फलाट ओलांडताना रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू , पाचोरा रेल्वे स्थानकावरील सकाळची घटना

    दिनांक : 17-Jul-2022
Total Views |
जळगाव : पाचोरा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक तीनवर रेल्वे बोगीतून उतरून फलाट क्रमांक दोनवर जाण्याच्या प्रयत्नात असताना अपमार्गावर रेल्वेखाली आल्याने झालेल्या अपघातात एका ५० ते ५५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजता घडली. सुनीता एस. पाटील (रा. शिंदाड, ता.पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे.
 
Pachora_Acc 
 
 
 पाचोरा येथील कृषी कॉलनी येथील रहिवासी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एस.पी. पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील या पुणे येथे मुलीच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. पुणे येथून ११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करीत होत्या. त्या पाचोरा रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान फलाट क्रमांक ३ वर उतरल्या. त्या पादचारी पुलावरून न जाता फलाट क्रमांक दोनवर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होत्या. याच वेळी दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस (क्रंमाक २२२२२) सुनीता पाटील ह्या राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मयत सुनिता सुरेश पाटील यांच्या पाश्चात्य पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा रेल्वे स्टेशनचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

अपमार्गावरून रेल्वे जात होती. या गाडीकडे लक्ष नसल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना त्या गाडीखाली आल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 
या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुली, जावई, मुलगा असा परिवार आहे.