श्रीलंकेचा धडा!

    दिनांक : 16-Jul-2022
Total Views |
 
घराणेशाहीचा नाग देशाच्या सार्वभौमत्वाला कसा विळखा घालतो आणि एखादे संपन्न राष्ट्र अराजकाच्या गर्तेत कसे ओढले जाते, त्याचे श्रीलंका हे उत्तम उदाहरण मानावे लागेल. अन्य आशियाई देशांनी यातून योग्य तो धडा घेणे आवश्यक आहे.
 
 
 

shrilanka 
 
 
 
गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि श्रीलंकेतली राजकीय धुमश्चक्री काही काळ थंडावली. केवळ राजीनाम्याने थंडावणारे हे प्रकरण मुळीच नाही. कारण, श्रीलंकेचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण सगळेच सध्या एका विचित्र वळणावर येऊन ठेपले आहे. नेतृत्वाचा अदूरदर्शीपणा, लादलेली किळसवाणी घराणेशाही आणि आपल्या निर्णयांच्या गर्तेत अडकत गेलेले राजकीय नेतृत्व, अशी श्रीलंकेची शोकांतिका. या सगळ्याला सुरुवात राजपक्षेंच्या नेतृत्वापासूनच झाली. सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून महिंदा राजपक्षे यांनी स्वत:कडे पंतप्रधानपद घेतले. आपल्या भावाला राष्ट्रपती केले. त्यानंतर बासिल या आपल्या भावाला अर्थमंत्री केले. स्वत:च्या मुलाला युवा आणि क्रीडा विभागाचे मंत्री केले. राजपक्षेचा अजून एक भाऊ चामल यांना पाटबंधारे मंत्री केले. चामल यांचा मुलगा शशींद्र याला कृषी राज्यमंत्री केले. आपला मेहुणा निषिता विक्रमसिंघे याला त्यांनी श्रीलंका ‘एअरवेज’चे प्रमुख केले. आपल्या अजून एका मुलालाही त्यांनी अशीच मोठी जबाबदारी घेऊन सत्तेत स्थान दिले. इंग्रजीत एक म्हण आहे. ‘ब्लड इज थिकर दॅन वॉटर’. रक्त पाण्यापेक्षा दाट असते. म्हणजे रक्ताचे नाते हे अशा प्रकारच्या सत्ताग्रहणात महत्त्वाचे ठरते. राजपक्षे परिवाराच्या सत्ताग्रहणाची ही यादी संपणारी नाही. अनेक उपपदे व सत्तेची बरीचशी मुख्य पदे या परिवाराने व त्यांच्या चेल्याचपाट्यांनी बळकावली. परिवार जेव्हा सत्तेवर प्रभावी होतो, तेव्हा सर्वात आधी तो मूलभूत संस्थांना कुरतडायला सुरुवात करतो.
 
राष्ट्र म्हणून हे अधिकच घातक असते. कारण, अशा घातक हस्तक्षेपांमुळे संवैधानिक संस्थाच नष्ट व्हायला लागतात. श्रीलंकेचेही तेच झाले. मुळात श्रीलंका हे काही गरीब राष्ट्र नाही. दोन-अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातले ‘जीडीपी’ किंवा अन्य आर्थिक निकष हे भारताशी स्पर्धा करणारे आहेत. काही श्रेणीत तर ते सरसही आहेत. मग हे संकट ओढवायचे कारण काय तर कुटुंबाच्या हातात सत्ता दिल्यानंतर माजलेली प्रशासनातील बजबजपुरी. एकदा का कुटुंबाचे लोक आणि तशा प्रकारच्या नेमणुका व्हायला लागल्या की ‘तुम्ही कोण आहात?’ यापेक्षा ‘तुम्ही कोणाचे कोण आहात?’ याला महत्त्व येते.
 
