पाकिस्तानातील ईदचे बिघडलेले समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र

    दिनांक : 15-Jul-2022
Total Views |
 
पाकिस्तानातील वाढती महागाई आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या भीषण स्थितीचा सामान्य पाकिस्तानींच्या क्रयशक्तीवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच, विविध वस्तूंच्या किमतींनी आज तेथे सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. परिणामी, ईदसारख्या सणाच्या दिवशीही पाकिस्तानमधील बाजारपेठा गजबजलेल्या दिसत नाहीत की, उद्योजकांची कुठलीही भरभराट झाली नाही.
 
 
 

pak 
 
 
 
ईदच्या निमित्ताने पाकिस्तानात दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दि. १० जुलै रोजी खूप जल्लोष होईल, असे एक साधारण चित्र होते. मात्र, यंदा इस्लामचा हा महत्त्वाचा सण लोकांच्या अपेक्षा आणि बाजारपेठेच्या तुलनेतही खूपच फिका ठरला. कारण, पाकिस्तानातील वाढती महागाई आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या भीषण स्थितीचा सामान्य पाकिस्तानींच्या क्रयशक्तीवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच, विविध वस्तूंच्या किमतींनी आज तेथे सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. परिणामी, ईदसारख्या सणाच्या दिवशीही पाकिस्तानमधील बाजारपेठा गजबजलेल्या दिसत नाहीत की, उद्योजकांची कुठलीही भरभराट झाली नाही.
 
साधारणपणे दरवर्षी ईदच्या सणानिमित्ताने पाकिस्तानी नागरिक गुरेढोरे, कपडे, खाद्यपदार्थ आणि इतर सणासुदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच ईदसाठी कुर्बानी दिलेल्या प्राण्यांवर सुमारे ३३५ अब्ज पाकिस्तानी रुपये (१.६ अब्ज डॉलर) खर्च झाला होता. परंतु, यंदा इंधन, वीज आणि खाद्यपदार्थांच्या महागाईमुळे पाकिस्तानी नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली असून, त्याचा थेट परिणाम ईदच्या एकूणच अर्थकारणावर झाल्याचे स्थानिक विश्लेषकांचे मत आहे. ‘पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’नुसार, जून महिन्यात देशातील महागाई २१.३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जो १४ वर्षांचा उच्चांक आहे.
 
‘ईदुल अजहा’ हा इस्लाममधील ‘ईद अल-फितर’ नंतरचा दुसरा सर्वात महत्त्वाचा धार्मिक सण, जो हजच्या आधी साजरा केला जातो. या सणात ईदच्या नमाजानंतर अल्लाला जनावराचा बळी देण्याची प्रथा आहे. इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पाकिस्तानमधील उत्सव कधीकधी संपत्तीच्या विकृत प्रदर्शनाचे स्वरूपही धारण करतात. या सणाच्या काही महिने अगोदरच पाकिस्तानातील श्रीमंत वर्गातील लोक मेंढ्या, शेळ्या, बैल आणि उंट खरेदीची सुरुवात करतात. तसेच त्यांच्याशी संबंधित इतर वस्तूंची मागणी वाढल्याने अनेक उत्पादक आणि व्यापार्‍यांना मोठा व्यवसायही मिळतो. याच काळात त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडते. पाकिस्तानमध्ये ईदच्या वेळी चाकू, बार्बेक्यू टूल्स आणि स्टोव्हची विक्रीही तितकीच तेजीत असते. जनावरांच्या विक्रीच्या व्यवसायामुळे ईदच्या दिवशी चांगली किंमत मिळावी, म्हणून वर्षानुवर्षे ही जनावरे पाळणार्‍या पशुपालकांना चांगला नफाही मिळतो. दरवर्षी उच्च प्रतीच्या जनावरांसाठी किमतीची स्पर्धा येथे जोरात असते आणि अशी उच्च प्रतीची जनावरे सोन्याच्या दराने इथे विकली जातात. काहीवेळेला तर जनावरांची किंमत इतकी जास्त असते की, तेथील वृत्तवाहिन्याही बातम्यांच्या कार्यक्रमांमध्ये या विक्रीचा समावेश करतात.एका गुरे विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार, १० ते १५ किलो वजनाच्या शेळी किंवा मेंढीची सध्या बाजाराच किंमत ३५ हजार ते ५० हजार रुपये इतकी आहे. कराची आणि पंजाबमध्ये तर असे बैलही विक्रीसाठी आणण्यात आले असून, त्यांची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचेही समजते.
 
