गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; गिरणा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले

    दिनांक : 16-Jul-2022
Total Views |
गिरणा प्रकल्पातून २४७६ क्यूसेक (७०.११क्यूमेक्स) पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
 
जळगाव त.भा : गिरणा नदी आणि प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाण्याच्या आवकेत वाढ झाली आहे. प्रकल्पात पाण्याची आवक पहाता प्रकल्प सुरक्षिततेच्या दृष्टिने शनिवार दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रकल्पाचे दोन गेट उघडून २४७६ क्यूसेक अर्थात ७०.११क्यूमेक्सपाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 
 
 

girana
 
 
जिल्ह्यातील हतनूर वाघूर आणि गिरणा या तीन मोठ्या प्रकल्पांपैकी सहा ते सात तालुक्यांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसह शेती सिंचनाला वरदान असलेला गिरणा प्रकल्पाची सलग चौथ्या वर्षी पूर्णत्वाकडे वाटचाल झाली आहे. यापूर्वी २०१९, २०२० आणि २०२१ या सलग तीन वर्षात सप्टेंबरमध्ये गिरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने योगायोगाने १७ सप्टेंबर २०१९ आणि २०२० तर २९ सप्टेबर २०२१ असा पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तर यावर्षी मान्सूनच्या पहिल्या टप्प्यातील जुलै महिन्यात सलग चौथ्या वर्षी १०० टक्के प्रकल्पाची पूर्णत्वाकडे वाटचाल झाली आहे.
 
 
 
गेल्या ६ जुलै रोजी गिरणा प्रकल्पात ३३.६० टक्के उपयुक्त जलसाठा असल्याची नोंद होती. उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे दमदार पुनरागमन झाल्याने गिरणा नदी उगम क्षेत्रातील कळवण सटाणा नांदूरी गड आदी क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने १६ जुलै रोजी गिरणा प्रकल्पात ९१.६२ टक्के पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्पाच्या सुरक्षीततेच्या दृष्टिने आणि पाण्याची आवक पहाता शनिवार १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता प्रकल्पाचे दोन गेट उघडून २४७६ क्यूसेक (७०.११क्यूमेक्स) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
विसर्गात होणार वाढ
 
चाळीसगाव व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गिरणा प्रकल्पाची क्षमता ३९८.०७० मिटर असून सद्यस्थितीत प्रकल्पात ३९७.३४० मिटर पाणीसाठा आहे. तर २६.२५ दलघमी पाण्याची आवक होत असून प्रकल्प पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत २८८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्पात होणारी पाण्याची आवक पहाता प्रकल्प सुरक्षिततेच्या दृष्टिने प्रकल्पाचे १ आणि ६ क्रमांकाचे दोन गेट १ फूटाने उघडण्यात आले असून प्रकल्पातून २४७६ क्यूसेक (७०.११क्यूमेक्स) विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. तसेच प्रकल्पात होणारी पाण्याची आवक पहाता पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी गिरणा प्रकल्पाच्या खालील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
डि.पी. अग्रवाल
कार्यकारी अभियंता,
गिरणा प्रकल्प पाटबंधारे विभाग जळगाव