‘चिरीमिरी’ प्रकरणात ६ महिन्यात अडकले १६ जण

    दिनांक : 16-Jul-2022
Total Views |
कृष्णराज पाटील  
 
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटची कामगिरी

जळगाव : ‘चिरीमिरी’ दिल्याशिवाय काम होतच नाही, असे अनेकवेळा सर्वसामान्यांकडून बोलले जाते. याविरूद्धच्या अभियानात जळगाव जिल्हयात गेल्या सहा महिन्यात 9 विभागातील 16 जणांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटने सापळ्यात अलगद अडकवल्याचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांनी सांगितले.
 

ACB 
 
उत्तर महाराष्ट्रात लाचखोरीच्या प्रकरणांत नाशिक जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून अव्वल स्थानी असून जळगाव दुसर्‍या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये आतापर्यंत लाचलुचपत विभागाकडून झालेल्या 65 केसेसपैकी नाशिकमध्ये 23, जळगाव 16, नगर 12, धुळे 8 आणि नंदुरबार 6 अशी स्थिती आहे. यात जळगाव जिल्हयात महसूल आणि जिल्हा परिषदेचे विभाग आघाडीवर असून त्यापाठोपाठ पोलीस व त्यानंतर अन्य विभागातील लाचखोरांचा समावेश आहे.
 
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे आर्थिक शोषण टळावे, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कठोर कारवाई करीत असतांना दुसरीकडे सरकारी कार्यालयात लाचखोरीची पाळेमुळे खोलवर रुजत असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत महसूलसह ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत पाठोपाठ कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक ‘पोलीस दादा’सुद्धा अशा प्रकरणांत अडकल्याचे विदारक चित्र आहे. खेदजनक बाब म्हणजे, लाचखोरीसंदर्भात सर्वसामान्यांना लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार करावी लागते, तरच कारवाई होते.
 

Chirimiri 
 
एकूण आकडेवारी अशी :
 
नाशिक विभागात
 
लाचखोरी प्रकरणात नाशिक - 23, नगर-12, जळगाव-16, धुळे-8, नंदुरबार-6
 
जळगाव जिल्ह्यात नववर्षाच्या सुरूवातीलाच 13 जानेवारी रोजी जामनेर येथील गोठा शेड बांधकाम वर्कऑर्डर देण्यासाठी पं. स.चा लिपीक सापळयात अडकला. जानेवारी ते जून अखेरपर्यंत दरमहा सुमारे दोन ते चार असे 24 सापळे लावण्यात आले. यात 16 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
 
जळगाव विभागात
 
जि.प.अंतर्गत पं.स. 2, ग्रामपंचायत 2, महसूल 4, पोलीस विभाग 2, वनविभाग 1, कृषी विभाग 1, ऊर्जा व सहायक कामगार विभाग 1, शिक्षण विभाग 1, सहकार 1, खासगी व्यक्ती सरपंच पती 1 अशा 16 जणांवर गुन्हे दाखल आहेत.
 
कामाबाबत लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क असून तक्रार येताच शहानिशा करून कारवाई केली जाते. यात संबंधितांचे सामाजिक नुकसान होत असले तरी हे सर्व प्रकार वारंवार लक्षात येऊनही लाचखोरी होते, हे दुर्दैव आहे. जनजागृतीसह सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, अधिक कठोरात कठोर कारवाई यापुढेही केली जाईल.
 
- शशिकांत पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग