मु. पो. मयुरभंज ते राष्ट्रपती भवन

    दिनांक : 14-Jul-2022
Total Views |
 
एकेकाळी लिपिक म्हणून काम केलेल्या ओडिशातील मयुरभंज या छोट्या गावात राहाणार्‍या वनवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांचा आता राष्ट्रपती भवनाच्या दिशेने होणारा आत्मविश्वासपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. आज त्यांच्या मुंबई दौर्‍यानिमित्त हा विशेष लेख...
 

murmu 
 
 
 
देशातील सर्वात दुर्गम आणि अविकसित जिल्ह्यात गरिबीशी झुंजत द्रौपदी मुर्मू यांची सुरू झालेली वाटचाल शिक्षक, ओडिशा सरकारच्या सिंचन खात्यातील लिपिक, भाजपच्या नगरसेविका, मंत्री, राज्यपाल या मार्गाने राष्ट्रपती भवनाकडे सुरू झाली आहे. एका सामान्य घरातून थेट ३५० एकर परिसर, १९० एकर बगीचा आणि ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपती भवनात त्या लवकरच जातील. सामान्य वनवासी कुटुंबात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या कर्तृत्वाचा हा चढता आलेख अचंबित करणारा आहे.
 
आजवरच्या वाटचालीतील संघर्ष, वेदना, दु:ख यांनी खचून न जाता, त्याच वेदनेतून प्रेरणा घेत समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करत राहिलेल्या द्रौपदी मुर्मू या म्हणूनच एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे भासतात.
 
कई-कई मोर्चे पर खड़ी
लड़ रही औरत
भीड़ में अकेली
अनवरत
थकती-टूटती
फिर मजबूत करती खुद को खुद से
खेतों, खलिहानों में
जंगल-मरुभूमि में
घर में, आंगन में...
 
झारखंडमध्ये वनवासी समाजाच्या समस्यांविरोधात आवाज उठवणार्‍या वनवासी कवयित्री वंदना टेटे यांचे हे शब्द वाचले की, द्रौपदी मुर्मू यांच्या संघर्षाचा पट डोळ्यांसमोर येतो. अमाप संपत्ती, घराणेशाही या कशाचाही मागमूस नसताना वनवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारी वनवासी समाजाची एक स्त्री, सर्वोच्च घटनात्मक पदावर नाव कोरणार आहे, ही समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लोकशाही अधिक सशक्त आणि सर्वसमावेशक झाल्याचे हे द्योतक आहे आणि जगभरामध्ये सामाजिक समता, सर्वसमावेशक विकास याचा संदेश देणारी ही एक ऐतिहासिक घटना आहे.
 
सर्वांच्या साथीने, सर्वांच्या प्रयासाने,सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकास घडवून मागास, वंचित, शोषित घटकांना योग्य सन्मान आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न नेहमीच भारतीय जनता पार्टी करत आली आहे. मंत्रिमंडळ तसेच सत्तापदे याबाबतीत हटके विचार करत अप्रकाशित व्यक्तिमत्वांना नेतृत्वाची संधी प्रदान करण्याच्या मोदी यांच्या शैलीचा परिचय द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यातून होत आहे.
 
समाजातील उपेक्षित घटकांना राजकारणात नाममात्र प्रतिनिधित्व देऊन सामावून घेण्याचा आव आणण्याऐवजी, या समाजातील एका प्रभावशाली, कर्तृत्ववान स्त्रीची राष्ट्रपतीपदासाठी एका रत्नपारख्याने केलेली ही सार्थ निवड आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारी योजनांचे लाभ देण्याचा अंत्योदयाचा विचार, सामाजिक न्याय, समतोल विकास, सत्तेचे विकेंद्रीकरण या सूत्रांनुसार भाजप वाटचाल करत आहे. शोषित, वंचित, मागास समाजाचा या पद्धतीने गौरव करणे हा भाजपच्या विचारधारेचा अविभाज्य भाग आहे.
 
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान द्रौपदी मुर्मू भावूक होत म्हणाल्या की, “मी एका छोट्या गावातील आहे. मी राष्ट्रपतीपदासाठी योग्य आहे का?” यातूनच त्यांचा विनम्रपणा दिसून येतो. त्या जितक्या विनम्र, मृदूभाषी तितक्याच कर्तव्यतत्पर,कठोर प्रशासक आहेत. मुर्मू यांना २००७ मध्ये सर्वोत्कृष्ट आमदाराचा ‘नीलकंठ’ पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला गेला होता. ओडिशा सरकारमध्ये वाहतूक, वाणिज्य, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन यांसारखी खाती सांभाळल्यामुळे उत्तम प्रशासकीय जाण आणि अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
 
झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल असलेल्या मुर्मू यांनी या पदाचा कार्यभार सांभाळताना आपल्यातील कर्तव्यकठोर प्रशासकाची चुणूक दाखवली दिली होती. पक्षीय राजकारणापलीकडे जात वनवासी समाजाला न्याय्य हक्क देण्यासाठी विरोधी पक्षांच्या मागणीवरून त्यांनी भाजपच्या रघुवर दास सरकारच्या वनवासींच्या जमिनीच्या मालकी संदर्भातील ‘छोटा नागपूर भाडेकरू कायदा’ (सीएनटी कायदा) आणि ‘संथाल परगणा भाडेकरू कायदा’ (एसपीटी कायदा) यातील काही तरतुदींमध्ये सुधारणा करणारे विधेयक परत पाठवले. तेव्हाच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची चमक दिसून आली होती. झारखंडमध्ये राज्यपालपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या त्या पहिल्या राज्यपाल होत्या. अचूक निर्णयक्षमता, मेहनती स्वभाव, संकटांशी झुंज देण्याची वृत्ती, मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक या दोघांचाही विश्वास मिळवला.
 
झारखंडमधील वनवासींनी जमिनीच्या हक्काबाबत केलेल्या पत्थलगडी आंदोलनावेळी त्यांनी हा प्रश्न चर्चेतूनसोडवण्यासाठी प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी गावात पाणी देण्यापासून ते रस्ते विकास, शौचालय बांधणी ,शिक्षणाचा प्रसार अशा विविध प्रश्नांना हात घातला.
 
राष्ट्रपतीपदासारखे पद सांभाळताना त्याची मर्यादा सांभाळत द्रौपदी मुर्मू स्वतंत्र बाण्याचा परिचय करून देतील, यात तीळमात्रही शंका नाही. झारखंडच्या राज्यपाल असताना ‘द्रौपदी माँ’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणार्‍या मुर्मू यांच्या कार्यालयाचे दरवाजे सामान्य माणसांसाठी खुले असायचे. देशाचे सर्वोच्चपद भूषवत असतानाही त्यांची सामान्य माणसाशी जुळलेली नाळ कायम राहील यात शंका नाही. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या संकटांना अविचलपणे तोंड देणार्‍या द्रौपदी मुर्मू भारतीय स्त्रीशक्तीचे जीवंत उदाहरण आहेत.
 
वनवासी मुलांना शिक्षित करण्यासाठी समर्पण वृत्तीने कार्य करणार्‍या शिक्षिकेची, नि:स्वार्थ भावनेने कार्य करणार्‍या समाजसेविकेची ही संघर्षातून घडलेली यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या धडाडी, धैर्य आणि जिद्दीला सलाम.
 
- मनाली गोरेगावकर
 
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)