्षांपासून विविध समूहातील शिष्यमंडळी गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय तन्मयतेने साजरा करतात. या दिवशी सर्वव्यापी गुरूसमोर नतमस्तक होऊन त्याच्याकडून दीक्षा घेऊन आपल्या क्षेत्रात प्रगती साध्य करण्यासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी शिष्यमंडळी आतुर असतात. त्यासाठी पाद्यपूजा आणि गुरुदक्षिणा या विशेष बाबी. परंतु, यंदा सोशल मीडियाच्या अतिव्यसनामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी या दिवशी अनेक ठिकाणी नेत्यांचे पाय धुण्याचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले होते. या गुरुपौर्णिमेच्या बदलत चाललेल्या प्रवासाबद्दल थोडेसे...!
 
गुरू-शिष्य परंपरा हा प्रचंड विस्तृत असा विषय आहे. एके ठिकाणी स्वामी दत्तावधूत सांगतात, अगदी साक्षात् सरस्वती लिखाणाला बसली, समग्र पृथ्वीचा कागद केला, सप्तसागर शाई म्हणून वापरला तरीही गुरू हा विषय संपणार नाही, इतका तो जटिल आणि ब्रह्मांडव्यापक विषय आहे. कारण, आपल्या संस्कृतीत गुरूला ‘तत्त्व‘ म्हणून संबोधले आहे. तो कोणत्याही स्वरूपात, अगदी निर्गुण-सगुण किंवा दैनंदिन जीवनातील मार्गदर्शक सहकारी स्वरूपातदेखील असू शकतो. मनुष्याला आपल्या कर्ममार्गात, आपापल्या जीवनात, सर्व अर्थाने यशस्वी होण्यासाठी एका उत्तम गुरूची आवश्यकता असतेच असते. स्वतःच्या क्षेत्रात अतुलनीय साहस, धैर्य आणि पराक्रम दाखवून यश मिळवू शकतो, हेदेखील केवळ गुरूमुळेच. गुरू मनुष्याला पुरुषार्थ गाजवण्यास प्रवृत्त करतो.
 
गुरू-शिष्य जोडीचे विषय निघाले की, गुरू द्रोण व एकलव्याचा अंगठा, श्रीकृष्ण व सांदीपनी ऋषी, आर्य चाणक्य व चंद्रगुप्त, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद ते अगदी आजपर्यंत रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर, अशा विविध क्षेत्रांतील जोड्या पटकन डोळ्यांसमोर येतात. भारतातील प्राचीन शिक्षण पद्धतीत गुरुदक्षिणा, पाद्यपूजा याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे, पण अवडंबर नाही.परंतु, काळाप्रमाणे सगळेच बदलत असते. गुरू-शिष्य परंपरादेखील बदलत गेली, अनेक भोंदू गुरूंनी हजारोंच्या संख्येने जनतेला भुलवण्यास सुरुवात केली, त्यात यंदा भर पडली ती राजकीय नेत्यांच्या गुरूपौर्णिमा पूजनाची!
आपल्या राजकीय गुरूसमोर नतमस्तक होणे हे वेगळे आणि त्याच्या पूजनाचे अवडंबर करणे हे वेगळे आहे. यंदा ‘भेटला विठ्ठल’ या गाण्यावर फेसबुक ‘रील’ बनवण्याच्या नादात बहुतांशी अवडंबर बघायला मिळाले. हे कार्यकर्ते आणि नेते दोघांकडून झाले. बघायला गेले, तर त्याने आपल्याला काय फरक पडतो, तर मित्रांनो फरक पडतो. एक आदर्श लोकशाही स्वीकारलेल्या देशातील काही पक्षातील मंडळी अशाप्रकारे एखाद्या सणाचे भरकटलेले अवडंबर माजवत असतील, तर ते लोकशाहीसाठी घातक असेल.
 
