उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

    दिनांक : 16-Jul-2022
Total Views |
धरणगाव तालुक्यात उपजिल्हाप्रमुखासह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
 
जळगाव : राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली असून एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे असे दोन गट पहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम पहायला मिळत असून धरणगाव तालुक्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहेत. धरणगावचे उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शनिवारी आपआपले पदाचे राजीनामे दिले असून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांना व्हॉटस्ॲप संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या पदाचे राजीनामे पाठविल्याची माहिती मिळाली आहे.
 

uddhav_thackeray 
 
या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत
 
माजी मंत्री गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या मतदार संघातील सेनेच्या पदाधिकारी सुध्दा एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत . माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये आज सकाळपासून राजीनामा सत्र सुरु झाले आहे. यात शिवसेना धरणगाव शहर राजेंद्र महाजन, उपजिल्हा प्रमुख तथा धरणगावे माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी सकाळीच राजीनामा दिला होता. त्यानंतर आता साळवा-बांभोरी गटाचे युवासेना विभाग प्रमुख नितीन पाटील आणि युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील यांनी आपाआपले राजीनामे पाठवले आहेत.
त्याचप्रमाणे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामधील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांनी सामूहिक राजीनामे व शिंदे गटाला समर्थन दर्शविले आहे. पाळधी येथील विश्वनाथ महाजन उर्फ आबा माळी, चंदू इंगळे, पिटु कोळी, हर्षल पाटील, पप्पू माळी, दीपक श्रीखंडे, अरुण पाटील, प्रशांत झंवर, चंदन कळमकर, दानिश पठाण, गजानन ठाकूर, संजय महाजन, आदींनी सामुहिक राजीनामे दिले आहेत.
 
राजीनाम्यांमध्ये नेमके काय म्हटलं आहे...
 
जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण राजीनामा देत आहे. आमचे नेते गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या गटात सहभागी झाले आहेत. आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून भविष्यात गुलाबराव पाटील साहेब जो ही निर्णय घेतील तो, आम्ही मान्य करू व त्यांच्यासोबत राहू. मी स्वखुशीने राजीनामा देत आहोत. गुलाबराव पाटील यांनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे असे राजीनाम्यात म्हटले आहे.