महावितरण : बनावट SMS चा सुळसुळाट, संपर्क करताच झाला घात

    दिनांक : 18-Jul-2022
Total Views |
वीज बिल अपडेट करण्याच्या नावाने वृद्ध डॉक्टराची 59 हजारांची फसवणूक
 
जळगाव : वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर वृद्ध डॉक्टरांनी महावितरणच्या कार्यालयात फोन केला. परंतु, कार्यालयातील फोन कुणीही उचलला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी वीज बिल अपडेटच्या संदर्भात मोबाइलवर आलेल्या एका अनोळखी मॅसेजमधील क्रमांकावर फोन केला. त्या फोनवर बोलणाऱ्या भामट्याने डॉक्टरांना विश्वासात घेऊन 59 हजार 875 रुपये परस्पर वर्ग करुन ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. दीपक रमाकांत पाटील (वय 59, रा. पंचम हॉस्पीटल, भास्कर मार्केट) यांची फसवणूक झाली आहे.
 

Mahavitran 
 
सविस्तर घटना अशी की, डॉ. पाटील यांच्या घराचा वीज पुरवठा 16 जूलै रोजी सकाळी 9.30 वाजता खंडीत झाला. त्यामुळे डॉ. पाटील यांनी महावितरणने दिलेल्या अधिकृत फोन नंबरवर कॉल केला. हा कॉल कुणीही रिसीव्ह केला नाही. त्यामुळे डॉ. पाटील यांची गैरसोय झाली. दरम्यान, 15 जूलै रोजी डॉ. पाटील यांना एका अनोळखी मोबाइलवरुन मॅसेज आलेला होता, या मॅसेजमध्ये वीज बिल अपडेट करण्याची सूचना केली होती. तसेच अपडेटसाठी 9749170037 हा क्रमांक दिला होता.
 
त्यानुसार डॉ. पाटील यांनी संबधित मोबाइलवर फोन केला. यावेळी भामट्याने एक लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सुरुवातीला 10 रुपये घेतले. यानंतर भामट्याने डॉ. पाटील यांना विश्वासात घेऊन बँक खात्याच्या संदर्भात माहिती, ओटीपी विचारुन घेतले. काही वेळातच डॉ. पाटील यांच्या खात्यातून 59 हजार 875 रुपये परस्पर वर्ग झाल्याचे मॅसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे डॉ. पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी सोमवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.