जि.प.समोरील रस्ता गेला खड्ड्यात; नागरिकांसह कर्मचारी जखमी

    दिनांक : 16-Jul-2022
Total Views |
  • शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामांमुळे साचले पावसाचे पाणी
  • पाण्यामुळे खड्डयांचा चुकतोय अंदाज; मुरूम टाकून मलमपट्टी
 
रामदास माळी  

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामांमुळे जि.प.समोरून तहसील आणि बाजारपेठेत जाणार्‍या रस्त्याची वाट लागली आहे. पावसामुळे या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज वेत नसल्याने जि.प.च्या कर्मचार्‍यांसह इतर नागरिकही जखमी झाले आहे. त्यामुळे अपघात होऊन नागरीकांना दररोजच्या दुखापती होत आहे. मात्र महापालिका प्रशासन आणि संबंधित उड्डाणपुालचे काम करणारे मक्तेदार याकडे जाणवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी या रस्त्यावर मुरूम टाकून एका बाजूने डागडुजी करण्यात आली. मात्र दुसर्‍या बाजूकडील खड्डा त्याच अवस्थेत आहे.

ZP 1 
 
जि.प.समोरून रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यासाठी कामानिमित्त तहसील कार्यालय, जिल्हा परिषद याठिकाणी शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांची गर्दी होत असते. मात्र या रस्त्यावरून दुचाकी चालक वाहन घेऊन गेल्यास साचलेल्या पाण्यातील खड्डयात जाऊन पडतो. कारण पाण्यातील खड्डा समजत नसल्याने याठिकाणी त्यांचा तोल जाऊन दुचाकीधारक जखमी होतात. ही नित्यांचीच घटना झाली आहे. मात्र महापालिका प्रशासन मात्र या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत गांभीर्याने कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
 

ZP 2 
 
जि.प.तील कर्मचारी, अधिकारी यांचा या मार्गावरून नियमित वापर असतो. कर्मचार्‍यांना कर्तव्यावर येण्यासाठी याच रस्त्यांने ये-जा करावी लागते. महापालिका प्रशासाने आणि संबंधित मक्तेदाराने पुलामुळे झालेली अडचण लक्षात घेता ही समस्या मार्गी लावण्याची गरज आहे. ग्रामिण भागातील नागरिक जि.प.त आणि तहसील कार्यालयात कामानिमित्त सोमवारीपासून शुक्रवारपर्यंत दाखल होत असतात. त्यामुळे या जिल्हाभरातील नागरिक या रस्त्यांच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. जि.प.कर्मचार्‍यांनीही या रस्त्यांची तातडीने दुरस्त करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने याठिकाणी पाणी साचण्याची स्थिती जैथे राहिल्यास वारंवार वाहनधारक जखमी होण्याचे सत्रही सुरूच राहणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने तात्पुरती डागडुजी न करता या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 
पावसामुळे या रस्त्यावर चिखल साचतो. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविरे अवघड होते. अन जण या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील खड्ड्यात पडून जखमी झाले. मनपाने या रस्त्यांबाबत तातडीने उपाय योजना करावी.
 
- प्रशांत पाटील, जळगाव
 
तहसील कार्यालयात कामानिमित्त येण्यासाठी हा रस्ता सोयीचा होतो. तसेच रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकावरून येण्या- जाण्यासाठी या रस्त्यानेच मार्गक्रमण करावे लागते. पुलाच्या कामामुळे या रस्त्यावर खड्डे झाल्याने पाणी साचते. त्यात दुचाकी खड्ड्या जाऊन आदळतात आणि जखमी होतात. त्यासाठी रस्त्यांची दुरूस्ती नितांत गरजेची आहे.
 
- संजय माळी, जळगाव