मान्सूनच्या पहिल्या टप्प्यातच गिरणा प्रकल्प भरलाय ६४.४६ टक्क्यांवर

    दिनांक : 13-Jul-2022
Total Views |
जळगाव : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेला गिरणा प्रकल्प मान्सूनच्या पहिल्याच टप्प्यात १२ जुलै रोजी ६४.४६टक्क्यांवर भरला आहे. हा प्रकल्प तयार झाल्यापासून प्रथमच असे घडले आहे.
 
 

Girna
 
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यांच्या सीमेवर असलेला गिरणा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प असून त्याची क्षमता 523.55 दलघमी अर्थात 398.07 मीटर एवढी आहे.या प्रकल्पात सद्यस्थितीत 314.193 दलघमी अर्थात 61.01% पर्यंत पाणीसाठा असून या प्रकल्पाच्या क्षेत्रातील कॅचमेंट एरियात दमदार पाऊस सुरू असल्याने ही टक्केवारी बुधवार सकाळपर्यंत वाढत ७० टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
 
उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच ते सात दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसात सुमारे 270 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गिरणा प्रकल्पात आतापर्यंत 12.367 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. रविवार, 10 जुलै रोजी पाणी पातळी 33% पर्यंत होती तर सोमवारी दुपारी 35.27% पर्यंत पाणी पातळीत वाढ झाली होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास ती तब्बल 37.86% तर मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास प्रकल्पात 314.193 दलघमीसह 60.01 टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली होती.
 
चणकापूर, पुनद (अर्जूनसागर) आणि हरणबारी भरले पूर्ण क्षमतेने
 
नाशिक जिल्ह्यात तसेच गिरणा नदी व त्यावरील चणकापूर, पुनद (अर्जूनसागर) आणि हरणबारी आदी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तीनही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून 55 टक्केपर्यंत पाणी पातळीत वाढ झाली. गिरणा प्रकल्प आतापर्यंत 1969, 71, 79, 82, 86, 96, 2004, 2006, 2008 या कालावधीत पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
 
सलग तीन वर्षे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला
 
यानंतर तब्बल अकरा वर्षानंतर 17 सप्टेंबर, 2019 रोजी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून प्रथमच 5000 क्युसेक व त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येऊन सुमारे 1 लाख 20 हजार क्यूसेकच्या वर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. योगायोगाने सलग दुसर्‍या वर्षी देखील 17 सप्टेंबर, 2020 आणि 2021 मध्ये देखील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून त्यातून विसर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
प्रकल्प ७० टक्केपर्यंत पाणी पातळी गाठण्याची शक्यता
 
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा नदीवरील चणकापूर, पुनद आणि ठेंगोडा बंधारा पूर्ण क्षमतेने भरले आहेत. ठेंगोडा बंधार्‍यावरून १९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून तो असाच सुरू राहिला तर बुधवारी सकाळपर्यंत गिरणा प्रकल्प ७० टक्के पर्यंत पाणी पातळी गाठण्याची शक्यता आहे.
 
- डी.पी.अग्रवाल, अधीक्षक अभियंता, गिरणा प्रकल्प जळगाव