यासोबतच पाकिस्तानमधील वाहतूक व्यवसायातही या दिवसात तेजीचे वातावरण सहसा दिसून येते. कारण, ईदच्या सुट्ट्यांमध्ये वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणावर त्यांच्या घरी परतण्याची आणि मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण करण्याची फायदेशीर संधी उपलब्ध होते. मात्र, यावेळी ईदमध्ये पाकिस्तानचे सर्व जुने अंदाज फोल ठरले आहेत. यावर्षी ईदच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानचा आर्थिक विकास दर सहा टक्क्यांवरून चार टक्क्यांवर खाली आला आहे, तर महागाई २१.३ टक्क्यांवर पोहोचली आहे. वीज आणि गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि देशात पेट्रोलचे दर प्रति लीटर २५० रुपयांवर पोहोचले आहेत, तर वाहतुकीच्या किमती ६२.२ टक्के, अन्नधान्याच्या किमती २६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानची व्यापारी तूट ४८.६६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे आणि डॉलर-रुपया विनिमय दर एका अमेरिकी डॉलरसाठी २०६.४ पाकिस्तानी रुपयाच्या पातळीवर पोहोचला आहे. ‘एसबीपी’ने बँकेचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. सिंध, खैबरपख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील २८ जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळामुळे उत्पन्नही कमी झाले आहे, तर रोग आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे
.
पाकिस्तानमध्ये गरिबीदेखील वाढली आहे. कारण, मध्यमवर्ग आता हळूहळू कनिष्ठ मध्यमवर्गाकडे सरकत आहे आणि रोजगाराच्या अभावामुळे खालच्या वर्गातील लोक दारिद्य्ररेषेकडे ढकलले जात आहेत.
 
पाकिस्तानातील वरील आर्थिक आणि चलनवाढीच्या दबावाचा केवळ सणांच्या भौतिक बाजूवरच परिणाम जाणवतो आहे असे नाही, तर आता तिथे ईदसारखे सण कमी प्रमाणात साजरे केले जात आहेत. कारण, पाकिस्तानातील बहुसंख्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीही आता मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे असे बिकट आणि दयनीय चित्र असताना दुसरीकडे मात्र राजकारण आणि व्यवसायाशी संबंधित लष्करी आणि श्रीमंत वर्गांमध्ये संपन्नतेचे निर्लज्ज प्रदर्शन अद्याप कमी झालेले नाही.
 
पाकिस्तानच्या अगदी स्थापनेपासूनच सणवारांच्या दिवशी उफाळून येणारा जातीय उन्माद हा आजदेखील तितकाच चिंतेचा विषय आणि त्यात सातत्याने वाढही होताना दिसते. त्याचवेळी गेल्या काही वर्षांत आर्थिक संकटांचाही या समस्यांच्या यादीत समावेश झाला असून, त्याचा केवळ औपचारिकच नव्हे, तर पाकिस्तानच्या सामान्य जनजीवनावरही व्यापक परिणाम होत आहे. पाकिस्तान सरकारच्या भेदभावपूर्ण धोरणांमुळे पाकिस्तानमध्ये एक सूक्ष्म, परंतु अत्यंत शक्तिशाली आणि श्रीमंत वर्ग विकसित झाला आहे.
 
त्यामुळे पाकिस्तानातील सूक्ष्म वर्गाचे आणि त्याच्या सभोवतालच्या गरिबीच्या महासागराचे सामाजिक समस्येत झालेले रूपांतर आता ठळकपणे दिसून येते. इस्लामच्या आधारे पाकिस्तान वेगळे राष्ट्र बनले खरे, पण आता नवीन मदिना बांधण्याच्या स्वप्नाखाली पाकिस्तान इस्लामच्याच अनुयायांनाही समाधानकारक जीवन जगण्याची संधी देऊ शकत नाही, हेच वास्तव.
 
सध्या जिथे पाकिस्तान प्रादेशिक आणि राष्ट्रीयतेच्या नावाखाली फाळणीच्या उंबरठ्यावर उभा आहे, तिथे आर्थिक शोषण आणि भेदभाव या सार्‍या प्रक्रियेला अधिक गती देतील, अशी एक शक्यता आहे. आमचा धर्म भेदभावांच्या पलीकडचा आहे, असा दावा करणार्‍या इस्लामच्या अनुयायांमध्येच ईदच्या दिवशी इतका भेदभाव दिसत असेल, तर इस्लामिक राष्ट्राच्या दृष्टीने या देशाचे भवितव्य निश्चितच अंधारात आहे, असे म्हणावे लोल.