कुरेशींचे मत खरे असते तर...

    दिनांक : 13-Jul-2022
Total Views |
 
कुरेशी जे ‘गोखले इन्स्टिट्यूट’मध्ये म्हणाले ते खरे असेल, तर भारतच काय, पण जगच एका नंदनवनात असल्याच्या आनंदात जगू शकेल. मात्र, ते वास्तव नाही.
 
 
 
kureshi
 
 
मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा अधिक होणार’ हा अपप्रचार असल्याचे मत भारताचे माजी निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी व्यक्त केले आहे. खरंतर निवडणूक आयोगाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीकडून यापेक्षा काही प्रगल्भ येणे अपेक्षित होते. ते काय बोलले, यापेक्षा ते एका अत्यंत प्रतिष्ठेच्या संस्थेच्या व्यासपीठावरून बोलले, त्याची दखल घेतली पाहिजे. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून ‘गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थे’मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खरंतर पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे त्या क्षेत्रातले महत्त्व आणि योगदान खूप मोठे आहे. ‘जेएनयु’चे व्यासपीठ वापरून जो दुटप्पीपणा आपल्या देशात केला जातो, तसे काही करण्यासाठी ‘गोखले इन्स्टिट्यूट‘ प्रसिद्ध नाही. मात्र, ख्यातनाम संस्थांची व्यासपीठे वापरून आपल्याला अपेक्षित संदेशवहन करण्याच्या या प्रक्रियेत आता ‘गोखले इन्स्टिट्यूट‘ही सहभागी झाली आहे का, हे तपासायले हवे. ‘सांख्यिकी’ या विषयात ‘गोखले इन्स्टिट्यूट’चे कामही आहे. मात्र, या तटस्थ संस्थेचे व्यासपीठ वापरून डॉ. कुरेशी यांनी जी मते मांडली, त्याचा समाचार घेणे आवश्यक आहे. ‘मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक होणार’ हा अपप्रचार अशा आशयाचे भाषण त्यांनी केले आणि त्यासाठी काही तर्कही त्यांनी दिले. ‘पॉप्युलेशन मिथ’ या विषयावर ते बोलत होते. हा विषय ‘पॉप्युलेशन मिथ’ होता की, ‘मिथ अबाऊट मुस्लीम पॉप्युलेशन’ होता, हे कळायला मार्ग नाही. मात्र, त्यांनी जे विषय मांडले त्यावरून त्यांना कदाचित ‘मिथ अबाऊट मुस्लीम पॉप्युलेशन’ असा मांडायचा असावा. असे वाटते. तो तसा मांडायलाही हरकत नाही.
 
लोकशाही हे देशातले एक महत्त्वाचे मूल्य आणि ते टिकून आहे ते हिंदूच्या सहिष्णू वृत्तीमुळे. हिंदुबाबत यासाठी कृतकृत्य असण्यापेक्षा उठता बसता हिंदुनाच अक्कल शिकविण्याचे उद्योग अधूनमधून चालत असतात. मुसलमानांच्या बाबतीत मात्र उलटेच असते. कुणी कितीही सेक्युलर असल्याचा दावा केला तरी या देशातल्या सहिष्णूतेमुळे सर्वोच्च पदांवर जाऊन बसलेले मुसलमान त्या पदावरून उतरल्यानंतर अचानक असुरक्षित, बिचारे मुसलमान कसे होऊन जातात, हा मोठा प्रश्नच आहे.
 
डॉ. शहाबुद्दीन याकुब कुरेशी २०१० ते २०१२ या काळात भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. २०११ साली ‘इंडियन एक्सप्रेस’च्या या देशातील १०० शक्तीमान भारतीय लोकांच्या यादीत त्यांचा नंबर लागला होता. अलीकडेच या महोदयांचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचा रोख मुस्लीम लोकसंख्या वाढण्याचे धोके हा भ्रम असून ते उजव्या विचारसरणीच्या लोकांनी पसरविलेले कुभांड आहे असाच आहे. हाच हाच ‘अजेंडा’ त्यांनी ‘रानडे इन्स्टिट्यूट’च्या व्यासपीठावरून पुढे रेटला. या साहेबांना २०१६ साली ‘नॅशनल इंडियन स्टुडंट युनियन युके’तर्फे ‘फेलोशिप’ देण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी शबाना आजमी व जावेद अख्तर या पती-पत्नीला ही ‘फेलोशिप’ मिळाली आहे. डॉ. कुरेशी ज्या काळात निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त होते, त्याचदरम्यान हमीद अन्सारीही या देशाचे उपराष्ट्रपती होते. त्यांनाही त्या पदावरून उतरल्यावर, असे अनेक साक्षात्कार झाले होते.
 