व्यक्तींच्या लहरीपणामुळे नेमणुका झालेल्या व्यक्ती संस्थात्मक परस्परावलंबित्व तोडून टाकतात आणि अराजकाची स्थिती यायला सुरुवात होते. श्रीलंकेकडे चांगल्या संख्येने लष्करीबळ आहे. यातल्याच एका जनरलला राजपक्षे कुटुंबाने नागरी अन्नपुरवठ्याच्या बाबतीत आयुक्त करून टाकले. इथेच या अराजकाला सुरुवात झाली. श्रीलंकेत खूप सारा नागरीपुरवठा अन्य देशांतून होतो. याचा संबंध श्रीलंकेच्या चलनाशी व डॉलरशी आहे. या अराजकामुळे देश म्हणून असलेला विविध विभागांचा आंतरसमन्वय व परास्परांविषयी असलेले उत्तरदायित्व पूर्णपणे संपून गेले. कुठलाही देश ही एक ‘इकोसिस्टम’ असते. त्यातला कोणताही एक दुवा कच्चा झाला किंवा निखळला की संपूर्ण ‘इकोसिस्टीम’ कोलमडते. श्रीलंकेत बँकिंग, वाहतूक, पुरवठा या आणि अशा सगळ्याच घटकांवर अराजकाचा परिणाम झाला. नागरी पुरवठ्याच्या बाबातीत जी खरेदी आंतरराष्ट्रीय स्तरावरून होत होती, त्यात जो खुलेपणा होता तो राजपक्षेंच्या नव्या आयुक्तांनी संपविला.
 
राजपक्षे कुटुंबीयांना आलेला अजून एक लहरी झटका म्हणजे पर्यावरणप्रेमाचा. पर्यावरणप्रेम हे घराण्याच्या राजकारणाचे एक कोडे आहे. बहुदा लोकांमध्ये आपली मठ्ठ कामे लपविण्यासाठी ही झुल पांघरली जाते. इथे जसा आता आरेचे जंगल वाचविण्याचा तमाशा चालू आहे, तसाच तमाशा राजपक्षे यांनी श्रीलंकेत केला. त्यांना एकाएकी श्रीलंकेची सगळी शेती रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या शिवाय करायची हुक्की आली आणि त्यांच्या संपूर्ण सत्ताधारी परिवाराने ही कल्पना उचलून धरली आणि बळजबरीने चालविली देखील. श्रीलंकेतील कीटकनाशके व रासायनिक खते उत्पादन करणार्‍यांना व विकणार्‍या लोकांवर या बंदीचा अंमल चढविण्यात आला. याचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. श्रीलंकेच्या कृषी उत्पादनांचे प्रमाण झपाट्याने घटले. काही ठिकाणी तर ते नगण्य झाले. याचा परिणाम धान्य, भाजीपाल्याच्या किमती भरमसाठ वाढण्यात झाला. पर्यटन हा श्रीलंकेच्या उत्पन्नातला महत्त्वाचा घटक.
 
‘कोविड’ परिस्थिती हाताळण्यात राजपक्षे परिवार आणि त्यांची सत्ताधारी टोळी सपशेल फसली. मात्र, त्यांच्या चेल्यांनी या वास्तवाची या परिवाराला बिलकूल जाणीव होऊ दिली नाही. आपल्याकडे मुंबई ‘कोविड’मध्ये चाचपडत असताना आपल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ‘बेस्ट सीएम’ पुरस्कार मिळाला होता तसेच काहीसे! याचा गंभीर परिणाम श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला. पर्यटन हा अनेकांना रोजगार देणारा व्यवसाय. यातली अस्वस्थता बहुपेडी असते. गेल्या दीड-दोन वर्षांत ही खदखद सुरूच होती. मात्र, राजपक्षे परिवार स्वत:च्या सत्तेच्या आनंदात मशगुल होता. आता राजपक्षे परिवार श्रीलंकेतून परागंदा झाला आहे. सिंगापूरने त्यांना राजकीय आश्रय दिल्याचे नाकारले आहे. पुढे काय होईल माहीत नाही. खर्‍या अर्थाने बहुपेडी असलेला हा देश लोकशाही चांगली रुजल्याने स्वत:चा इतका विकास करू शकला. श्रीलंकेत अंतर्गत संघर्ष झाले. मात्र, राष्ट्रपतींना पदच्युत करण्यापर्यंत प्रकरण गेले नव्हते. आशियाई देशात अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या भाईबंधांना सत्तेच्या महत्त्वाच्या पदावर बसविण्याचे प्रकार झालेले नाहीत!