जळगावातील दाम्पत्याची ट्रॅव्हल्स खरेदी व्यवहारात १५ लाखांची फसवणूक; न्यायालयाच्या आदेशाने चौघांवर गुन्हा

    दिनांक : 18-Jul-2022
Total Views |
जळगाव : गुजरात राज्यातून खरेदी केलेल्या ट्रॅव्हल्सच्या व्यवहारात एका दाम्पत्याची 15 लाख 27 हजार 167 रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

JAL BUS 
 
राजेश मेहता व त्यांच्या पत्नी शिला (रा. गुड्डुराजानगर) या दाम्पत्याची फसवणूक झाली आहे. फाल्कन बस लाईन प्रा. लि. चे संचालक हार्दीक इंदरकुमार कोटक, जयश्री इंदुभाई कोटक, मित्तल हार्दीक कोटक, इंदरकुमार कांतीलाल कोटक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
घटना अशी की, मेहता दाम्पत्याने प्रवासी वाहतूक करण्यासाठी वातानुकूलीत खासगी ट्रॅव्हल्स खरेदीसाठी फाल्कन कंपनीशी संपर्क केला होता. 23 सप्टेबर 2018 रोजी त्यांनी कंपनीला 2 लाख रुपयांची रोकड व 5 लाख रुपयांचा धनादेश दिला. यानंतर वेळोवेळी करुन 15 लाख 27 हजार 167 रुपये दिले. कंपनीने त्यांना ट्रॅव्हल्स दिली होती. परंतु, कोणत्याही प्रकारचा करार केला नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स पुर्णपणे मेहता दाम्पत्याच्या नावे झालेली नव्हती.
 
अशात त्या ट्रॅव्हल्सवर व्यवसाय करणे देखील धोकादायक झाले होते. मधल्या काळात कोरोना संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन झाले. यावेळी व्यवसाय पुर्णपणे बंद पडला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कंपनीने पासिंग, फिटनेस व करार करण्याच्या बहाण्याने मेहता यांच्याकडून ट्रॅव्हल्स मागवून घेतली.
 
31 ऑक्टोबर 2020 रोजी मेहता यांनी ट्रॅव्हल्स पाठवून दिली. सर्व प्रक्रीया पुर्ण करुन आठ दिवसात ट्रॅव्हल्स परत पाठवू असे उत्तर त्यांना देण्यात आले होते. परंतु, दोन महिने झाले तरी ट्रव्हल्स पाठवली नाही. या प्रकरणी मेहता यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. सुनावणीअंती न्यायालयाने संबधित कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र सोनार तपास करीत आहेत.