एसटीला विठ्ठल पावला! उत्पन्न एक कोटींवर

    दिनांक : 17-Jul-2022
Total Views |
अडीच वर्षानंतर भाविकांचा प्रतिसाद; महामंडळाला मिळाला कोटींचा महसूल
 
जळगाव : यंदा एसटी महामंडळाला पंढरपूरची यात्रा चांगलीच पावली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या निर्बंधांमुळे पंढरपूर तसेच अन्य ठिकाणी यात्रा स्पेशल बस प्रवासी वाहतूक बंद होती. निर्बंध शिथिल झाल्याने पंढरपूर यात्रेसाठी जळगाव विभागातुन 250 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या यात्रा स्पेशल साठी कर्मचार्‍यांचे नियोजन आणि भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जळगाव विभागाला 1 कोटींच्यावर महसूल मिळाला असल्याचे जळगाव विभाग प्रमुखांनी म्हटले आहे.
 

Lalpari  
 
यावर्षी कोरोना संसर्ग निर्बंध मार्च 2022 मध्ये शिथील करण्यात आले आहेत. जळगाव एसटी विभागातर्फे पंढरपूर यात्रेसाठी जिल्हयातील अकरा आगारातून 6 जुलैपासूनच 150 एसटी गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. जालना आणि नगरसाठी देखिल प्रत्येकी 50 बसेस सोडण्यात आल्या होत्या.
 
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
 
दरवर्षी पंढरपूर यात्रेच्या माध्यमातून जळगाव विभागाला 50 ते 60 लाख रूपयांचा महसूल मिळतो. परंतु यावर्षी तब्बल चाळीस लाख रूपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. कर्मचारी आणि बसेसचे नियोजन, तसेच कर्मचार्‍यांचा उत्साह आणि शेकडो नव्हे तर हजारो प्रवाशांचा पंढरपूर यात्रोत्सवासाठी मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे महसूली उत्पन्नात वाढ झाली आहे.
 
पंढरपूर यात्रेस मिळालेला प्रतिसाद पहाता आगामी काळातील गणेशोत्सवासाठी कोकणात जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच नवरात्रौत्सवासाठी देखिल नेहमीप्रमाणे भाविकांच्या मागणीनुसार जादा बसेसची सुविधा करण्यात येणार असल्याचे जळगाव विभाग प्रमुख भगवान जगनोर यांनी 'दै. तरूण भारत'शी बोलतांना सांगीतले.
 
भाविकांच्या मागणीनुसार एसटी बससेवा उपलब्ध
 
शिवाय 'गाव तेथे एसटी' या उपक्रमांतर्गत किमान 35 ते 40 पुरेसे प्रवासी एकत्र येवून, यात्रेसाठी मागणी केल्यास स्वतंत्र बस सोडण्याची देखिल व्यवस्था जळगाव परिवहन महामंडळाकडून करण्यात आली होती. या सुविधेच्या माध्यमातून जिल्हयातील हजारो भाविकांनी पंढरपूर यात्रेचा लाभ घेतला आहे. तर महामंडळाला सुमारे 1 कोटी 9 लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे.