आकर्षक सहलीचे पॅकेज देण्याच्या बहाण्याने दोघांची ९० हजारांची फसवणूक

    दिनांक : 14-Jul-2022
Total Views |
जळगाव : कार खरेदीनंतर लकी ठरलेले कस्टमर असल्याचे सांगत शहरातील एका हॉटेलात दोन कुटुंबीयांना बोलावले. अत्यल्प दरात 21 दिवस सहा जणांना परदेशात सहलीचे पॅकेज देण्याचा बहाणा करुन दोन कुटुंबीयांकडून 90 हजार रुपयांचे सदस्यत्व घेतले. यानंतर संबधितांनी संपर्क तोडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरूवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद बाबुलाल झवर यांनी 55 हजार तर विशाल वसंत नेमाडे यांची 35 हजार रुपयात फसवणूक झाली आहे.

travel-management-Scam
 
सविस्तर घटना अशी की, झवर यांनी ऑगस्ट 2021 मध्ये एक कार खरेदी केली. यांनतर 10 जून 2022 रोजी त्यांना वॅस्कॉन रियल इस्टेट अॅण्ड ट्रव्हल्स मॅनेजमेट प्रा. लि. या कंपनीतून फोन आला. कार खरेदीमुळे तुम्ही लकी कस्टमर ठरले आहात. यासाठी तुम्हाला 55 हजार रुपयांच्या खर्चात 21 दिवस सहा जणांना परदेशात सहलीचे पॅकेज देण्यात येते आहे. अधिक माहिती समजून घेण्यासाठी 15 जून 2022 रोजी हॉटेल फोर सिजन येथे आयोजित कार्यक्रमात या असा निरोप त्यांना देण्यात आला. झवर यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी त्यांना पुन्हा एक फोन आला. कार्यक्रमात तुम्हाला गिफ्ट देण्यात येणार आहे असे सांगत पुन्हा बोलावले. त्यानुसार झवर हे कुटुबीयांसह हॉटेलात गेले. तेथे हर्षद खान नावाच्या व्यक्तीने त्यांना सहलीची माहिती दिली. झवर यांना सवलत आवडल्यामुळे त्यांनी जागेवरच 55 हजार रुपये दिले. याच प्रमाणे नेमाडे यांनी 35 हजार रुपये दिले.
 
तीन दिवसात तुम्हाला सदस्यत्व देऊ, प्लॅट अॅक्टीवेट झाल्याचा मॅसेज मिळेल असे सांगण्यात आले. परंतु, आठ दिवस उलटूनही काही प्रक्रिया झाली नाही. यामुळे झवर यांनी कंपनीच्या कस्टमर केअरकडे फोन करुन पैसे परत मागितले. सुरुवातीला त्यांनी वरिष्ठांशी बोलून पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. नंतर मात्र कोणीही फोन रिसीव्ह करीत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे झवर यांच्या लक्षात आले. त्यानुसार झवर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वॅस्कॉन रियल इस्टेट अॅण्ड ट्रव्हल्स मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीसह हर्षल खान, योगेश शिंदे, शिल्पा (तिघांची पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.