नेते अनेक प्रकारचे असतात, काही असतात जे लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे असतात; तर काही असतात जे सोशल मीडियावरचे, हवेतले. आता गुरुपौर्णिमा उत्सव अशा जनतेच्या प्रेमातून साजरा होत असेल, तर त्यात वावगे काहीच नाही. कारण, हजारो जनतेच्या समस्यांचा त्या नेत्याने निचरा केलेला असतो, अनेक अडल्या-गांजलेल्या लोकांना मदत केलेली असते, त्याचे त्या जनतेमार्फत प्रेमाचे प्रकटीकरण म्हणून अशा नेत्यांकडे जनता लवून नमस्कार करायला उभी राहते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ठाण्यातील आनंद दिघे!
 
अशी एक-दोन उदाहरणे सोडली तर बाकीच्यांचे काय? काल फेसबुकवर ज्या नेते मंडळींनी गुरूपौर्णिमा म्हणून स्वतःचे पाय धुवून घेतले त्यांचे काय? आरशासमोर उभे राहून आपण खरेच या पात्रतेचे आहोत का, असे या मंडळींनी स्वतःला विचारले तर आरसा फुटेल, अशी यांची कुवत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला नेत्याचा व्हिडिओ पाहून तर मला हसावे की रडावे, हे कळत नव्हते. परंतु, सोशल मीडियाच्या जमान्यात सर्वात पहिले व्यक्त होण्याची स्पर्धा लागली आहे, त्याचे हे नेते आणि कार्यकर्ते रुग्ण झाले आहेत. मला असे वाटते की सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनीसुद्धा थोडेसे जागृत होण्याची वेळ आली आहे. आपण कोणाचे पाय धुतोय? त्याची तेवढी पात्रता आहे का? त्याने त्याच्या नेत्यांचे पाय धुवून चित्रफित टाकली, आता मी पण माझ्या गल्लीतील नेत्यांची पाय धुण्याची चित्रफित टाकणार, अशी चिल्लर स्पर्धा आपल्या बालिश बुद्धीचे प्रदर्शन करते, हे कार्यकर्त्यांनी ओळखायला पाहिजे. बरे यातील बरेच कार्यकर्ते घरी आई-वडिलांशी कशाप्रकारे वागतात, कसे उद्धट बोलतात, आईला कधी पेलाभर पाणीदेखील देत नाहीत, वडिलांच्या कधी पाया पडत नाहीत आणि गल्लीतील नेत्याच्या पाय धुण्याच्या कार्यक्रमाला हार घेऊन पहिले हजर. यातून कार्यकर्त्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे.
 
मी स्वतःला या बाबतीत नशीबवान समजतो. कारण, माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये असल्या नौटंकीला अजिबात स्थान नाही. मुळात भगवा ध्वज हाच आमचा गुरू, असे संस्कार असलेल्या संघाच्या विचारधारेतून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे येत असल्याने पाय धुणे वगैरे नौटंकी चालत नाही. तरी परवा एक-दोन नेत्यांनी हे केलेच, त्यांचे 2024 ला उत्तर मिळालेले असेल.
 
राजकीय गुरूप्रति आपले प्रेम आणि आदर जर खरा असेल, तर तो कसा प्रकट होतो, याची दोन उदाहरणे देतो आणि थांबतो. एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले तेव्हा राज ठाकरे यांचे बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत विनम्रपणे पायी चालत जाणे. दुसरे म्हणजे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत लाखो लोकांसोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विनम्रपणे पायी चालत जाणे. आपल्या कर्म क्षेत्रातील गुरूप्रति आपले प्रेम आणि आदर कसा असावा, याचे विहंगम दृश्य मोदींनी विश्वाला त्या दिवशी दाखवून दिले. त्यामुळे आजच्या सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांनी नेत्यांचे पाय धुण्यापेक्षा असे आदर्श घेतले, तर नक्कीच आपले कौतुक होईल!