डॉ. कुरेशी यांनी आपल्या विधानासंदर्भात राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीचा दाखला दिला आहे. इस्लाम कुटुंब नियोजनाच्या विरोधात नाही. भारतात बहुपत्नीत्व शक्य नाही. कुराणात कुटुंब नियोजनाबाबत जे म्हटले आहे, त्याचा चुकीचा अन्वयार्थ लावला जातो. कुटुंब नियोजन, शिक्षण व रोजगाराच्या बाबातीत हिंदू आणि मुस्लीम सारख्याच पातळीवर आहेत, असेही ते म्हणाले. या सगळ्याच विधानांचे वास्तव निराळे आहे. इस्लाम कुटुंबनियोजनाच्या विरोधात नाही असे ते म्हणतात. मौलवी कुटुंबनियोजनाच्या किंवा मर्यादित संख्येत मुलांना जन्म देण्याच्या भूमिकेचा विचार का करतात? अशा प्रकारचे प्रयत्न करणार्‍या मुस्लीम कार्यकर्त्यांना मार का खावा लागतो? हमीद दलवाई किंवा कादर भाई यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली गेली होती? या प्रश्नाचे उत्तर डॉ. कुरेशी कोणत्या व्यासपीठावरून देणार आहेत का? ‘भारतात बहुपत्नीत्व शक्य नाही,’ हा देखील त्यांनी आधीच्या आकडेवारीनंतर केलेला जोडजुगाड! आता हे विधान नेमके कशाच्या आधारावर केले आहे? तिहेरी तलाक किंवा तरुण मुलींशी म्हातार्‍यांनी लग्न करण्याचे प्रकार यानिमित्ताने जे उघडकीला आले त्याचे काय? आपण हव्या तेवढ्या महिला पत्नी ठेवू शकतो व वाटेल तेवढ्या मुलांना जन्म देऊ शकतो, अशा ‘वल्गना’ करणार्‍या व धर्मांधांचे कुरेशी काय करणार आहेत? कुटुंब नियोजन, शिक्षण व रोजगाराच्या बाबतीत हिंदू-मुसलमान एकाच स्तरावर आहेत, याचा आधार काय, हेदेखील त्यांनी सांगितलेले नाही. कुरेशी यांचे हे सगळे तर्क मानले तर भारतच काय, पण सारे जगच नंदनवनात राहात असल्याचा आनंद आपल्याला घेतला येईल. मात्र, ती वस्तुस्थिती नाही. काश्मिरी पंडितांना करावे लागलेले पलायन, उत्तर प्रदेशातील कैराना इथे हिंदूंवर आणला गेलेला दबाव आणि त्यानंतर झालेले त्यांचे स्थलांतर हे सगळेच वास्तव आहे. गुजरात दंगलीचा उल्लेख करताना ज्या गोध्रा जळीतकांडांचा उल्लेख टाळला जातो, तेही वास्तवच आहे.
 
खरे तर मुस्लिमांचे दुर्दैव हेच की, त्यांना नेतृत्व किंवा त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणारे लोक हे असेच सापडतात. त्यांचे राजकीय नेते म्हणविणारे लोक प्रस्थापित राजकीय पक्षांबरोबर संधान बांधतात आणि कुरेशींसारखे लोक काँग्रेसी अजेंडा चालविण्यासाठी आपली बुद्धिमत्ता वापरत राहतात. यांना महत्त्वाच्या पदावर पोहोचायचे असते. मात्र, त्यांनी आपल्या भाषणात उल्लेखलेल्या समस्यांशी त्यांचे काहीच देणे घेणे नसते. त्यांना या समस्या अशा व्यासपीठांचा वापर करण्यासाठी व मुस्लीम लोकसंख्येचा डोकी म्हणूनच वापर करायचा असतो.