धक्कादायक : मोबाईलद्वारे होणाऱ्या तरूणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरूणीची आत्महत्या

    दिनांक : 13-Jul-2022
Total Views |
तरूणासह आईला अटक करण्याची नातेवाईकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
 
जळगाव : मोबाईलवर सतत फोन करून तरूणाकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलेल्या २१ वर्षीय तरूणीची उपचारादरम्यान प्राणज्योत मालविली. त्रास देणारा तरूण व त्याची आई यांना अटक करावी अशी मागणीचे निवेदन मयत तरूणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.
 

sucide
 
 
 
सविस्तर वृत्त असे की, दिव्या दिलीप जाधव (वय-२१) रा. तारखेडा ता. पाचोरा जि.जळगाव ही आई वडीलांसह वास्तव्याला होती. आईवडील हात मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातीलच निलेश मंगलसिंग गायकवाड याच्यासोबत दिव्याची ओळख निर्माण झाली होती. निलेश हा लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिव्याची दिशाभूल करत होता. गेल्या दोन वर्षांपासून लग्ना बाबत कोणताही खुलासा देत नव्हता. दोघे एकाच समाजाचे असल्याने चार लोकांना बोलावून मुलासह त्याची आई लक्ष्मीबाई मंगलसिंग गायकवाड यांची समज काढण्याचा प्रयत्न केला.परंतु अश्लिल भाषा वापरून त्यांनी लग्नास मनाई केली. असे असतांना दिव्याचे आईवडील शेतात कामाला गेल्यानंतर पुन्हा निलेश गायकवाड हा दिव्याला वारंवार फोन व व्हॉटसॲपवर चॅटींग करत होता. तसेच दोघांचे सोबतचे असलेले फोटो व कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत होता. निलेशकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिव्याने २४ जून रोजी दुपारी ३ वाजता राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्याने तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. बुधवार १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या ‍दिव्या मृत्यूशी झुंत देत असतांना तीची प्राणज्योती मालविली.
 
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता. निलेश मंगलसिंग गायकवाड आणि त्याची आई लक्ष्मीबाई मंगलसिंग गायकवाड यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा दिव्याचे आईवडील व काका यांनी घेतला. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना मागणीचे निवेदन दिले आहे.